Saturday, May 30, 2020

ह्या लॉक डाऊन मध्ये आपण काय नाही पाहिले?

हसताना पाहिले, कुणा रडताना पाहिले
दुसऱ्याचे अश्रु कुणी पुसताना पाहिले...

उद्योगधंदे छोटेमोठे गडगडताना पाहिले 
कुणी संधीसाधूं खिसे कापताना पाहिले...

'मास्क'मागे क्रूरपणा लपवताना पाहिले
वासनांध त्यांची तृषा शमवताना पाहिले...

घरात बसून जगणे परवडताना पाहिले
घरी जाण्यासाठी परवड होताना पाहिले...

आविष्कृत, सूप्त कलागुणांना पाहिले
व्हर्च्युअली का असेना दिग्गजांना पाहिले...

हरवलेल्या स्वप्नांसाठी झुरताना पाहिले
सुंदर उद्याच्या आशेवर झुलताना पाहिले...

आयुष्यभर तुंबड्या भरून ठेवताना पाहिले
त्यांना, संताचा आव आणून बोलताना पाहिले...

आपापले झेंडे धरून लढताना पाहिले
माणुसकीचा झेंडा त्यात तरताना पाहिले...

पाखरांना मुक्तपणे विहरताना पाहिले
हिरवाईला धुराविना बहरताना पाहिले...

रुग्णसेवा करणाऱ्या मानवांना पाहिले
राबणाऱ्या पोलिसातल्या देवांना पाहिले...

स्वजनांना अखेरचा निरोप देताना पाहिले
बरे होऊन अनेक परत येताना पाहिले...

वाटले होते लाॅकडाऊनमध्ये बंद होईल सारे
वाटले नव्हते मनाची अशी उघडी होतील दारे...

सुकृता पेठे
कधी वाटते मुक्त भन्नाट व्हावे
कधी उंबऱ्याने मला थोपवावे...

कधी उंच इतुके की आकाश भ्यावे
कधी जानकीसम भूतळी लुप्त व्हावे...

कधी तारकांना चमकुनी लाजवावे
कधी गुप्त कित्येक अंधार प्यावे...

कधी वीज होऊन वेगास ल्यावे
कधी वाटते गोठूनी स्तब्ध व्हावे...

कधी क्रोध उधळून वन पेटवावे
कधी शांततेने तरल व्यक्त व्हावे...

कधी रिक्त व्हावे, कधी मी फुलावे
कधी मी दिसावे, नि अदृश्य व्हावे...

कधी हास्यरंगात रंगून जावे
कधी आसवांच्या डोही बुडावे... 

कधी भरभरोनी मी प्रपंचास प्यावे
कधी पंचत्वे विरघळोनी निजावे...

सुकृता पेठे