Monday, July 13, 2020

एका रात्रीची गोष्ट

एवढ्या रात्री मी क्वचितच बाहेर पडते. सगळीकडे अगदी चिडीचूप होते. कुठून बुद्धी झाली आणि हे भलतेच आव्हान स्वीकारले असे झाले. काय तर म्हणे 'रात्रीच्या वेळी, न घाबरता, फोन न वापरता दक्षिण मुंबई मधून अंधेरीला चालत येईन...'
एक तर या भागात कधीही न फिरल्यामुळे रस्त्यांचा काहीच अंदाज नाही. ऐकले होते की मुंबई कधीच झोपत नाही तेव्हा म्हटले लोकांना विचारत विचारत पोहोचू... पण इथे हे काहीतरी वेगळेच दिसत होते. रस्त्यावर साधे चिटपाखरूही नव्हते, विचारणार तरी कोणाला? बरे, फोन वापरला तर पैज हरणार त्यामुळे माझा फोन चालू होतोय का याकडे सगळे मित्र-मैत्रिणी एका साॅफ्टवेअरच्या मदतीने डोळे लावून बसले होते.
मी फक्त चालत राहिले. रस्त्यावर माणसे नसली तरी तो रंगीबेरंगी दिव्यांचा खेळ विलोभनीय होता. एकटी असूनही मला चक्क भीतीचा लवलेशही नव्हता याचे आश्चर्य वाटले. न संपणारा सरळ रस्ता कोणता आहे हे एकदातरी हळूच गूगल मॅपवर बघावे असे विचार मनात येऊ लागले असतानाच एका मोठ्या गेटबाहेर एक वाॅचमन दिसला. मला अगदी देवदूतच दिसावा असा आनंद झाला.
मी त्याच्यापाशी जाऊन हा कुठला भाग आहे आणि मला अंधेरीला जायला कुठली दिशा घ्यावी, अशी चौकशी करू लागले. पण त्याने अतिशय सभ्यपणे तो या नोकरीवर अलिकडेच लागला आहे आणि मुंबईमध्येच नवीन असल्याने त्याला इथली काहीच माहिती नसल्याचे सांगितले. "पण तुम्ही आत जा, कोणीतरी नक्कीच सांगेल", असे म्हणून ते भले मोठे जाड लोखंडी पत्र्याचे गेट माझ्यासाठी उघडले. आत जावे का नाही हा विचार शिवण्यापूर्वीच आतला झगमगाट आणि माणसांची अगदी मोकळेपणाने चाललेली लगबग बघून मला आत जायला काहीच धोका नाही असे वाटून गेले. जाता जाता बाहेर कंपनीचे नाव बघून घेतले... dreams.transmitters.com!
असे नाव पहिल्यांदाच ऐकत होते पण तसेही माझे सामान्य ज्ञान फारसे काही चांगले नसल्याने त्याचे आश्चर्य वाटले नाही. एकंदरच दिवस आहे का रात्र हे कळत नव्हते इतका लखलखाट होता सगळीकडे. नावावरून आणि आत दिसणाऱ्या व्यवहारावरून तरी मला ही कंपनी  "चित्रनगरी" अर्थात "बाॅलिवुडशी" संबंधित एखादी प्राॅडक्शन कंपनी असावी आणि आत कसले कसले चित्रीकरण चालले असावे असे वाटले.
"या मॅडम, dreams.transmitters.com मध्ये तुमचे स्वागत आहे", एक हसतमुख देखणा तरूण माझी तंद्री तोडत म्हणाला.
"नाही... माझे काही काम नाही... मी रस्ता चुकले आहे... मला...अंधेरीला जायचा रस्ता सांगता का?" मी गडबडीत विचारले.
"नक्कीच, पण तुम्ही प्रध्यापिका आहात ना...त्याही फिजिक्सच्या... मग आम्हाला जरा मदत करू शकाल का?" त्याने विचारले.
आता मात्र मी हैराण झाले. मी गळ्यात चुकून काॅलेजचे आय कार्ड वगैरे घालून फिरतेय की काय एकदा तपासले.
"नाही नाही... आमचा डेटाबेस वर्ल्डमध्ये टाॅप-क्लास आहे. माझ्या लेनसेस् ना  स्कॅनर आहे. फेस स्कॅन झाला की त्या व्यक्तीची सगळी माहीती एका झटक्यात मला ऐकवली जाते... हे काय... हा काही साधा इअर फोन नाहीये..." असे म्हणत त्याने आपला कानावरचा  चिमुकला वायरलेस इअर फोन काढून दाखवला.
"पण अशी कोणाचीही माहिती कशी काढू शकता.. हे तर..." माझे वाक्य पूर्ण होऊ न देता त्याने आपले ऑफिशिअल आय-कार्ड दाखवले आणि म्हणाला,"Nothing unofficial madam... everything is official here... Govt licence ahe... या कॅम्पसमध्ये आमचे हेड ऑफिस पण आहे. We are dream senders... we transmit dreams to people..."
"मी अशी कंपनी असते असे कधीच ऐकले नव्हते...", प्रामाणिकपणे माझे अज्ञान मी कबूल केले.
"फारच कमी जणांना ते माहिती असते... rather आमच्या व्यवसायाविषयी मालक आणि एम्प्लाॅइज सोडून फारशी कोणालाच माहिती नसते..." तो तरुण बेफिकीरीने म्हणाला.
"Dreams transmitters... स्वप्नांचे प्रसारण?? मी तरी कधी ऐकले नाही... ", काहीसा संशय आल्याने मी न राहवून म्हटले.
"Hidden business आहे हा.... मिडिया मध्ये एखादी गोष्ट आली नाही की तुम्हा लोकांना नाहीच कळत नाही ना...", तो म्हणाला.
"माझ्याकडून काय मदत हवी आहे?", काहीच कळत नसल्याने मी वैतागून विचारले.
"एका विद्यार्थ्याच्या स्वप्नात जायचे आहे. त्याला इलेक्ट्रोडायनॅमिकस् ची  दोन-तीन एक्स्प्रेनस् लिहून दाखवा...that's all...बाकी तो आपोआप घाबरेल जरा दचकून उठला आणि परत झोपला की  मग आम्ही स्वप्न दृश्य #2 टाकून देऊ."
"मला काहीच कळत नाहीये...आणि मला का पकडले आहे तुम्ही?" मी भांबावून गेले होते त्याच्या बोलण्याने.
"अहो, साठ्येचा आहे विद्यार्थी... चार वर्षांपूर्वीचा... आपण पटकन सीन घेऊया का? अडीच वाजले आहेत मला पावणे तीनला पाठवायचा आहे सीन. मग पुढचा ड्रीम सीन ठरलेला आहे... माझी शिफ्ट बदलते तीन ला... आपण बोलू...", त्याने नम्रपणे केलेली विनंती मी मोडून शकले नाही.
मी आत गेले. दगडी काॅलेजच्या अर्ध्याच भिंती होत्या. त्याला लागूनच एक मोठा वर्ग. एका लांबच लांब फळा दिसला. फळ्यावर मी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटॅन्शियल काढायचा एक प्रोब्लेम सोडवून दाखवू लागले... एक विद्यार्थी ओळखीचा वाटला पण बाकी भलतीच मुले बसली होती समोर. शिकवायची हौस असल्याने मी आपली शिकवू लागले. जेमतेम दोन-तीन मिनिटे बोलले असेन किंवा नसेन..."कट" असे शब्द ऐकले आणि थांबले.
"खूप छान... thank you madam... ", असे म्हणून त्या मघाच्या तरुणाने आपल्या असिस्टंटकडे पाहिले.
"Sent sir...", कॅमेरा सारखे दिसणारे यंत्र हातात घेतलेल्या त्या असिस्टंटने ते दृश्य पाठवून पण दिले आणि तो पुढच्या कामाला गेला.
आम्ही तिथून पुढे गेलो. आजुबाजुला सारखे असे "cut...", "sent...", "retake.." आवाज येतच होते.
त्याने मला कॅन्टीनमध्ये नेले. दोन काॅफी ऑर्डर करून एका टेबलाशी बसलो.
"Thanks madam... माझे नाव आदि.. मी Educational Dreams Section चा हेड आहे. मला अगदी टेन्शन आले होते... माणसे मिळत नव्हती आणि अगदी देवासारख्या तुम्ही इथे पोहोचलात..."
माझा प्रश्नार्थक चेहेरा आणि एकूणच काय घडतेय ते काहीच कळत नाही आहे हे ओळखून तो सांगू लागला.
"आमचे काम आहे लोकांना स्वप्न पाठवायचे. त्यामुळे आमचे बहुतेक काम हे रात्रीच चालते. प्रत्येक शहरात, नगरात वेशीजवळ आमची ऑफिसेस् आहेत. सर्वांना रोज स्वप्न पाठवता येतात असे नाही पण आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांची त्यांची स्वप्ने पाठवतो."
तेवढ्यात समोरून दिपिका पदुकोन, आलीया भट आणि जॅकलिन फर्नांडिस येताना दिसल्या. त्यांनी आदीला बाय केले आणि आपली आजची ड्युटी संपली व त्या खूप थकल्या असे त्याला सांगून त्या बाहेर गेल्या.
मला आश्चर्य वाटून तोंडाचा 'आ' होण्याआधीच तो म्हणाला,"डुप्लिकेट आहेत हं या... सगळ्यात जास्त डिमांड असते यांना..."
"मला तुमचे बोलणे खरे वाटत नाहीये", मी त्याला स्पष्टपणे सांगितले.
"सहाजिकच आहे... पण हे खरे आहे... अहो, प्राचीन काळापासून हा व्यवसाय सुरू आहे. पूर्वी स्वप्न दृश्य त्या त्या जागी जाऊन करून दाखवावी लागत. राजाश्रय सुद्धा होता त्याला अनेक ठिकाणी... स्वप्न ओळखणारा हा फार हुशार आणि सतर्क असावा लागे. "मनकवड्या" माणसांनाच हे काम मिळे. लोकांच्या मनातील गोष्टी ओळखून तसे स्वप्नदृश्य त्या व्यक्तीला रात्री गाढ झोपेत असताना दाखवायचे आणि तेही त्या व्यक्तीला अजिबात जाग न येता... घरात शिरून किंवा खिडकीतून दिसेल असे... म्हणजे फारच कठीण होते. निजण्याच्या जागेपाशी खिडकी असावी असा शेवटी फतवाच काढला गेला त्या त्या देशाच्या राजांकडून. व्यापारी, ज्योतिषी यांच्या व्यवसायासाठी तसेच शत्रू राज्यात बंड माजवणे, खबरी  काढणे अशा कामांसाठी या व्यवसायाचा उपयोग करत. आता सरकारी दरबारात असे खाते नसावे...बहुतेक तरी... पण आमच्या लोकांच्या प्रायव्हेट कंपन्या आहेत. टेक्नाॅलाॅजीमुळे आमचे काम फार सोपे झाले आहे सगळे. सर्व लोकांचा डेटाबेस आहेच. आमच्याकडच्या वेगवेगळ्या ट्यूनरस् वर वेगवेगळ्या लोकांच्या मनातल्या गोष्टी कळतात... त्या त्या प्रमाणे आम्ही दृश्य चित्रीत करतो आणि त्या व्यक्तीच्या फ्रिक्वेन्सीला ट्रान्समिट करतो. दृश्य अगदी छोटी छोटी असतात, तुटक असतात आणि त्याला काही  sequence असतो असे नाही त्यामुळे डिटेलस् सेम नसले तरी फरक पडत नाही. ठिकाणही कोणते आहे ते त्या व्यक्तीला पटकन कळत नाही. म्हणून तर या डुप्लीकेट हिराॅईनस् ना खूप डिमांड आहे... आणि परिक्षा जवळ आल्या की शिक्षक, प्राध्यापक यांना...
"पण आत्ता कुठे आहेत परीक्षा?", मी विचारले.
"परीक्षा नसल्या तरी कधी कधी एखाद्या विषयाचा धसका असतो ना... मग काय... ज्यांच्या त्यांच्या मनी असे ते स्वप्नी दाखवावेच लागते आम्हाला... आवडो किंवा नावडो..." आदी हसत म्हणाला.
भूताची स्वप्न, कुठेतरी हरवल्याची स्वप्न, नोकरी गेल्याची स्वप्न, परीक्षेत नापास झाल्याची स्वप्न... आम्हाला आवडत नाहीत खरेतर अशी स्वप्न दाखवायला पण काय करणार त्या व्यक्तीला तेच बघायचे असते त्याला आम्ही तरी काय करणार... समजा आम्ही त्यात बदल करून positive करून पाठवले तर त्या व्यक्तीचा ट्यूनर ते स्वीकारतच नाही... frequency match च नाही होत...  मग काय सिग्नल वाया जातो..."
"आजकाल day dreaming चे प्रमाण पण वाढले आहे. नको त्या साईट्स आणि नको ती दृश्य सहज उपलब्ध आहेत... मग काय यांचे day dreaming सुरू...
पूर्वी दिवसा आराम असायचा आम्हाला... आता रात्रीपेक्षा दिवसाच जास्त काम असते.
आपल्या अब्दुल कलाम यांनी सांगितले आहे, “Dream is not that which you see while sleeping it is something that does not let your sleep." अशी स्वप्न पहा जी तुम्हाला आळशीपणाने लोळत पडू देणार नाहीत... पण तशी स्वप्न फार कमी जणं बघतात... आणि तशी स्वप्न आम्हाला चित्रीत करून पाठवावी नाही लागत."
"मला अजूनही खरे वाटत नाहीये... स्वप्न ही माणसाच्या शरीराच्या बाहेरून आत कशी येतील... ती तर आतून पडतात...", मी अविश्वासाने म्हणाले.
अगदी बरोबर बोललात मॅडम, पण जेव्हा तुमचा, तुमच्या "आतल्या स्वतःवर" विश्वास असेल तेव्हा आतून पडतील ना स्वप्न... बाहेरच्या बेगडी, व्हर्च्युअल जगाला खरे जग मानणाऱ्यांना बाहेरून कसेही influence करता येते ना... आमचे हेच कस्टमरस् आहेत. अहो, स्वप्न दृश्यात जे प्राॅडक्टस् नकळत दाखवतो त्या प्राॅडक्टस् ची डिमांड वाढतेच वाढते... म्हणून तर कंपनीला इतका झगमगाट परवडतो", आदी काॅफी संपवत म्हणाला.
"एक विचारू? मघाशी... माझ्या दृश्यात काय होता असा hidden product? मला नाही लक्षात आला...", मी प्रांजळपणे विचारले.
"नाही, त्यात प्रॉडक्ट काहीच नाही... तो ओळखीचा असा वाटणारा चेहरा तुमच्या विद्यार्थ्याला त्याचा वाटावा असा शोधला होता. आम्ही माहिती काढली. त्या विद्यार्थ्यांला चार विषयात ATKT आहे. चार वर्ष झाली एकही पेपर सुटत नाहीये. एकेक वर्ष एकेका विषयाचा अभ्यास केला असता तरी सुटले असते विषय.. पण हा पठ्ठ्या परीक्षा आली की मगच अभ्यासाला हात लावतो... आम्ही अशी त्याच्याच मनातील भीतीची स्वप्न पाठवून त्याचे मन तसेच कमकुवत ठेवतो. मानसिक खच्चीकरण झालेला माणूस आत्मविश्वास गमावतो आणि आळशी बनतो... "झटपट यश आणि पैसे मिळाले" अशी स्वप्न पाहू लागतो... इथे आम्ही त्याची नाडी कॅप्चर करतो... त्याला यशस्वी दाखवणाऱ्या स्वप्नदृश्यात आम्ही त्या व्यक्तीचे स्टेटस वाढवणारे प्राॅडक्टस् टाकतो... माईंड प्रोग्रॅमिंगचे विविध क्लास, ॲपस्, काउन्सलरस् च्या साईट्स, गॅजेटस्, मोबाईल, पेनस्, घड्याळे, कपडे... बास आमचे काम झाले... पुढचा कमकुवत माणूस शोधायचा... कमकुवत frequencies शोधायच्या, आणखी कमकुवत करायच्या आणि मग आमच्या प्राॅडक्टस् चा प्रभाव त्याच्या मनावर पाडायचा... सगळा मनाचा खेळ... तुमच्या मनावर अधिराज्य करतात ही स्वप्न...
"पण हे बरोबर नाही...", मला राग आला होता.
"माहित आहे पण आम्ही नाही पाठवली स्वप्न तरी ते स्वतः पण तशीच स्वप्न बघतात... आम्ही नाही खच्चीकरण केले तरी ते भितीदायक स्वप्न बघणारच...आम्ही नाही त्यांना भुलवणारी दृश्य दाखवली तरी ते तशी बघणारच... मग आम्ही दाखवली तर बिघडले कुठे? फक्त आम्ही दाखवतो दृश्य त्यात आमच्या क्लायंटस् चे प्राॅडक्टस् टाकतो..."
माझा पेशन्स संपत चालला होता... "मला अंधेरीला कसे जायचे सांगता का?", मी न राहवून म्हणाले.
"अरे हो, आमच्या दुसऱ्या गेटने बाहेर पडलात की लगेच अंधेरीच आहे... चला मी सोडतो,"असे म्हणत त्याने मला दुसऱ्या गेटपाशी नेले. वाॅचमनला खूण केली. गेट उघडले आणि समोर चक्क अंधेरी स्टेशन दिसले. झपझप चालत घरी आले एकदाची. मी पैज लावली होती ते मित्र-मैत्रिणी बहुतेक आपापल्या घरी गेले होते. सोसायटीच्या गेटपाशी कोणीच दिसले नाहीत. मलाही 'जिंकले' म्हणून आनंद साजरा करण्यात फारसा interest नव्हता. पटकन आवरून झोपून गेले.

सुकृता पेठे

Saturday, May 30, 2020

ह्या लॉक डाऊन मध्ये आपण काय नाही पाहिले?

हसताना पाहिले, कुणा रडताना पाहिले
दुसऱ्याचे अश्रु कुणी पुसताना पाहिले...

उद्योगधंदे छोटेमोठे गडगडताना पाहिले 
कुणी संधीसाधूं खिसे कापताना पाहिले...

'मास्क'मागे क्रूरपणा लपवताना पाहिले
वासनांध त्यांची तृषा शमवताना पाहिले...

घरात बसून जगणे परवडताना पाहिले
घरी जाण्यासाठी परवड होताना पाहिले...

आविष्कृत, सूप्त कलागुणांना पाहिले
व्हर्च्युअली का असेना दिग्गजांना पाहिले...

हरवलेल्या स्वप्नांसाठी झुरताना पाहिले
सुंदर उद्याच्या आशेवर झुलताना पाहिले...

आयुष्यभर तुंबड्या भरून ठेवताना पाहिले
त्यांना, संताचा आव आणून बोलताना पाहिले...

आपापले झेंडे धरून लढताना पाहिले
माणुसकीचा झेंडा त्यात तरताना पाहिले...

पाखरांना मुक्तपणे विहरताना पाहिले
हिरवाईला धुराविना बहरताना पाहिले...

रुग्णसेवा करणाऱ्या मानवांना पाहिले
राबणाऱ्या पोलिसातल्या देवांना पाहिले...

स्वजनांना अखेरचा निरोप देताना पाहिले
बरे होऊन अनेक परत येताना पाहिले...

वाटले होते लाॅकडाऊनमध्ये बंद होईल सारे
वाटले नव्हते मनाची अशी उघडी होतील दारे...

सुकृता पेठे
कधी वाटते मुक्त भन्नाट व्हावे
कधी उंबऱ्याने मला थोपवावे...

कधी उंच इतुके की आकाश भ्यावे
कधी जानकीसम भूतळी लुप्त व्हावे...

कधी तारकांना चमकुनी लाजवावे
कधी गुप्त कित्येक अंधार प्यावे...

कधी वीज होऊन वेगास ल्यावे
कधी वाटते गोठूनी स्तब्ध व्हावे...

कधी क्रोध उधळून वन पेटवावे
कधी शांततेने तरल व्यक्त व्हावे...

कधी रिक्त व्हावे, कधी मी फुलावे
कधी मी दिसावे, नि अदृश्य व्हावे...

कधी हास्यरंगात रंगून जावे
कधी आसवांच्या डोही बुडावे... 

कधी भरभरोनी मी प्रपंचास प्यावे
कधी पंचत्वे विरघळोनी निजावे...

सुकृता पेठे