Friday, December 28, 2018

Me too!

कळी असताना वासनेच्या चिखलाने लडबडलेल्या हातांचे नकोसे स्पर्श सहन केलेस... कधीकधी तिथेच उमलायची थांबलीसही तू... पण बऱ्याचवेळा तो चिखल झटकून उमललीस... अर्थात ते उमलणंही सहजपणे नाही झालं... वखवखलेल्या नजरांचे रोख चुकवत, कधी गर्दीत तर कधी एकाकी ठिकाणी होणारे 'नकोसे', थरकाप उडवणारे स्पर्श सहन करत... कधी जाणूनबुजून द्वयअर्थी केलेल्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करत... कधी एकतर्फी प्रेमाच्या हल्ल्यांनी जळत... कधी सामुदायिकपणे ओरबाडली जात, पाकळ्याच उखडून टाकलेलं उध्वस्त फुल बनत... जगत राहिलीस तू... कायमच मूकपणे... किंवा केवळ अस्फुटशा किंकाळ्या देत... स्वत:च स्वत:च्या वेदनेवर फुंकर मारत... 'समाज मला काय म्हणेल?' याचा विचार करत... 'त्या'च्या सामाजिक स्थानाचं वर्चस्व मान्य करत... 'त्या'ची मनमानी चालवून घेत राहिलीस तू... भावनांनी अंध बनून 'त्या'च्या   नकोशा वाटणाऱ्या मागण्या पूर्ण करत राहिलीस... 'नाही न म्हणण्याची' जणू भीडच घालून घेतलीस स्वत:ला... आणि म्हणून "दबून राहणे हेच योग्य" अशी समजूत करून... जगत राहिलीस तू...
पण कोण कुठल्या अमेरिकेत तराना नावाच्या सामाजिक कार्यकर्तीने एका १३ वर्षाच्या मुलीने सांगितलेली तिच्यावर झालेल्या अत्याचाराची व्यथा ऐकली आणि तिच्या मनातला उद्गार एक चळवळ बनून गेला... तो उद्गार म्हणजे "me too!"
सह-अनुभूतीतून सामर्थ्य देणाऱ्या ह्या me too च्या लाटेला समाज माध्यमांनी पुरेपूर वाव दिला आणि "me too" ही सगळ्यांची चळवळ झाली...
तू पेटून उठलीस... मनात खोल कुठेतरी दडपून आणि लपवून ठेवलेल्या जखमा, व्रण, घाव सगळ्यांना उघडपणे दाखवलेस... कोणी ह्या 'जखमा' खोट्या ठरवल्या, तर कोणी 'तुलाच' दोषी ठरवलं... पण आता तुला कोणालाच भ्यायची गरज नाही... एक नक्की की सगळेच पुरुष शोषण करणारे नसतात... पण जे पुरुष वेगवेगळ्या चेहऱ्यांचा आणि नात्यांचा आव आणून त्यामागे आपला विकृत चेहरा लपवत होते, आपण समाजात बलवान असल्याने 'मला कोणीच काही करू शकत नाही' असं समजत होते ते मात्र आता तसं करताना घाबरले पाहिजेत!
कोणतीच चळवळ कायम चालू राहत नाही... पण ती एक नवीन पायंडा घालून जाते... म्हणून आपण आपल्या पुढच्या पीढीला डोळसपणे, मोकळेपणाने सांगू... की 'आता कोणीच दुर्बलपणे शोषण करून घ्यायचं नाही... आणि असं कोणाचं शोषण करण्याची चूकही कोणी करू नये'... आता परत परत होऊन गेलेल्या गोष्टींवर, "मला तेव्हा आवाज करता आला नाही" असं म्हणून नाही चालणार... अन्यायाविरुद्ध लगेच त्याचक्षणी आवाज करायची आता सवयच करून घेऊ...
अर्थात ही महिलांनी पुरुषांच्या विरोधात चालवलेली चळवळ नाही... ही शोषिताने शोषणाविरुद्ध उभी केलेली चळवळ आहे... म्हणूनच ती स्त्री-पुरुष सर्वांची आहे...
आपल्याला सगळ्यांना पूर्वीपासूनच शोषणाविरुद्ध "नकार" द्यायचा हक्क आहे फक्त तो आता "मोठ्याने", "ताठ मानेने" द्यायचा आहे...  आणि आलेले आवाज ऐकून "सावध" व्हायचं आहे... बस...

सुकृता

Thursday, March 1, 2018

Ratatouille...

स्टार मुव्हीज् वर काल परत एकदा  Ratatouille पाहीला... आणि पुन्हा एकदा आवडला...असाच खूप आवडणारा मुव्ही म्हणजे Eutopian जगाची झलक दाखवणारा तो म्हणजे Zootopia!
Zootopia मधलं 'Anybody can be anything in Zootopia' हे तत्त्वज्ञान अगदी सहजपणे प्रेक्षकांच्या मनात उतरतं आणि निर्मळ आनंदाचा अनुभव मिळतो.
तशाच प्रकारचा तरल आनंदाचा अनुभव Ratatouille पहाताना घेत होते. फ्रान्समधला  सर्वोत्तम Restaurant Critic, Mr. Anton Ego शेवटी 'Anybody can cook' चा अर्थ असा समजावतो की “Not everyone can be a great artist, but a great artist can come from anywhere". 
त्याचा 'ego'...'अहंकार'... जो एखाद्या गोष्टीची मक्तेदारी कायम स्वत:कडे ठेवणाऱ्या समाजाच्या अहंकाराचं 
प्रतिनिधित्व करतो ... 
आपल्याला उंदीर स्वयंपाक घरात दिसला तरी आवडत नाही...पण स्त्री-पुरुष, जात-पात, धर्म-वर्ण असे भेदभाव करणाऱ्यांनासुद्धा चक्क 'एक उंदीर' उत्तम शेफ आहे आणि लोकांना त्यांच्या हातचे पदार्थ आवडतात हे बघायला खूप आवडतं...इथेच तो मुव्ही युनिव्हर्सल होऊन जातो...
मशीदीतून येणारी बांग आसमंतात पसरत होती...बाहेर होळी जळायला सुरूवात झाली होती...त्याचा मस्त वास वाऱ्याबरोबर आत आला... म्हणून खिडकीतून होळीच्या ज्वाळेकडे पाहिलं...मुव्ही संपत आला होता...'Mr. Ego ला सत्याची जाणीव होत होती...आणि अहंकार त्या ज्वाळेमध्ये चूरचूर होऊन जातं होता....