Saturday, February 2, 2019

Save girl child

#savegirlchild

आई... थांब, उठू नकोस. मी तुझ्या स्वप्नात हाका मारते आहे तुला... ओळखलस? नाही ना? अगं मी तुझी मुलगी... दुसरी मुलगी. बरोबर आहे... तू कशी ओळखणार मला? पण, मी नाही विसरणार तुला. कारण तुझ्याशिवाय कोणालाच मी बघितलं नाहीये. तसं तुला तरी कुठे बघितलं आहे. पण तुझी स्पंदनं मला जाणवायची... मी हरखून जायचे... त्या स्पंदनाबरोबर मी झुलायचे... त्या ठेक्याचा मला नादच लागला जणु... इतका की एक दिवस माझ्यातही ती स्पंदने धडधडू लागली. तुझी स्पंदनं आता माझी झाली होती.
अजून एक जीवघेणं आकर्षण होतं. ते म्हणजे तुझ्या श्वासाचं. तुझ्या प्रत्येक श्वासाबरोबर मला चैतन्य मिळायचं... हवहवसं वाटणारं, मोहक आणि आश्वासक. कधी एकदा बाहेर येऊन मीही असाच श्वास घेईन असं वाटायचं.

मी रोज वाढत होते. माझ्या एकेक जाणिवा तयार होत होत्या. आणि या सगळ्याबरोबर मी तुझ्यात गुंतत होते. मला तुझीच ओढ वाटत होती. अवघा ६०, ६५ दिवसांचा सहवास पण तुझ्या उबेत मी तुझ्याशी एकरूप झाले होते. एक दिवस अचानक माझ्या भोवती लाटा आल्या.... मी थरथरले. पण त्या दिवसानंतर तू बदललीस. तुझ्या मनात कसले वादळ होते मला कळलं नाही. पण तू दुःखी झाली होतीस हे मला कळत होतं. मला नाळेतून मिळणारे अन्नरस एकदम निरस झाले होते. तुझ्या स्पंदनांची लय मध्येच चुकत होती. मी दचकायचे...किंचित घाबरायचे. पाण्यात असूनही ओलावा कमी झाल्यासारखा वाटत होता. ते चार-पाच दिवस मी तुझ्यासारखीच, तुझ्याइतकीच अस्वस्थ होते. दोनशे दिवस मोजायला मी तयार होते पण असं वाटलं की तूच तयार नव्हतीस...

आणि दोनच दिवसात तुझी धडधड खूपच वाढली... नाळ कडक झाल्यासारखी वाटली... अचानक माझ्या भोवतीचा उबदार कोष फुटल्यासारखा वाटला... कोणी तरी मला तुझ्यापासून ओरबाडून घेत होतं... नुकत्याच फुटलेल्या हातांनी तुला पकडण्याचा मी खूप प्रयत्न केला गं... ... .... पण माझी नाळ तुटली आणि सगळी शक्ती संपली... कोणी दुष्टाने मला तुझ्यापासून असं दूर केलं? आई, तुला पण मी आवडायचे ना गं? मग तू काहीच कसं केलं नाहीस?

एक विचारायचं होतं म्हणून तुझ्या स्वप्नात आले. आई, पुन्हा एकदा मी तुझ्या गर्भात मुलगी बनूनच आले तर मला वाचवशील ना?

सुक‌ता पेठे

#savegirlchild