Saturday, August 5, 2017

मनातलं मुखपुस्तकाच्या पानावर...

मनातलं मुखपुस्तकाच्या पानावर...

नुकतेच विजयनगर चंद्रशेखर गणेशोत्सवाचे 51 वे वर्ष आनंदात पार पाडले. त्या निमित्ताने मंडळाविषयी कृतज्ञता व्यक्त करते आहे.
मंडळी, सतत 51 वर्ष असा उत्सव चालु ठेवणे हे सोपे नाही.
लहानपणी आम्ही अशा मोठ्या काॅलनीमध्ये रहात नाही म्हणून खूप चुटपुटायचो. पण 1999 ला लग्नानंतर इथे आले आणि गेली 16 वर्ष गणेशोत्सवाची मजा, बरेच वर्ष लांबून,  नेहमी 100% प्रेक्षक बनून तर कधी सक्रिय सहभागी होऊन अनुभवते आहे....पण त्याची लज्जत खरोखर अवीट आहे!
उत्सव एक शाळाच आहे जणु...
Event Management शिकायला कुठे बाहेर जायला नको. मंडळाचे सर्व कार्यकर्ते बाहेरच्या कार्यक्रमात नक्कीच उजवे ठरत असतील. मग ते रोजची आरती असो, काकड आरती असो, सजावट असो, हळदीकुंकु असो, विविध स्पर्धा असोत, स्थानिक कार्यक्रम असोत की श्रींची आगमनाची आणि विसर्जनाची मिरवणुक असो... सगळंच कसं उत्साहात चालु असतं. हे सगळं करताना प्रत्येकाच्या प्रेरणा वेगवेगळ्या. कोणी भाऊक गणेशभक्त असतात तर कोणी मित्रमैत्रिणींना भेटण्याच्या ओढीने खाली उतरतात, कोणी वैचारिक मतप्रदर्शनासाठी तर कोणी अंगच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी. आपापले उद्योग, व्यवसाय, अभ्यास, परीक्षा, आजारपण असं सगळं संभाळून सगळे उत्सवमय झालेले असतात.
घरी बायको 'किती वेळ कट्ट्यावर काढता' म्हणून वैतागलेली असते, आई, 'अभ्यास' करत नाही म्हणून रागवत असते, बायका फार वेळ बाहेर असल्याने घरची घडी थोडी विस्कटलेली असते...अशा सगळ्यातून उत्सव निर्विघ्न पार पाडण्याची जबाबदारी प्रत्येक जण यथा शक्ती घेतो हे खरोखर कौतुकास्पद आहे.
काळानुरूप उत्सवाचे स्वरूप बदलत गेले असेल पण बदल ही आयुष्यातली अतिशय आवश्यक प्रक्रीया आहे. तसंच हे सगळं करताना काही चुका होतात, पण चुकण्यातूनच सगळे 'घडत' आहेत हे महत्वाचे! असे घडलेले हिरे आपण जाणतोच. बऱ्याच जणांना Stage fear असते, समाजात मिसळण्याची भीती असते अशांसाठी हा उत्सव प्रभावी औषध आहे.
उत्सवाचे स्वरूप असे असावे, तसे असावे असं बाहेरून सुचना देणे खूप सोपे आहे पण प्रत्येकाने एकदातरी ह्यात स्वतःला झोकून देऊन बघावे मग त्यातले कष्ट, त्यातले ताणतणाव आपण समजून घेऊ शकु आणि मग मिरवणुकीत शिस्तबध्द लेझिमपथक, ध्वजपथक, टिपरीपथक किंवा ढोलपथक याचा आस्वाद घेतला तरी  DJ अनावश्यक वाटणार नाही....
अनेक महीन्यांचे नियोजन, प्रत्यक्ष उत्सवाचे दमछाक करणारे अकरा दिवस आणि बाप्पांना साश्रु निरोप देताना  गाण्याच्या शब्दांकडे पूर्ण दुर्लक्ष करून, स्वतःला विसरून, केवळ मस्तीभऱ्या तालावर पावलं थिरकवत, धम्माल 'गणपती डान्स' करण्याचा हक्क तर सर्वांना हवाच! खरंतर तसं नाचणं पण खूप अवघड असतं...
गेटपाशीच हे सगळं थांबतं आणि मग पुन्हा सगळे जबाबदारपणे श्रींना सोडून येतात....पुन्हा एकदा घरी परततात पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची वाट बघत... गणपती बाप्पा मोरया!!!!