Tuesday, September 26, 2017

माझ्या आठवणीतला पाऊस, दहावीच्या लेकीसाठी लिहिलेला

माझ्या आठवणीतला पाऊस

पावसाच्या धारा येती झरझरा
झाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा
कवयत्री शांत शेळके यांच्या कवितेचे शब्द जणू खरे झाले होते. खरंतर मला भीतीच वाटली. मीनाआत्या आग्रहाने मला तिच्या गावाला ऐन पावसाळ्यात घेऊन आली होती.
“तशीही गणपतीची सुट्टी आहे आणि ह्या काँक्रिटच्या जंगलातला पाऊस सहन करण्यापेक्षा आमच्या सांगलीला ये आणि तिथला पाऊस अनुभव”, आत्या मला म्हणाली.
आता पावसात काय वेगळं असणार? नुसता बदाबदा कोसळतो...सगळीकडे पाणी तुंबतं..गटारं ओसंडून वाहू लागतात...भिंतींना ओल येते...पण नाही, मी आत्याचा आग्रह मोडू शकले नाही.
नेमकी पोहोचले तेव्हा पाऊस पडत होता.पण इथल्यासारखा बदाबदा नाही तर झरझरा पडत होता. मागचा आठवडाभर पाऊस नसल्याने आजच्या पावसाने छान मातीचा सुगंधा येत होता. छोटे छोटे ओहोळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खळखळ वाहत होते आणि चक्क ते वाहणारं पाणी स्वच्छ होतं. आत्याचं घर शहरापासून जरा लांबच होतं. शांत रस्त्यावर तो ओहोळाचा आवाज जरा जास्तच मधुर वाटून गेला.
सगळी घरं कशी टुमदार, एक किंवा दोन मजली आणि घराच्या आजूबाजूला बागा... पावसाच्या पाण्याने सगळी आजूबाजूच्या झाडांची मनसोक्त भिजणारी हिरवीगार पानं बघितल्यावर मलाही तसाच भिजावंसं वाटलं.
तेवढ्यात पाऊस जरा थांबला. जुईच्या मांडवाखाली पहिल्यांदाच जुईची फुलं वेचली. हातातल्या ओंजळीतल्या जुईच्या नाजुकश्या फुलांचा तो मोहक वास मी कधीच नाही विसरणार...
पाऊस थांबलाच आहे तर गणपतीसाठी फुलं गोळा करू असं म्हणत आत्याने मला फुलांच्या प्रदर्शनातच नेलं. पण हे प्रदर्शन देखणं होतं...मुख्य म्हणजे कृत्रिम नव्हतं. तेरडा, कर्दळ, कुंद, चाफा, नागचाफा, अबोली, कोरांटी अशी नावं सुद्धा मी पहिल्यांदाच ऐकत परडीत फुलं गोळा केली. बेल, तुळस आणि दुर्वा अशी पत्रीसुद्धा घेतली.
“हळू गं, निसरडं झालंय, घसरशील...”, आत्या म्हणेपर्यंत घसरलेच. घराभोवती सिमेंटचे, डांबराचे रस्ते किंवा पार्किंगस् असतात अशा ठिकाणी वाढलेली मी. ते ‘निसरडं’ पाहून पण मला मजा वाटली. हाताला लागलेली ती ओली माती पाहून जणू मेंदीच लावल्याचा आनंद झाला.
श्रावण नुकताच संपला होता. तरी उन पावसाचा खेळ चालूच होता. आत्याकाडचे दहा दिवस अगदी मंतरलेले होते. घरात भावंडांबरोबर गणपती उत्सवाची धमाल आणि बाहेर हा असा मनोहारी पाऊस अनुभवायचा. आत्ता मला कळत होता की ‘पाऊस अनुभवायचा’ म्हणजे नेमका काय ते.
पाऊस म्हणजे परसातील फुलं आणि लिंबोण्या वेचणे... पाऊस म्हणजे रस्त्यालगतच्या ओहोळात एखादा छोटासा दगड आला की तयार होणारी पाण्याची नक्षी बघणे आणि खेळता खेळता हातापायाला लागलेला चिख्खल त्या वाहणाऱ्या पाण्यात धुवून घेणे... पाऊस म्हणजे घरापुढच्या मांडवातून पडणाऱ्या पागोळ्या हातात धरणे... पाऊस  म्हणजे संध्याकाळच्या वेळी आकाशात होणारी रंगरंगोटी बघणे आणि इंद्रधनुष्य दिसलं की टाळ्या वाजवत उड्या मारणे... पाऊस म्हणजे सकाळच्या झुंजूमुंजू उजेडात पोपटी ओली पानं पाहत रहाणे आणि रात्रीच्या वेळी बेडकांचे डराव डराव ऐकणे.... पाऊस म्हणजे भिजलेले पंख कोरडे करण्यासाठी अंग थरथरवणारे रघु, मैना, चिमणी, बुलबुल पाहणे आणि पाऊस म्हणजे निसर्गाची उधळण बघून स्वतःही शहारणे! पावसाचा ‘अनुभव’ मनात भरून राहिला...
पावसाचा चिंबचिंब अनुभव घेऊन मी मुंबईला परत आले खरी; पण निसर्गापासून लांब राहून पावसावर निबंध लिहिताना अजूनही उपयोगी पडतो तो आत्याकडे अनुभवलेला पाऊस...पाऊस पानातला आणि माझ्या मनातला!


सुकृता पेठे

Monday, September 25, 2017

माझा आवडता पक्षी.... लेकीसाठी लिखाण

कोणाला मोर, कोणाला राघू, कोणाला बुलबुल तर कोणाला चिमणी असे छान छान पक्षी आवडतात पण मला विचाराल तर मी सांगेन की मला 'कावळा' आवडतो.
हा हा...हसू नका. असा 'काव-काव' कर्क्कश्श ओरडणारा, काळा, कुरूप पक्षी मला का आवडतो असा प्रश्र्न तुम्हाला नक्कीच पडला असेल... तर ऐकाच...मला कावळा का आवडतो ते...
मित्रांनो, मला बोलणं समजायला लागल्यावर मी पहिली गोष्ट ऐकली ती ह्या काऊचीच की...
चिऊ आणि काऊच्या गोष्टीत पावसात चिंब भिजलेल्या कावळ्याला चिऊताई दार उघडत नाही तेव्हापासूनच ह्या कावळ्याविषयी मला फार आपुलकी वाटायची.
कावळा ह्या पक्ष्याविषयी अनेक अंधश्रद्धा आहेत आणि त्या सगळ्या चांगल्या नसल्यामुळे कावळा दिसला तरी माणसे त्याला एरवीच हाकलतात.
पण पित्रुपंधरवड्यात मात्र पूर्वजांसाठी ठेवलेल्या वाडीला चोच मारायला ह्यांना कावळाच हवा असतो आणि खाण्यापिण्याविषयी फारसे चोचले न ठेवणारा कावळा वाडीतील खाऊ खातो आणि माणसांना समाधान देतो.
भारतात हा पक्षी सर्वत्र आढळतो. कदाचित म्हणूनच पूर्वीच्या काळी फोन आणि वाहने नसताना लग्न होऊन सासरी आलेली मुलगी कावळ्याला बघून आपल्या आईच्या आठवणीने व्याकूळ व्हायची आणि त्याची काव-काव म्हणजे जणू आपल्या माहरून कोणीतरी येणार असल्याची वर्दी देत आहे असे वाटून तिला 'ती काव-काव' सुद्धा हवीहवीशी वाटायची.
प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांनीसुद्धा विठुमाऊलीची वर्दी देणाऱ्या कावळ्याचे वर्णन
पैलतोगे काऊ कोकताहे...
शकून गे माये...सांगताहेत
असे केले आहे.
मित्रांनो, असा हा आपल्या सगळ्यांनाच जवळचा वाटणारा हा पक्षी प्रत्यक्षातसुद्धा फार मोठ्या मनाचा आहे.
कोकीळ पक्षाची मादी आपली अंडी नकळत कावळ्याच्या घरट्यात टाकून जाते. पिले बाहेर येईपर्यंत कोकीळेची अंडी कावळीणबाई उबवतात.
पक्षी निरीक्षकांनी सांगितले आहे की कावळा जेव्हा झाडावर उंच घर बांधतो तेव्हा पाऊस कमी पडतो आणि जेव्हा कमी उंच म्हणजे खाली बांधतो तेव्हा पाऊस जास्त पडतो.
आता मला सांगा, इतका चांगला, हुशार कावळा केवळ काळा म्हणून आवडत नाही असे म्हणणे चांगले का? आपल्या सगळ्यांना आपल्यातल्याच वाटणारा हा कावळा पक्षी मला खूप भावतो...खूप आवडतो.

सुकृता पेठे