Friday, February 25, 2022

Being Positive!

 अथांग समुद्र... नजर पोहोचेपर्यंत फक्त पाणीच पाणी... पोहून शक्ती संपत आलेली आणि किनाऱ्याचा काही मागमूसही नाही. कधी शार्क येणार माहिती नाहीत, कधी जीवघेणी लाट येणार माहिती नाही. आपण फक्त हिंदकळत रहायचं. आधाराला अक्षरशः एक काडी. बुडत्याला आधार देणारी. भल्याभल्यांना सहज तळ गाठताना पाहिलं. कित्येकांना मोठ्या माशांनी घायाळ केलेलं पाहिलं. लाटांचा आवाज इतका की स्वतःची मदतीची आर्त हाक स्वःतालाच ऐकू येत नाही... तिथे ती इतरांना काय ऐकू जाणार! त्यातून भर म्हणून हळूहळू थंड होत चाललेलं पाणी. अगदी कुठल्याही क्षणी गोठेल असं... आणि म्हणे Be Positive... How? अशावेळी करणार काय?  कुठून संपणार भय? कुठून येणार उमेद?

सहज लाटेबरोबर हलणारी छोटी मासोळी दिसली... माझ्यावर हसते आहे असं वाटलं... लाट आली त्याप्रमाणे वर-खाली, पुढे-मागे होत, तिला जायचं होतं  तिकडे सहज जात होती... आणि वीज चमकावी तशी अचानक उत्साहाची लहर आली. वाटलं हाच उपाय आहे. लाटेला टक्कर कशाला द्यावी? द्यावं बिनधास्त झोकून...व्हावं स्वार लाटांवर. जितका विरोध जास्त तितकी जास्त शक्ती वाया जात होती. लाटेला विरोध करणंच सोडलं मग. अंग सैल सोडून दिलं... लाट नेईल तिकडे निमूट जायचं. जिकडे किनारा असेल अशी आशा वाटते आहे, तिकडे आगेकूच करत रहायची पण  easy... उगाच आटापिटा करून नाही. लाटेशी टक्कर नाही... लाटेच्या विरोधात शक्ती वाया घालवायची नाही. लाटेचा विरोध कमी झाला की मात्र जोमाने पुढे जायचं... कदाचित हेच असेल being positive!