Monday, June 26, 2017

'स्वच्छ भारत'च्या निमित्ताने....

#swachhabharat
'स्वच्छ भारत'च्या निमित्ताने....

विजयनगरचा "शुन्य कचरा प्रकल्प" हा इतर अनेक अशा प्रकारच्या प्रकल्पांपेक्षा वेगळा आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे  रहिवाश्यांनी ह्या प्रकल्पासाठी आवश्यक तो खर्च करण्याची तयारी दाखवल्याचा सुज्ञपणा! कार्यकारी मंडळाचा पुढाकार, स्वयंसेवकांचे योगदान व सकारात्मक प्रचार आणि  सुजाण नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हे आपले यशाचे गमक आहे.

आपल्यानंतर आपल्यापासून प्रेरणा घेऊन सुरू झालेले काही प्रकल्प चुकीच्या दिशेमुळे बंद पडायच्या मार्गावर आहेत. किंवा काही आपल्या आधी सुरु होऊनही फारशी प्रगती करू शकले नाहीत अथवा कधीच बंद पडले. 'दिशा चुकीची' अशा करता म्हटले आहे की मुळातच असे प्रकल्प फुकटात व्हावेत किंवा कमीत कमी खर्चात व्हावेत किंवा असा प्रकल्प करून किती फायदा होणार अशा फाजील प्रश्नांवर ते उभे राहिले.

वास्तविक आपण आपले घर व स्वत: ला स्वच्छ ठेवण्यासाठी किती काय काय करतो... जसे की झाडु-पोछा करायला कामावर पगार देऊन कामवाली बाई नेमतो, फिनेल सारखी केमिकल्स विकत घेऊन वापरतो, साबण, शॅम्पुची तर घरी रेलचेल असते, परफ्युमस्, अत्तरे, डिओ, रुम फ्रेशनर अशा सुगंधी वस्तु आपल्या जीवनावश्यक गोष्टींमध्ये जाऊन बसल्या आहेत. मग आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी एखादा उपक्रम राबवताना फुकट व्हावा, कोणीतरी दुसऱ्याने खर्चाची जबाबदारी घ्यवी, सुका कचरा विकून पैसे मिळावे किंवा ओल्या कचऱ्यापासून बनलेले खत विकून आपल्याला फायदा व्हावा अशा अपेक्षा का असाव्या?

आपण आपला सुका कचरा आकार संघटनेला फुकट देतो. त्यांच्या केंद्रावर कचरावेचक त्याचे वर्गीकरण करतात. व तो कचरा Recyclers ना विकून त्यातून त्यांना उत्पन्न मिळते. ही एका अर्थाने समाजसेवाच नाही का?

ओल्या कचऱ्यापासून खत बनवण्यासाठी आपल्याकडे स्त्री मुक्ती संघटनेच्या ३ परिसर भगिनींची नेमणूक करण्यात आली आहे. मुळात वर्षानुवर्षे कचरा उपसणाऱ्या कचरावेचकांना संघटित करून त्यांना खतनिर्मितीचे धडे देऊन स्त्री मुक्ती संघटनेने त्यांच्यासाठी उपजिविकेचे साधनच तयार केले आहे. अशा परिसर भगिनींची आपण पगार देऊन नेमणूक केली आहे. आपल्याला ५०० कुटुंबीयांना ३ परिसर भगिनींची आवश्यकता आहे. इतरांना कमी जास्त लागू शकतात. तसेच त्यांच्यावर देखरेख ठेवणाऱ्या स्त्री मुक्ती संघटनेच्या पर्यवेक्षिका यांचे मानधन आणि आता AGM नंतर नेमलेल्या व्यवस्थापकाचे मानधन, तसेच खताच्या हौदांची डागडुजी, पावसाळी शेड असा सगळा खर्च धरूनसुद्धा प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला  १०० रुपयांपेक्षा कमी खर्च येतो. (खरंतर महिन्यातून कुटुंबातील सर्वांना दोन वेळा वडापाव आणला तरी याहून जास्त खर्च होईल)
पण असे असूनसुद्धा स्वत: ला जास्त सुशिक्षित आणि जास्त श्रीमंत समजणाऱ्या इतर ठिकाणी, वर सांगितल्याप्रमाणे चुकीची दिशा दाखवली गेल्याने लोक खर्च करायला तयार नाहीत म्हणून प्रकल्प बंद पडत आहेत.

या तुलनेत विजयनगरने दाखवलेली खर्च करण्याची तयारी कौतुकास्पद आणि स्वागतार्हच आहे आणि आपण सुसंस्कृत असल्याचा एक छोटासा दाखलाच आहे!

आमची सोसायटी पण खत फुकट देत नाही कारण फुकट मिळणाऱ्या गोष्टींना किंमत राहत नाही. त्याबदल्यात नाममात्र रक्कम प्रकल्पासाठी देणगी म्हणून घेतली जाते. पण त्यातून केवळ नाममात्र रक्कम मिळते. खत सोसायटी मधील झाडांसाठी वापरले जाते हा एक फायदा आहेच.

अजूनही काही ठिकाणी असे प्रकल्प होत असतीलच. अशा प्रकल्पांची जास्तीत जास्त माहिती इतरांना होऊन तिथेही असे प्रकल्प सुरू होणे आवश्यक आहे. काही वर्षांनी विशेष तंत्रज्ञान आले की घनकचरा व्यवस्थापन याहून सोपे आणि सरकारी यंत्रणेने होईल अशी अाशा करायला काहीच हरकत नाही.
पण तुर्तास आपणच यासाठी सरकारी यंत्रणेला हातभार लावावा ही काळाची गरज आहे!

सुकृता

Demonitization

"काळ्या पैशाच्या नावाने", "भाबडा आशावाद तारेल? " हे दीक्षानंद भोसले यांचे लेख केवळ,  'विरोध सक्षम हवा' म्हणून केलेला प्रयत्न वाटला. जनता सुज्ञ आहे. "संधी मिळाली असती तर आपणही काळी माया जमा केली असती का? " असा प्रश्न त्यांना पडतो. पण ज्यांची सद्सद्विवेक बुद्धी जागृत असते त्यांना अशा संधी संधी वाटत नाहीत. काळी माया जमवावी असं त्यांना वाटतही नाही. नकळत आपले काही चुकले असे वाटले तरी टोचणी लागते. काळा पैसा जमा करणाऱ्यांविषयी "राग असणे" याला भोसले "आसुया असणे" म्हणतात याचे आश्चर्य वाटते. रांगबळींविषयी सर्वांनाच सहानुभूती आहे. पण त्याला मोदी जबाबदार की 'नवीन चलन' बॅंकेच्या मागच्या दाराने परस्पर नेणारे धनदांडगे? तशाही एवढी लोकसंख्या असलेल्या देशाला रांगा नवीन नाहीत. पंढरपुर, शिर्डी, तिरुपति काय किंवा सिद्धिविनायक दर्शनासाठीच्या रांगा, बिले भरायच्या रांगा, तिकिटांच्या रांगा, प्रवेशाच्या रांगा; सर्व सामान्यांना रांगा लावाव्या लागतातच. मग आत्ताच का त्यांचं असं भांडवल?
सर्वसामान्य हे सुद्धा विचार करतात, ती काही फक्त विद्वानांची (Intellectuals) मक्तेदारी नाही.
राहिली गोष्ट देशप्रेमाची. तर स्वत: चे ते देशप्रेम आणि इतरांचे ते 'उफाळून आले' वगैरे शब्द का? देशप्रेम ही एक भावना आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून ती व्यक्त होऊ शकते. आपल्या देशातील नागरिकांना त्रास होणार नाही असे वागणे म्हणजे देशभक्तीच आहे की. आपल्याला दिलेले काम योग्य रितीने पूर्ण करणे, वाहतुकीचे नियम पाळणे, बेकायदेशीर कामे न करणे... असे चांगले वागणारे कित्येक सज्जन असतात,  त्यांचा हे असे 'देशप्रेमाचा ज्वर' असे शब्द वापरून आपण अपमानच केला आहे.
लोकसत्तासुद्धा अचानक मोदीविरोधी सूर लावत आहे. "का? "तर पुढे जाऊन ते हुकुमशहा होतील या भीतीने? अर्थात सगळा देश स्वच्छ करायचा आहे तर असा धुराळा उडणारच. मोदींनी फक्त पहिला झाडु मारला आहे. त्यासाठी कोणी त्यांना देव म्हणत नाहीये. पुढचं काम आपणच सगळ्यांनी करायचं आहे. आधीचा कचरा रिझवून टाकायचा आणि नवीन कचरा कोणाला टाकू नाही द्यायचा;  हे आता आपणच मनावर घेऊन करायचं आहे.
#लोकसत्ता

प्रिय भूषण

भूषण, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज तू ४० वर्षांचा झालास! त्या निमित्ताने तुझं थोडं कौतुक करावं म्हणून लिहायला घेतलं आणि सगळं बालपणच डोळ्यासमोर उभं राहिलं. तू 'शेंडेफळ', त्यामुळे आमचा सगळ्यांचा लाडका! पण लाड करायची वेळच कमी यायची...😅
लहानपणी एकदम बारिक पण फार तुडतुडा होतास. सतत धडपडायचास त्यामुळे सगळा वेळ काळजी करण्यातच जायचा. इतकी की डेक्कनला आजीकडे रहायला जाताना मी तुझी bodyguard म्हणूनच यायचे. (आई तुला पाठवायची हे तिचं  daring च म्हटलं पाहिजे...😅)
एखादा दिवस क्वचितच असा गेला असेल की तुझ्या हातापायावर bandage नाही आहे. असो, 'पडे धडे तो वाढे' या उक्तीप्रमाणे तू 'वाढलास' खरा!!!!
चौथीपर्यंत तुझा अभ्यास आई, मी, प्राजक्ता पूर्ण करायचो...पण पाचवीत आलास आणि एकदम शांत झालास तो आजही 'शांत' म्हणूनच सगळ्यांना माहीत आहेस. (हा आता कधी कधी चिडतोस ते सोडून देऊ...😝)
'वाढलास' म्हणाले ते यासाठी की तुझी तू केलेली प्रगती ही कौतुकास्पद आहे. मग ती ME करण्यात असो, नोकरीत challenging tasks करण्यात असो, बाजा वाजविण्यात असो, पेटी (harmonium) वाजविण्यात असो, तबला वाजविण्यात असो किंवा शास्त्रीय संगीताविषयी माहिती गोळा करण्यात असो...अगदी खोलवर जाऊन माहिती मिळवतोस.
तू 'ज्ञानी' आहेस याबाबतीत कोणाचंच दुमत नसावं...(पत्नी अपवाद असते....😜) पण Physics असो, Mathematics असो, Grammer असो किंवा Philosophy असो...राजकारण असो की आर्थिक गुंतवणूक... तुझ्या स्वतःच्या काही clear ideas असतात....खूप वाचतोस, खूप छान समजून घेतोस, समजावून देतोस... प्रत्येक गोष्ट खोलात जाऊन करतोस!
आता ह्या खोलवर जाण्याच्या वृत्तीमुळे तुझं घरी तास न् तास office थाटून बसणं, दोन दोन महिने कागदाची विविध विमानं करून घरभर उडवणे, cubes शी खेळ, सम्मीत, सौमिकच्या खेळामधले challenging games खेळत रहाणे, कधीही मनात आलं की तबला practice करणं हे सगळं आई आणि अदितीच सहन करू जाणे....😍
पण आमच्या सगळ्यांसाठी तू 'खास' आहेस हे तितकंच खरं आहे.
प्राजक्ताच्या लग्नात दात्यांच्या बंद घरात 'एकटं' झोपणं, बाबा ICU मध्ये असताना हॉस्पिटलच्या बाहेरच्या बाकड्यावर कुत्र्यांच्या भयाण ओरडण्यात 'एकाकी' झोपणं यातून तुझा धीरोदात्तपणा नेहमीच आम्हाला जाणवतो. बाबा गेले त्यावेळी आपण रात्रभर हताशपणे बसून राहिलो... तेव्हा जाणवलं की तूही तितकाच हळवा आहेस...आईला जपतोस, अदिती, मुलं, आम्ही दोघी आणि आमचं कुटुंब, भाचवंड, आत्ये-मामे- मावस-चुलत भावंडं, आपली सगळीच माणसं यांच्यावर भरभरून प्रेम करतोस...म्हणूनच तू इथल्या मातीत परत आलास.
खरंतर तू आमचा लहान भाऊ पण कधी आमच्याहून मोठा झालास ते कळलंच नाही!
पुन्हा एकदा मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

पाऊलखुणा

दगडगोट्यात चालण्याची...
ना दखल..ना चाहूल कुणा...
जाईन तरीही क्षितीजाकडे...
ठेवून मागे पाऊलखुणा...

अनाकलनीय मन

कधी, कसे, कुठे, कितीदा...
कितीदा, कितीदा उलगडु मी मनाला?
तरीही नव्याने नवा थांग दिसतो...
विसावु कशी मी मनाच्या तळाला?

कितीदा, कितीदा मी झाकू मनाला...
अधुरे अपुरे पांघरूनि तयाला?
किती हे मुलामे...किती रंग द्यावे?
लपवु कशी अंतरंगास माझ्या?

किती कोपरे नि किती गुप्त दारे?
स्मृती विस्मृतिंचे कसे शोध घ्यावे?
किती भोवरे ढवळती ह्या मनाला?
कुठे नि कसे ओळखु मी स्वतःला?
                                   
                                 ...सुकृता

नदी

खळखळणारं झऱ्यासारखं धावणं कधीच थांबलं
'नदी' व्हायची वाट बघणारं 'ओढापणच' उरलं

वाटलं जावं खोल..व्हावं नदीसारखं रुंद
एक फाटा गेलाही काळ्या कातळाला खणत
मग खाली जाता जाता पुढे जाणं थांबलं
'सरोवर' व्हायची वाट बघणारं 'डबकेपणच' उरलं...

वाटलं फुलवावे आपणही 'मळे' मग काय...
गेले धावत...उजाड माळरानातून
मळ्यांमधून धावताना 'नदी' होणं राहिलं
फळाफुलात गुरफटलेलं 'कालवापणच' राहिलं...

वाटायचं कधीतरी आपणही 'नदी' व्हावं
आकाशाचं निळेपण खोल डोहात साठवावं
काठावरच्या रानाशी गुजगोष्टी  कराव्यात
भिरभिरणाऱ्या वाऱ्याबरोबर तरंग होऊन थरथरावं...

वाटायचं कधीतरी आपणही 'नदी' व्हावं
पूर्वेकडच्या तीरामागून सूर्यानं डोकवावं
तारकांनी चमचमणारं आकाशाचं वस्त्र ल्यावं
कोणीतरी आपल्यालाही गंगेसारखं नाव द्यावं...

येणाऱ्या जाणाऱ्याचं सगळं काही ऐकावं
त्यांची जळजळ, मळमळ सारं काही पचवावं
डोहात सोडलेल्या पायांना लाटांनी कुरवाळावं
सागराला मिळण्याआधी आपणच 'सिंधु' व्हावं...

खळखळणाऱ्या झऱ्यासारखं धावणं कधीच थांबलं
बांधाच्या धाकाने वहाणंही विसरलं
मैला जमा होणारं 'नालेपणच' उरलं
नदी व्हायचं स्वप्न मनामध्येच विरलं...

                                            --सुकृता

चांद्रयान!

लेकीसाठी केलेले बडबडगीत..

चांद्रयान!
                  5/2/2009

चंद्रावरती जाणार होतं
आपलं पहिलं चांद्रयान
त्यात बसून जाण्याचा
दिला होता मलाच मान...

चंद्रावरती जाण्यासाठी
राहिले होते दिवस चार
कौतुक झाले फार फार
रातोरात झाले 'स्टार'...

शेपटीपाशी लागलेली
आग विझवत कशीबशी
कळले नाही माझे मलाच
कधी पोहोचले चंद्रापाशी...

फोटो घेतले चांदण्यांचे
चंद्राच्या आकाशातून
पृथ्वीकरून 'मेसेज' आला
बघ आम्हाला दुर्बिणीतून...

दुर्बिणीतून बघितल्यावर
वाटले जावे आईकडे
हट्ट करणार कोणाकडे?
एकटीच होते मी तिकडे...

आता मात्र धीर सुटला...

आता मात्र धीर सुटला
जोराने रडु फुटले
बाबांनी उठवल्यावर
पटकन झोपेतून उठले...

                   -सुकृता

हा, ही आणि तो, ती...

डोईवरच्या भाराने
'तिची' मान वाकलेली...
नेकलेस नाही मिळाला
म्हणून 'ही' रूसलेली...

पाठीवरती ओझं वाहून
'त्याची' पाठ सोललेली...
अन् शर्टाची घडी मोडली
म्हणून 'ह्याने' तलवार काढलेली...

'त्याने' बेवडा म्हणून मार खाऊन
रात्र फुटपाथवर घालवलेली...
'ह्याने' मात्र status जपत
Drinks घेऊन गाडी चालवलेली...

अलिशान फ्लॅटमध्ये      
'ह्यांची' पार्टी रंगलेली...
कचरा उपसून पार्टीचा
'त्यांची' बोटं भंगलेली...

माय गेली म्हणून 'तिने'
कामाला दांडी मारलेली...
कामवाली आली नाही
म्हणून 'ही' कावलेली...

हक्काच्या रजेसाठी 'आम्ही'
युनियन joined केलेली...
'त्यांना' मात्र रविवारची
सुट्टीही नाकारलेली...

सुकृता पेठे

समाजऋण

कधीकधी मनात येतं किती सुखकर बनवलं आहे 'समाजाने' आपलं आयुष्य...
अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण एकही काम माणसांची मदत न घेता करू शकत नाही.
मग ते सकाळचा टुथब्रश, टुथपेस्ट असो...की साबण शॅम्पु, तेल...टाॅवेल, कपडे, पेपर, दुध आणि काय नाही ते आठवा...आपण अगदी सहजपणे एका पाठोपाठ एक वस्तु वापरत असतो...अगदी झोपेपर्यंतच नाही तर नाईट लॅम्प, मछ्छरदाणी, गाद्या, उश्या, पांघरूण, औषधं अशा अनेक वस्तु झोपल्यावरही आपले लाड करत असतात.
कारखान्यात कोणीतरी मेहनत घेऊन त्या वस्तु बनवतात.  मग त्यात इंजिनिअरस्, डिझाईनरस् तसेच लक्षावधी कामगार सगळेच आले. प्रत्येकाचा वाटा तितकाच महत्वाचा... तितकाच कठीण...
पण बऱ्याचवेळा श्रेय, मान मरताब, गलेलठ्ठ पगार जातो बुद्धीजीवींना आणि कष्टकरी मात्र दळीद्रीच राहतो. आपण फक्त शाळेत शिकतो... श्रमाला मोल असतं वगरै वगैरे...
अलिशान घरं, लिफ्टस्, हाॅटेलस्, रस्ते, फ्लाय ओव्हरस् कोण बांधतं? आणि ते बांधणारे मजूर... कुठे राहतात ते?
वस्तुंचं आहे तसंच सेवांचं... वीजपुरवठा, पाणीपुरवठा, दुरध्वनी आणि अशा अनेक सेवा आणि त्यांच्या यंत्रणेतील बिघाड दुरूस्त करणारे हजारो कुशल, अकुशल कामगार, सफाई कामगार...कसे जगतात ते सगळे?
आपण शाळेत, काॅलेजमध्ये शिकतो. त्या यंत्रणा चालवण्यासाठी सरकार त्यात पैसा ओतते. कुठून येतो तो पैसा? तुम्ही, आम्ही आणि कोट्यवधी लोकांकडून येतो...पण खरंच हे सगळं त्या सगळ्या कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचतं का?
की फक्त आपण मुठभर जणं भाग्यवान आहोत?
गाड्या, रेल्वे, विमानं अशी हवी ती वाहतुकीची साधनं, ट्राफिक पोलीस, लिफ्टस्....अन्न पदार्थांची रेलचेल, फळफळावळ, कपड्यांचे ढीग... खरोखर पूर्वीच्या राजा-महाराजांना पण मिळालं नसेल अश्या सुखसोयी आणि ऐश्वर्य हात जोडून आपल्या समोर उभे आहेत. हे सगळं कोणा एकामुळे किंवा फक्त पैश्यांमुळे नक्कीच शक्य नाही होणार...हे अनेक माणसांमुळे शक्य आहे. प्रत्येक जण आपापली भूमिका निभावतात म्हणून सारे सुरळीत चालु रहाते. यातल्या एखाद्याने जरी कामात कचराई केली की बिघडतंच सगळं...
त्यामुळे ह्या समाजातील प्रत्येक घटक अनमोल नाही का?
प्रत्येक वस्तु हातात घेताना, कोणतीही सेवा उपभोगताना, यामागे कोण धडपडतं, कोण राबतं म्हणून मला हे मिळतं असा विचार केला की आपोआप कृतज्ञतेचे भाव मनात जागे होतात...
"समाजऋण" "समाजऋण" म्हणतात ते हेच की...
मग फेडुया ना जसं जमेल तसं तसं...

सुकृता पेठे

स्पर्धा

From Gharkul April 2013

आईबाबांचं बोट सोडून
अंगणामध्ये धावत सुटले...
बालवाड्यांच्या "गल्ल्यां"मध्ये
पायांना मग पंखच फुटले...

"गल्ल्यां"मधून विहरताना
कोण कुठले दोस्त भेटले...
"रस्ता" दिसल्यावर शाळेचा
"गल्ल्यां"चेही पाश सुटले...

रस्त्यावरची गर्दी पाहून
स्पर्धांचे जणु पेवच उठले...
जीवघेण्या स्पर्धेसाठी
रस्त्यांना "शाॅर्टकट" फुटले...

"रस्त्या"वरून फिरताना
'सुंदर सारे' टिपणार होते...
आता मात्र पळताना
हातात आले 'दगडगोटे'...

स्पर्धेमध्ये धावताना
ब्रेकवरचे हात सुटले...
वेग इतका की कळेना
कुठले पाय अन् चाक कुठले...

दहावीच्या तिठ्यापाशी
रस्ते जरा धूसर झाले...
इतकी धावले, इतकी धावले...
तरीही ट्राफिक जामने गाठले...

लोंढ्यांबरोबर धावत सुटले
सायन्ससाठी गिअर्स टाकले...
बारावीच्या जंक्शननंतर
धावून धावून टायर फाटले...

पुन्हा एकदा रस्ते ब्लॉक,
ट्राफिक जाम, मार्ग खुंटले...
मागे वळून गर्दी बघून
क्षणभर थांबून डोळे मिटले...

डोळे उघडून, झापड सारून
मनात काही बेत आखले...
गाडी सोडून चालत चालत
जाण्याचे ठिकाण गाठले...

गाडी सोडून चालत चालत
जाण्याचे ठिकाण गाठले...

- सुकृता पेठे

शाळासोबत्यांचे स्नेहसंमेलन

माझ्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील मित्रमैत्रिणींना....

दहावी पास होऊन यंदा 25 वर्ष झाली म्हणून...
जमलो आहोत आज सगळे आठवणींना गोळा करून...

मुलांचे केस गेलेत.. पोट थोडं सुटलं आहे...
मुलींनीही 'वाढण्याचं' मनावर घेतलं आहे...
तरीसुद्धा आज आपल्या 'शाळेमध्ये' आलो म्हणून...             बाकांवरती बसु चला पुन्हा एकदा लहान होऊन...
       
रंग उडलाय भिंतींचा...फळे जुने झाले आहेत...
बाकांवरती कोरलेल्या खाणाखुणा  मिटल्या आहेत...
मराठीच्या कविता अन् गणिताचे पाढे म्हणून...
डोक्यावरती घेऊ चला वर्ग आरडाओरडा करून...

डब्यामधला खाऊ कसा सगळे वाटून खात होतो...
एवढंसं 'रबर' सुद्धा नवीन म्हणून दाखवत होतो...
करूयात मोकळा गळा...सारखा कसा येतोय दाटून...
हसूयात आज खूप डबडबलेले डोळे मिटून..                        

'बाई' जरा थकल्या आहेत 'सर' ही वाकले आहेत...
नावं आपली आठवण्याच्या कामामध्ये गुंतले आहेत...
कान धरून त्याचवेळी शिक्षकांनी रागवलं म्हणून....
येऊ शकलो आज इथे कोणीतरी मोठे बनून...

मैदानातल्या मारामाऱ्या अन् एकमेकींच्या कागाळया...
गळून पडल्यात केव्हाच...पण मैत्री तेवढी उरली आहे...
शिक्षकांचे आशीर्वाद अन् सोबत्यांचा स्नेह घेऊन...
येत राहु शाळेत असेच, शाळेचे ऋण म्हणून...
येत राहु शाळेत असेच, शाळेचे ऋण म्हणून...

सुकृता पेठे

5 जुलै 2015
मंतरलेल्या तीन दिवसांमधला परमोच्च क्षणांनी भारावलेला दिवस....
डाॅ. प्र. ल. गावडे यांच्या भाषणानंतर शाळेविषयीचा अभिमान द्विगुणीत करणारा दिवस...

दिवाळी

लक्ष लक्ष दिव्यांच्या सोनेरी किरणांनी उजळून निघणारी दिवाळी...
फटाक्यांच्या धडाक्यांनी दुमदुमून जाणारी दिवाळी...
आप्तेष्टांच्या भेटीगाठी आणि शुभेच्छांनी सुखावून टाकणारी दिवाळी...
आकाशकंदील लावून आकाशालाही सामील करून घेणारी दिवाळी...
बेरंगी दिवस रंगरांगोळ्यांनी सुशोभीत करणारी दिवाळी...
कटू, बेचव दिवस गोड-धोड पदार्थांनी मधुर बनवणारी आणि शेव, चकली, चिवड्यानी चमचमीत बनवणारी दिवाळी...
नवपरिणीत वधूसारखी नटूनथटून बसणारी दिवाळी...
चार दिवसांच्या सोनेरी मखरात दागिन्यांनी मढवून बसवलेल्या देवीसारखी दिवाळी...
साऱ्यांच्या ओठावरचे इवलेसे स्मित पाहून मोठ्याने खिदळून हसणारी दिवाळी...
नितळ सुस्मित दिवसांवर गोड खळीप्रमाणे खुलून दिसणारी दिवाळी...
आभूषणांच्या गर्दीतही कंकणांप्रमाणे नाजूक किणकिण करणारी दिवाळी...
आकाशकंदीलाच्या झिरमिळ्यांप्रमाणे आनंदाच्या एका हलक्या फुंकरीबरोबर झिरमिळणारी दिवाळी...
भुईनळ्याच्या हजारो हसऱ्या चांदण्यांप्रमाणे खिदळणारी दिवाळी...
भिरभिरणाऱ्या भुईचक्राप्रमाणे नाचत, बागडत गिरक्या घेणारी दिवाळी...
आनंदाच्या तुषारांनी प्रफुल्लीत करणारी दिवाळी...
वर्षाच्या ओंजळीत मोगरीच्या फुलासारखे सुगंधात न्हाऊन निघालेले दिवस टाकणारी दिवाळी...
संस्कृतीच्या राजस वैभवाचं दर्शन देणारी दिवाळी...
परंपरेचं भारदस्त रूप दाखवणारी दिवाळी...
चैतन्य आणि उत्साहाला आव्हान देणारी दिवाळी...
दिव्यांच्या महालाचे  स्वप्न साकार करणारी दिवाळी...
प्रकाशाला लोभसवाणा आकार देणारी दिवाळी...
ठिणग्यांच्या धावपळीला होकार देणारी दिवाळी...
शांततेला फटाक्यांचा झंकार देणारी दिवाळी...
स्वर्गातल्या अप्सरांच्या मुग्ध हसण्या-खिदळण्यात भूवर ओघळलेले आनंदाचे असंख्य टपोरे मोती उत्साहाच्या लहरींबरोबर सर्वत्र पसरवणारी दिवाळी...
तुम्हा सर्वांना आनंदाची, आरोग्याची, भरभराटीची आणि सुखसमृद्धीची जावो!

सुकृता पेठे

डॉ. प्रकाश बाबाआमटे चित्रपटाच्या निमित्ताने

"डॉ. प्रकाश बाबाआमटे" सारखा चित्रपट बघितला की अस्वस्थता वाढते...पण ही अस्वस्थता सकारात्मक असते....अंतर्मुख करणारी असते.
भले समाजकार्य करणारे समाजसेवा त्यांच्या स्वतःच्या आनंदासाठी करत असतील पण आपण जे करतो त्या कामातून आपण स्वतः आणि इतर आनंदी होत आहेत का हे आपण कधीच नाही तपासायचे का?
नाही आपण त्यांच्यासारखे असामान्य...आपण हे मान्य करू. पण रोजच्या जगण्यात फक्त कुरकुर, तक्रारी आणि "यांनी हे केलं पाहिजे"  आणि "त्यांनी ते केलं पाहिजे" असं करत जगताना आमची मनं इतकी का बोथट बनत्तात की समोरच्याच्या वेदना पाहून आम्हाला गुदगुल्या होतात, समोरच्याचा आक्रोश आम्हाला दिसतच नाही? नोकरीसाठी केलेला प्रवास, घरातली कामं, ह्या स्वतःसाठीच केलेल्या गोष्टींचं आम्ही इतकं भांडवल करणार की जणू काही हे आम्ही इतरांवर उपकारच करत आहोत.
आपण ज्या भौतिक सुखाच्या मृगजळाचा उपभोग घेतोय त्यातील कितीतरी जीवनावश्यक 'सुखवस्तू' न लाभणारे आपल्यापेक्षा कितीतरी जास्त लोकं आहेत.  सोप्या शब्दात सांगायचं तर Underprivileged! आता त्यांना मदत करायला सगळ्यांनाच जमेल असं नाही पण जे अशी मदत करत आहेत त्यांना सहकार्य तरी करू शकू ना...थोडासा हातभार तरी लावू शकू ना...
स्वतःवर "सामान्य" असं Label लावायचं आणि मग खूप सारी Licenses मिळवायची.
पाहिलं म्हणजे रडायचं. स्वतःचं दुःख हे जगातलं सगळ्यात मोठ्ठ दुःख आहे आणि समाजात मीच एक काय तो अन्यायग्रस्त प्राणी आहे...ह्याचं 'रडगाणं' रोज गायचं लायसन्स!
दुसरं म्हणजे तक्रारखोरीचं. समोरचा प्रत्येक जण पण माझ्या सारखा दोन हात, दोन पाय, एक डोकं असलेला 'सामान्य' आहे हे सोयीनं विसरून त्याने कसं चुकीचं काम केलं, चुकीची सेवा दिली, चुकीचं आयोजन केलं, चुकीची व्यवस्था केली ह्याची आम्ही केव्हाही, कुठेही आणि कितीही वेळा तक्रार करणार...अहो, फुकट मिळतं ना हे लायसन्स...काढायला काय??
तिसरं म्हणजे 'काही न करण्याचं'. एकदा मी सामान्य आहे हे मान्य झालं ना मग मला काहीच असामान्य करायला नको. सगळं काय ते तुम्ही करा आमच्यासाठी...आम्ही जगण्याचं किती मोठ्ठ काम करतोय?..आणि करा की 'तुम्ही' थोडे  कष्ट सहन.... मी नाही का Lunchtime पर्यंत उपाशी राहत? मी नाही का नोकरीत मोठ्या पदावर आहे आणि...ही अशी असमान्यांची कामं करायला वेळ आहे कोणाला?...असो....

सुकृता

कोडगेपणा दे गा देवा

हसले असते इतरांना दु:खामध्ये पाहून...
झाले असते 'सुखी' , आत्ता आहे त्याहून...
द्यायचंस तर 'जाड, बोथट' मन तरी द्यायचं...
तलम माझं मन सरळ परत तरी घ्यायचं...

केलं नसतं कोणतंही काम मन लावून...
फसले नसते दरवेळी जबाबदारी घेऊन...
द्यायचंस तर 'निर्ढावलेलं' मन तरी द्यायचं...
स्वत:लाच दोष देत किती वर्षं रहायचं...

झाले नसते कोणत्याच आव्हाना तयार...
झेलले नसते कोणाचेच वल्गना अन् वार...
धाडस अन् जिद्दीचं थोडं कमी माप द्यायचं...
'वेड'घेऊन पेडगावला जायला शिकवायचं...

राबले असते, 'डोके' जरा बाजुलाच ठेवून...
झुकले असते दगडांना देवपण देवून...
द्यायचंस तर भरभरून 'उणे'पण द्यायचं...
कळत असून असं कसं 'मंद' होऊन रहायचं...

थकले आता धावून वाटे थांबावेे असे...
पावलांचे मीच माझ्या पुसावे ठसे...
कशाला कोणाला पुन्हा असं चुकु द्यायचं...
जाणीवांना आता पुरं थंड होऊ द्यायचं...

सुकृता

जंगलातील पाऊस

माझ्या १०वीत (१९९० मध्ये) मी केलेली एक कविता...

जंगलातील पाऊस

त्या नभीच्या सूर्यकिरणांवरती
काजळी दाटली
पिंजला कापुस अन् विणली
भयानक सावली...१
ह्या जटा भालावरी की फासले
कुणी भस्म हे
स्वैर दवडुनी मत्त झाले
पवनही काळावले...२
विचकल्या कुणी दंतपंक्ती हास्य
गडगडले जणु
दचकुनी न्याहाळती थरकापले
मनीचे अणु...३
कुजनांचे नाद गळले संपली
कुजबुज ती
चंचु त्या मिटल्या तरी  किलबिलती
मनीची भीती...४
थांबले जरी रव पदांचे
शोधती ते आसरे
'मू्र्ख' आहे एकटा तो,
मुख ज्याचे हासरे...५
नाचवुनी तो पिसारा चक्षु
मेघात पेरतो
'मू्र्ख नाही मी, गड्यांनो'
परीपरीने सांगतो...६
थांबले भांबावणे,
थरकापणेही थांबले
कुंभ हातातील जेव्हा
या धरेवर सांडले...७
शुष्क कंठांची तृषाही
भागली, थंडावली
चित्कारली केकावली
घुमल्या तुताऱ्या जंगली...८

सुकृता पेठे

कुण्या एकीचे मनोगत...


काल अचानक College मधल्या झाडावर कुसुमाग्रज अन् विंदा दिसले. 'मराठी दिन' होता म्हणून टांगलेल्या तक्त्यांतून ते चक्क हसले. "मागे वळून बघू नको ", असं म्हणत त्यानी मलाच हटकलं. 'तुम्हाला मराठीची काळजी का वाटते?' असं काहीसं त्यांना विचारायचं असावं. पण मी त्यांना फारसं बोलूच नाही दिलं. Whatsapp वरून मिळवलेलं सगळं ज्ञान पाजळून मराठीची मलाच किती  काळजी ते त्यांना  सांगितलं.
त्या दोघांना तसेच विचाराधीन सोडून, "Auto"ला बोलावून Station कडे निघाले. जाताजाता Whatsapp च्या वेगवेगळ्या Groups वर मराठीची महती सांगणारे वेगवेगळे  messages forward केले. मग Facebook वर पण थोडें मराठीचे गोडवे गायले. मनातले अपराधी भाव मनामध्ये लपवून माझ्या खांद्यावरची सामाजिक जबाबदारी उतरवून धन्य धन्य झाले.
तरी समाधान होईना. मग Train मध्ये बसल्या बसल्या Google वरती विंदांच्या दोन ओळी शोधून, माझं Whatsapp चे Status अगदी मराठीमय केलं.
त्यादिवशी घरातसुद्धा मराठीचा फतवा काढून आमच्या Moms च्या group वर  कौतूकाचे भरपूर Smileys मिळवले. 'You know' ने सुरूवात केली तरी कटाक्षाने मराठीतच बोलून English चे अज्ञानसुद्धा मराठीने झाकलं. मुलांना Blue, Pink ऐवजी निळा किंवा गुलाबी असे शब्द वापरायला लावले. किती हसली माझी मुलं... पण मी नाही हो मराठीची कास सोडली. English Medium मध्ये आहेत ना मुलं... म्हणून... बाकी काही नाही.
तरीसुद्धा झोपताना माझं 'उणेपण' मुखवट्याच्या पाठीमागून माझ्याशी हसलं. मराठी बाण्याचे उसन्या आवाचे फसवे चष्मे काढल्यावर सारं काही स्वच्छ दिसलं. 'वाचावे उदंड' विसरून गेले... न वाचण्यामुळे जमा झालेलं अज्ञान विनाकारण झाकत गेले. आता 'मी' वापरत नाही म्हणून नामशेष व्हायला मराठी काही इतकी लेचीपेची आहे का?  काळाप्रमाणे ती बदलत जाईल. वेगवेगळ्या भाषांमुळे ती अधिकाधिक  समृद्ध होत राहील. कारण संवाद साधण्याचे ते एक माध्यम आहे. विचारांच्या देवाणघेवाणीसाठी ती लागणारच. पण Forwards च्या भाऊगर्दीत संवाद, चर्चा ह्यांना आपणच कमी महत्व द्यायचं आणि मग मराठीची कणव आणून गळे काढायचे... कोणी सांगितलं असं करायला मला? Modern आहोत हे दाखवताना ओढूनताणून English वापरायची. आता English बोलले तरी विचार Modern असणार ह्याची शाश्वती आहे का?
डोळे उघडून आजुबाजुला पाहिले, वाचले कि कळते कित्येक वल्लींना भरपूर भाषा येतात. कित्येक जण छान छान लिहितात आणि कोणत्याच भाषेला कमी-जास्त न लेखता अनेकांशी संवाद साधतात. जमेल का आपल्याला तसं??

सुकृता

वृद्धांच्या वेदना



ओठात अस्फुट स्मित अन् थंडावलेल्या भावना...
गोठल्या संवेदना उरल्या केवळ वेदना||

काळ सरला, हावही.. विरळ झाली कामना...
जर्जरला देह, विधींचा विसरही पडला मना||

सोबती सोडून गेले.. राहिल्या खाणाखुणा...
थांबला हा काळ अन् मन हे पुढेच जाईना||

संपला अर्थ तरी क्षणही नि:शब्द जाईना...
ना कळे संदर्भ अन् भानावरी मन राहीना||

गात्र थकली.. चालणे ना शक्य आधाराविना...
कापऱ्या हातात काही राहीना पडल्याविना||

ना स्मरे गोतावळा नात्यांचा बोधही होईना...
स्मरतो पिता, भावंडं अन् 'आई' मनीची जाईना||

कोण ती कमला, रमा की वत्सला की वंदना...
वेणी-फणी घालून फिरण्या नेत कोणी साधना||

भासे कधी भगीनी, कधी नाती, कधी लेकीसुना...
भासे कधी जननी सह्य होती मग ह्या यातना||

सुकृता पेठे

आरसे

आरसे

एकाचवेळी स्वत:चे इतके चेहरे बघून खरं तर गांगरूनच गेले मी! आरश्यांचंच दुकान होतं ते... सगळीकडे आरसेच आरसे... पण सगळे आरसे सारखे नव्हते. आकार वेगळे,  फ्रेमस् चे रंग वेगळे, प्रत्येक फ्रेमवरचे नक्षीकाम वेगळे....
ते रचूनही वेगवेगळ्या कोनात ठेवले​ होते. त्यामुळे प्रत्येक आरशात माझे वेगवेगळे​ चेहरे दिसत होते आणि तेसुद्धा वेगवेगळ्या अँगलस् मधून...
एका आरशात मला मी बावळट वाटले, तर दुसऱ्या आरशात स्मार्ट दिसले... समोर पाहिलं तर लाजरीबुजरी वाटले अन् आतल्या बाजूला ठेवलेल्या आरशात पाहिलं तर काँफिडण्ट वाटले... एका बाजूच्या आरशात जरा जास्तच प्रेमळ वाटले तर दुसऱ्या बाजूने काहीशी करारी वाटले....
एका बाजूला राजमहालांमध्ये शोभेल तसा कोरीवकाम केलेला मोठ्ठा आरसा होता...वाटलं आपणही बेगम साहेबांसारखी दिसतेय का बघावं... म्हणून टिकली काढून, ओढणी डोक्यावरून​ घेऊन, 'नखरेलपणे' त्या आरशात​ पाहिलं...
"क्या बात है...मेमसाहब, आप तो एकदम शहजादी लग रही है..." , तो आरसेवाला मला चढवण्यासाठी म्हणाला असेल....पण मला खरंच क्षणभर खूप छान वाटलं...
एकेक आरसे बघत होते... जणु मी मलाच नव्याने पहात होते...एका कोनाड्यात दाटीवाटीने ठेवलेल्या आरशात चक्क काही रुपेरी केस अन् चेहेऱ्यावर  सुरकुत्या आहेत असा भास झाला आणि मी पटकन त्या कोनाड्यापासून लांब झाले. मग स्वत:चेच आश्चर्य वाटून पुन्हा मागे वळून त्या कोनाड्यात​ल्या आरशात पाहिलं तर चक्क एखादी पंचवीशीतली तरूणी मोहकपणे मागे वळून बघतेय असं वाटलं... पुन्हा आश्चर्य...
सहज बाजूला बघितलं पुन्हा नवा अवतार...आपण असे बंडखोरही दिसू शकतो तर....
कधी भीत्री तर कधी धीट वाटले...कधी सरळ तर कधी वाकडी वाटले... पण कशीही असले तरी प्रत्येक आरशातल्या त्या त्या भावनेत सच्ची वाटले...

"आप किस प्रकारका आईना लेना चाहती है, मेमसाहब?"... आरसेवाल्याच्या प्रश्नाने एकदम भानावर आले...
"आप सबको आईना दिखाते है...कभी आपभी झाँकके देखते है?"...न राहवून मी त्याला विचारलं.
बुजूर्ग वयाच्या त्या आरसेवाल्याने डोळे बारीक करून माझ्या डोळ्यात पाहिलं...चेहेऱ्यावर स्मित आणून  विचारलं, "खुदको पेहेचाननेको आईना क्यू चाहिये?"....

....त्यानेच शिफारस केलेला एक आरसा पॅक करून गाडीत ठेवायला सांगितला... माझ्या कारचे आरसे 'Rear View' साठी व्यवस्थित ॲडजस्ट करून गाडीचा गिअर टाकला....

सुकृता