Tuesday, April 26, 2022

Robot R2-563!

गोष्ट चार वर्षांपूर्वीची आहे. College ची टर्म पुढे गेल्यामुळे तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा जरा उशीराने आटोपल्या आणि यंदा चक्क जून अर्धा आणि जुलै महिनाभर सुट्टी मिळणार होती. त्यामुळे मी अगदी आनंदात होते. संध्याकाळी अमर घरी आला आणि माझ्या आनंदाला उधाण येईल अशी बातमी दिली. एका ट्रेनिंगसाठी त्याला अमेरिकेला जायचे होते. Company त्याला spouse सकट journey sponser करणार होती. और क्या चाहिए! जवळपास ४० दिवसांची वारी होती. कंपनीच्या वतीने जाणार असल्याने व्हिसा वगैरे पटापट आला आणि माझ्या सुट्टीच्या पहिल्या दिवशी आम्ही चक्क ढगांमधून मार्गक्रमण करत होतो. लॉसएंजिल्सला आल्यावर पहिले काही दिवस थोडी भटकंती झाली. काही नातेवाईकांना भेटलो, मित्रमैत्रिणींना भेटलो. नंतर अमरचे ट्रेनिंग rigorously सुरू झाले आणि माझ्या वाट्याला कंटाळवाणा एकांत असणार याची मला कल्पना आली. अजून महिनाभर बाकी होता. तेव्हा वेळीच उपाययोजना करावी असे ठरवून मी आपण रोज सकाळी बाहेर पडायचा बेत केला.

तशी मला कुठेही फार थंडी वाजते. पण इकडे नुकताच summer सुरू होत होता. त्यामुळे बाहेर फिरताना मला अति थंडीचा त्रास होत नव्हता. चांगले २७, २८ डिग्री तापमान असायचे.

आमच्या हॉटेलच्या समोरच एक महाकाय मॉल होता. रोज एकेक दालन बघितले तरी माझे पंधरा दिवस सहज जातील आणि आप्तेष्टांना देण्यासाठी घ्यायच्या भेटवस्तू घाईघाईत न घेता चांगला वेळ देऊन घेता येतील, असा विचार करून मी या मॉलची भेट निश्चित ठरवली. अमर सकाळी निघाला की माझे आटपून मी दहा-साडेदहाच्या सुमारास निघायचे.

मॉल समोरच असला तरी डावीकडे जवळपास अर्धा किलोमीटर अंतर चालत जाऊन मग एक क्रॉसिंग लागायचे. ते घेऊन परत तितकेच मागे यावे लागायचे. पण माझ्याकडे वेळच वेळ असल्याने मी आनंदाने चालत जायचे. एकदा चालायचा कंटाळा करून मी तेवढ्याच अंतरासाठी टॅक्सी केली.

दोन-तीन दिवस माझा तो प्रवास पाहून मला वॉचमनने गेटच्या उजव्या बाजूला असलेले underground tunnel दाखवले. रस्ता क्रॉस करण्यासाठी असलेला तो भुयारीमार्ग होता. जवळपास एक किलोमीटर एवढे अंतर कमी होणार असल्यामुळे मी लगेचच त्या भुयारीमार्गाने जाऊन बघूया असे ठरवले.

साधारण दहा-बारा पायऱ्या उतरल्यावर एक काचेचे दार लागले. Sensor मुळे आपोआप उघडले. आपोआप उघडणारी दारे आपल्या इथेही असल्यामुळे त्याचे मला काही नवल वाटले नाही. परंतु मी आत पोहोचतो न पोहोचते तोच लहान मुलाच्या आकाराचा एक रोबोट माझ्या समोर आला. 

"Good Morning!" त्याने अगदी माणसासारखे wish केले. 

असा स्वतः हून बोलणारा रोबोट मी पहिल्यांदाच पाहत होते उत्स्फूर्तपणे मीही त्याला गुड मॉर्निंग म्हणाले. 

"Mam will you please pay me dollar two?"

ओह... आत्ता लक्षात आले की हा भुयारी मार्ग वापरण्यासाठी पादचाऱ्यांना सुद्धा इथे टोल भरावा लागत असावा. मी निमूटपणे दोन डॉलर काढून दिले. त्या रोबोटने मला "थँक्यू" असे म्हणून अभिवादन केले आणि तो बाजूला झाला. टॅक्सीला लागणाऱ्या पैशांपेक्षा दोन डॉलर खूपच कमी असल्यामुळे रोज हाच मार्ग घ्यावा असे मी ठरवले.

दोनच दिवसात रोबोट चक्क माझ्या ओळखीचा झाला. म्हणजे त्याने माझे नाव विचारले व मी त्याचे. त्यामुळे सकाळी भेटल्यावर नुसते गुड मॉर्निंग ऐवजी गुड "मॉर्निंग मिसेस पेठे" अशी साद येऊ लागली. असा  intelligent robot मी प्रथमच पाहत होते. खरे सांगायचे तर त्याला बघण्यासाठीच, त्याला भेटण्यासाठीच हा भुयारी मार्ग घ्यावा असे मला वाटू लागले होते. 

ओबडधोबड असले तरी माणसासारखे गोलट डोके, चालण्यासाठी हात-पायांची आपल्यासारखी हालचाल, डोळ्यांच्या जागी LED व त्यांच्याभोवती ring cameras आणि बोलताना हलणारे ओठांच्या जागी असलेले फ्लॅपस्! गुड मॉर्निंग म्हणताना हे फ्लॅपस् काहीसे रुंद व्हायचे व तो रोबोट हसतो आहे असे भासायचे. इंग्लिश सिनेमामधून बघायला मिळालेला रोबोट असा प्रत्यक्ष बघताना मजाच वाटायची. त्याचे नाव R2 होते. कधी तो लांब असेल तर मीच त्याला हात हालवून "हॅलो R2" अशी हाक मारून बोलवून घ्यायचे आणि दोन डॉलर त्याच्या हातावर टिकवायचे. टिकवायचे म्हणजे बहुतेक वेळा माझे smart card त्यांच्या हातावर tap करायचे आणि पैसे आपोआप debit व्हायचे.

मी त्या R2 च्या जणू प्रेमातच पडले होते. एकदा दहा डॉलरची नोट होती म्हणून पुढे केली तर "No Change available" असे तो म्हणाला. तेव्हा जास्त पैसे पण अगदी सहज सोडले त्याच्यासाठी.

संध्याकाळी अमर लवकर आला की आम्ही दोघे कुठे कुठे फिरायचो. एक दिवशी त्याच्या तिथल्या colleague ने dinner साठी आमंत्रण दिले. Mr. and Mrs. Frank दांपत्य फारच उत्तम आदरतिथ्य करत होते. Mrs. Roseline Frank या intelligent services मध्ये अधिकारी होत्या. मला याचे फार कौतुक वाटले. गप्पांच्या ओघात मी माझ्या छोट्या मित्राचा म्हणजेच R2 चा उल्लेख केला. पण माझे ते कौतुक ऐकताना Frank दांपत्याचा चेहरा मात्र गंभीर झाला होता. माझे पूर्ण सांगून झाल्यावर Mrs. Frank जवळजवळ किंचाळत म्हणाल्या,"You should not pay those Begger Robots...!"

मला काही कळेना. माझा गोंधळलेला चेहरा पाहून त्यांनी खुलासा केला.

तो रोबोट टोल घेत नसून चक्क भीक मागत होता. "रोबोट आणि भीक? म्हणजे? कोणी माफिया असे robots करून भीक मागायला लावतात का?" डोक्यात एक नाही अनेक प्रश्न घोंघावू लागले.

"These are outdated and out of use robots. Now a days in USA such robots are creating a big nuisance. They beg money from people... just like beggers. One should not pay them." रोझलीनने सांगितले.

"Oh... Then why don't you arrest them?", माझा स्वाभाविक प्रश्न होता. "No... it is not that easy. They do not rob people. So we can't arrest them. Afterall they are not humans...", रोझलीन कळकळीने सांगत होती.

तोपर्यंत Mr. Frank यांनी dinner तयार असल्याचे सांगितले आणि आम्ही खास अमेरिकन डिशेसचा आस्वाद घेऊ लागलो. 

इतक्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा चालल्या होत्या की तो विषय थोडा मागे पडला. पण मनात राहून राहून R2 चा विचार येत होता.

दुसऱ्या दिवसाची मी अगदी आतुरतेने वाट पाहत होते. कधी एकदा जातो आणि त्या रोबोटला पैसे नाकारतो असे झाले होते. म्हणजे त्याचा राग आला नव्हता. उलट, रोबोट्स असे भीक का मागत आहेत हे जाणून घ्यायची मला उत्सुकता वाटू लागली. 

नेहमीप्रमाणे मी भुयारी मार्गाच्या आत शिरले. आपोआप उघडलेले दार बंद झाले. मी R2 ला शोधू लागले. पण जास्त शोधावे लागले नाही. 

"गुड मॉर्निंग मिसेस पेठे!", असे म्हणत R2 लगबगीने चालत माझ्यापाशी आला. 

"Will you please pay me dollar two?", R2 ने नेहमीप्रमाणे आदबशीरपणे विचारले आणि आपला हात पुढे केला. 

आता खरे काय ते माहिती झाल्याने मला तो R2 केविलवाणा वाटू लागला.

"Well, I am not paying today", मी निश्चयाने म्हणाले.

"Please..." R2 चा आवाज थोडा मार्दवयुक्त वाटू लागला. 

"You need to pay Mrs. Pethe... I don't expect your denial." R2 म्हणाला.

"No...not today", असे म्हणून मी पुढे जाऊ लागले. तर R2 चक्क माझी वाट अडवू लागला. मी सावधपणे इकडेतिकडे पाहिले. तर टनलमध्ये नेमकी मी एकटी होते.

मागे वळून बाहेर पडावे असा विचार करून मी वळले. तर तोही गर् कन फिरून परत माझ्यासमोर वाट अडवून उभा. खरेतर एव्हाना मी आले म्हणून सेन्सरने दार उघडायला हवे होते. पण ते जाम झाले असावे. उघडलेले नाही. 

"झाले होते की केले गेले होते?"  मनात शंका आली आणि मन चरकले. 

तोपर्यंत R2 थोडा आक्रमक झाला आणि माझे मनगट पकडून म्हणाला, "Mrs. Pethe, you can't ignore me. I want 2 dollers." 

त्याच्या डोळ्यांच्या LED ची intensity वाढली होती बहुदा. असा भास झाला का ती खरीच वाढली होती? मोबाईल गरम होतो तसा त्याचा हातही थोडा गरम वाटला.

हे सगळे इतक्या पटकन घडले की मला काही कळतच नव्हते.

आता माझा धीर खचला. त्या एवढ्याश्या R2 ला चक्क मी घाबरले. 

आता पर्याय नाही तर २ डॉलर देऊन सुटका करून घ्यावी या हेतूने मी म्हणाले,"R2, I will... I will pay Doller 2. But just tell me why are you begging?"

R2 ने हाताची पकड सैल केली. 

प्रश्न विचारला की लगेच उत्तर द्यायचा रोबोटस् चा innocence R2 मध्ये अजूनही टिकून होता तर. 

"I am generation 2 robot in R series. My actual number is 563. So one can say that my name is R2-563. But I was working in one Restaurant where I was the only robot from the R series. So people started calling me R2 as an abbreviation. I worked for 5 years and the owner brought new robots to serve in the restaurant. He just kept many of us on the roadside as a scrap for a garbage pick-up van..." 

R2 त्याची कथा सांगत होता. मला गंमत वाटली. त्याने माझा हात कधीच सोडला होता आणि तो आपली कथा सांगण्यात गुंतला. 

Loading...loading... कपाळावरच्या screen वर एक चक्र फिरू लागले.

R2 बहुदा पुढे काय झाले ते आठवत असावा. मला मजा वाटली.

"Out of 29875 hardware parts of my body, 4389 parts are malfunctioning. So may be I was not fit for the job in the Restaurant but I was not unfit to be put to scrap. But my designer has programmed us with a "survival instinct". Means I can still carry out many functions, do a lot of work and add value to the human world. The only thing I need is "maintenance" and many of my parts need to be replaced."

R2 ने ही गोष्ट आपल्या मालकाला सांगायचा प्रयत्न केला होता. पण आपल्या श्रीमंतीच्या मस्तीत मश्गूल असलेल्या मालकाने सरळ नवीन robots ची order दिली आणि या जुन्या robots ना scrap म्हणून काढले. 

अजूनही मला robots ची survival instinct कळत नव्हती. 

मी त्याला सांगायचा प्रयत्न केला की आम्ही माणसेसुद्धा म्हातारे होऊन मरतो. कोणी कायम टिकत नाही. मग robots expired झाले तर बिघडले कुठे? 

"जिवंत नसलेल्या मशीनला कसली आलीये जगण्याची आस?" मी असे खोचक स्वगत मोठ्याने मराठीत बोलले.

"मिसेस पेठे, जगण्याची आस नाही; टिकून राहण्याची आस. माझ्या निर्मात्याने आम्हाला programmed करताना अशी टिकून रहाण्याची आस टाकली आहे आमच्यात", R2 चा translation mode ON झाला आणि तो मला माझ्या भाषेत उत्तरे देऊ लागला.

"भीक मागून करतोस काय मग त्या पैशांचे?", मला असलेला स्वाभाविक प्रश्न मी त्याला विचारला.

"माझी रेंज २०० मीटर आहे. चार्जिंग स्टाशनपासून २०० मीटर मी वावरू शकतो. त्या पलिकडे गेलो आणि नवीन चार्जिंग स्टेशन नाही मिळाले तर मी संपेन. Scrap Pick up Van मला उचलून नेईल. म्हणून आमच्या मालकाने आम्हाला ठेवल्यावर आम्ही दोघे-तिघे तिथून निसटून इथे खाली आलो. इथे चार्जिंग स्टेशन आहे. माझे निकामी झालेले parts बदलून घेणार आहे. त्यानंतर Second Hand Market मध्ये Parts Replacements चे Self Declaration देऊन स्वतःला कोणीतरी user शोधण्याचा प्रयत्न करणार. थोडक्यात स्वतःला विकण्याचा प्रयत्न करणार. पण ते करण्यासाठी मला Electronics Repairing and Spare Parts च्या दुकानात जायचे आहे. जे इथून जवळपास ४ मैलांवर आहे. तिथे पोहोचण्यासाठी आणि स्वतःला दुरूस्त करून घेण्यासाठी मला पैसे हवेत आहेत.

तशीही Market मध्ये आमची demand फार कमी आहे. सगळ्यांना latest robots हवे असतात. त्यांचे काही चूक नाही. पण ज्यांना नवीन रोबोटस् नाही परवडत ते आम्हाला घेतात. पण तरी आम्हाला money save करून ठेवायला हवा.", R2 पुन्हा एकदा story telling mode मध्ये गेला होता. 

"अजूनही मला तुझी पैशांची गरज कळत नाही आहे. एकदा का तुला new user मिळाला की तो करेल की तुझा maintenance", मी म्हणाले.

"How long?" R2 ने अगदी माणसांसारखा संवाद साधणारा प्रश्न विचारला. ज्याचे उत्तर समोरच्या माणसांकडून अपेक्षित नसते. 

"मी त्याच्या कामाचा असेपर्यंत तो माझी देखभाल करेल. नंतर मात्र पुन्हा मला scrap मध्ये टाकेल."

अजूनही मला कळत नव्हते की त्यानंतरही त्याला का टिकायचे होते? 

मी सरळ त्याला तसे विचारले. तसेही मशीनला काहीही विचारायला आपण घाबरतो कुठे? 

"Mrs. Pethe... My manufacturer doesn't take the responsibility of my disposal. This is my pain point. If some of my programs or parts don't work properly, my malfunction will start. Such malfunction can be dangerous for humans. I may start misusing my powers or I may do some wrong actions with my powers. 

माझ्या manufacturer ने स्वतः जबाबदारी नाही घेतली तरी मला कृत्रिम बुद्धिमत्ता देणाऱ्या माझ्या designer ने मात्र हा विचार करून आमच्यात स्वतःला जास्तीत जास्त टिकवून ठेवण्याचाच मुख्य उद्देश feed केला आहे. खरेतर माझ्या manufacturer ने Manufacturer's Extended Responsibility नुसार माझ्या विक्रीच्या पश्चात माझी योग्य ती विल्हेवाट लावायची जबाबदारी घ्यायला हवी. पण अशी जबाबदारी कोणी घेतच नाही. माझी एक मैत्रीणपण आहे... S3. Service Robot -  Generation 3, Serial no. 98756.

S3 तर माझ्याहून जास्त damage झाली आहे. तिला सतत charging करावे लागते. नाही केले तर तिचे अचानक spinning सुरू होते. Isn't that very dangerous? माझ्यावर तिचीही जबाबदारी आहे. Afterall, I have been programmed to take care of my subordinates as well." 

"Mrs. Pethe will you please pay me dollar 2?"

"Mrs. Pethe will you please pay me dollar 2?"

माझे २ डॉलर कधीच देऊन झाले होते. तरी तो तेच तेच repeat करू लागला. माझा रस्ता अडवून त्याने माझे मनगट परत पकडले.

पण अगदी हिंदी पिक्चरमध्ये घडते तसे झाले. अगदी नेमके त्याचवेळी, मघाशी जाम झालेले भुयारी मार्गाचे दार उघडले गेले आणि पोलीस आत आले. त्यांनी इलेक्ट्रिक जॅमर लावून R2 ला ताब्यात घेतले. CCTV कॅमेरामध्ये काहीतरी चुकीचे चालले आहे हे टिपले गेले आणि पोलिसांना alert मिळाला. त्याच दरम्यान रोझलीन फ्रॅंक R2 ची तक्रार सांगायला तिथे गेली होती. त्यामुळे तीही त्यांच्या बरोबर होती.

"आता R2 चे काय करणार?", माझी उत्सुकता सहाजिकच शिगेला पोहोचली होती.

"You can join us to see its further journey. After all such Social Work should be well acknowledged."

मी S3 विषयीसुद्धा तिला माहिती दिली. टनेलच्या junction पाशी एका Cross lane मध्ये S3 होती. तिचे spinning चालू होते. बघितल्यावर ते lane cleaning चालले आहे असे वाटत होते. तिला temporarily deactivate करून ताब्यात घेतले गेले.

मी झाला प्रकार फोन करून अमरला सांगितला आणि रोझलीन बरोबर तिच्या गाडीत बसले. 

जवळपास ७० मैल लांब असलेल्या मिस्टर जॉन आणि मिस शिरीन या दोस्तांनी सुरू केलेल्या Robot Care Centre (RCC) कडे आमची गाडी निघाली. आमच्या पुढेच असलेल्या व्हॅनमध्ये Temporarily Deactivate झालेले R2 आणि S3 स्तब्ध होऊन उभे होते.

RCC मध्ये पोहोचल्यावर मला पुन्हा एकदा चकित व्हायला झाले. 

इथे आलेल्या प्रत्येक रोबोटची निगा राखली जात होती.

Robot counsellors प्रत्येक रोबोटचाचा प्रोग्रॅम समजून घेऊन malfunction होत असलेला भाग reprogram करत होते. रोबोटच्या प्रकाराप्रमाणे तसेच त्यांच्या damage नुसार इथे वेगवेगळे कक्ष होते. "उपचार" झालेले अर्थात repairing and maintenance झालेले रोबोट्स RCC मध्येच आत्मविश्वासाने काम करत होते. 

मुद्दाम RCC मधून सेकंड हॅन्ड रोबोट घेऊन जाणारे सुजाण नागरिकही असतात असे कळले. तसेच रोबोट काम करेनासे झाल्यावर त्यांना आपणहून इथे आणून सोडणारेही असतात हे देखील कळले.

सगळ्यात शेवटी त्यांनी मला Adieu Section मध्ये नेले. या ठिकाणी पुढे सुधारण्याची अजिबात शक्यता नसलेल्या रोबोट्सना शेवटची तिलांजली दिली जात होती. त्यांना permanently deactivated करून त्यांचे सर्व भाग पद्धतशीर मार्गाने सुटे केले जात होते. सुटे झालेले बहुतेक भाग देखील recycling किंवा reusing पाठवले जात होते. जॉन आणि शिरिनच्या या प्रचंड उद्योगात शेकडो engineers, software experts यांना रोजगार मिळाला होता.

हा सगळाच अनुभव माझ्यासाठी खूप नवीन होता. पण आपल्याकडे ज्याप्रमाणात automation आणि robotic based projects वाढत आहेत, ते पाहता लवकरच इथेही RCC सारख्या संस्थांची गरज तयार होणार असे वाटून गेले.

E-Waste Management चे हे सुजाण स्वरूप मनातल्या मनात समजून घेत मी रूमवर परत गेले. 

यापुढे रोजच्या रोज मॉलला जाऊन सर्वांसाठी जास्तीत जास्त वेळा कोणतीतरी Electronics वस्तू घ्यायचा सपाटा मात्र आता आपोआप कमी होणार होता!


सुकृता पेठे

#scifi

सुनिल काका एक उमदं व्यक्तिमत्त्व

हसरा, दिलदार माणूस. जितका सुंदर चेहरा तितकंच सुंदर मन लाभलेले. कधीही तोंडातून अपशब्द ऐकले नाहीत की रागारागाने बोलताना पाहिलं नाही. खरंतर आवाज चढवून बोलताना पण कधी ऐकलं नाही...

मी गोष्ट सांगते आहे १९७० ते १९९० च्या काळातील. आम्हा तिघांच्या बालपणाच्या काळातील. 

आमचे घरमालक दाते कुटुंबियांशी आमचं नातं जुळत गेलं. सख्खे काका भिवंडीला रहायचे त्यामुळे वारंवार भेटीगाठी होत नसत. शाळेत काका, मामा, आत्या अशी नाती सांगताना दाते कुटुंबातील व्यक्ती पण धरल्या जायच्या आणि गोंधळ व्हायचा. दाते आजी आणि आजोबा यांची 'आमची आई' जणू मुलगीच झाली होती. "आमच्या अंबरनाथला ना असं असायचं..." अशा दाते आजींच्या गोष्टी ऐकताना आम्ही मुलं रममाण व्हायचो. दाते आजोबांना तसे इतर लोक घाबरायचे पण आम्ही मात्र अगदी अंगा-खांद्यावर खेळायचो. आजोबा गेले आणि माझी प्रकृती ढासळली कारण ते मला माझेच आहेत असं वाटायचं इतका जिव्हाळा होता.

सहाजिकच त्यांची मुलं म्हणजे अनिल काका आणि सुनिल काका हे आम्हाला आपले काकाच वाटायचे. अनिल काका वरणगावला असायचे आणि सुनिल काका पुण्यात.

गरीब-श्रीमंत, मालक-भाडेकरू असे भेद मानणाऱ्या समाजात दाते कुटुंबियांशी जुळलेला स्नेह हा इतरांच्या नजरेत भरेल असा होता. आमचे तिघांचे लाड आमच्या आईबाबांव्यतिरिक्त कोणी केले असतील तर त्यांनीच. 

बाबांची सायकल होती. सुनिल काकांनी पहिली स्कूटर घेतली. तेव्हा फेऱ्या मारायला आम्हीच होतो. कधी कधी कुठे जाताना काका, "चल येतेस का, स्कूटरने जाऊन येऊ" असं म्हणून घेऊन जायचे तेव्हा कोण आनंद व्हायचा. पुढे आयुष्यभर स्कूटर हा आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे तरी पहिल्यांदा काकांच्या स्कूटरवर बसलेला आनंद अजूनही विसरता येत नाही. तीच गोष्ट कारची. इतरांच्या वाहनांनी न जाण्याचा स्वाभिमान आईने पुरेपूर दिला होता. पण काकांच्या कारमधून कधी बसस्टॉपपर्यंत लिफ्ट मिळाली की मजा वाटायची. अमेरीकेला, फ्रान्सला गेलेली आम्ही तिघांनी पाहिलेली पहिली व्यक्ती म्हणजे सुनिल काका आणि तिथून आमच्यासाठी प्रेमाने हेअर ड्रायर आणि मेकॅनो आणणारी पहिली आणि एकमेव व्यक्ती सुद्धा सुनिलकाकाच! आता आम्हीच आमच्यासाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, मित्रमैत्रिणींसाठी हवं ते आणू शकतो आणि आणतो सुद्धा. पण आजही काही जणं परदेशातून आल्यावर हातावर चार गोळ्या टेकवतात तिथे त्याकाळी काकांनी आणलेल्या त्या गोष्टी आम्हाला अमूल्य वाटणारच ना! काकांनी तिथून पाठवलेली ग्रिटींगस् आम्ही जपून ठेवलेल्या लहानपणीच्या खजिन्यात अजूनही आहेत. त्यांनी परदेशी वारीची निरिक्षण पूर्वक केलेली वर्णने ऐकायला आम्हाला मजा यायची.

आईच्या ऑनलाईन पंचाहत्तरीच्या वेळी काका-काकूंचे लग्न जमताना आमच्या आईने घेतलेल्या सहभागाची आठवण सांगताना सुनिल काका भावुक झाले आणि ऑनलाईन कार्यक्रमातसुद्धा ओलावा आला. सगळ्यांचेच डोळे पाणावले. त्यांनी आणि मंजूकाकूने मुक्त कंठाने केलेली प्रशंसा ऐकून सगळ्यांनीच आपापले बंद कप्पे उघडून मोकळेपणाने मनोगते व्यक्त केली आणि कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. 

काका मनाने निर्मळ होते. म्हणूनच मोकळेपणाने बोलत. आईला म्हणत "वहिनी, तुम्ही स्वभावाने फार चांगल्या आहात. फक्त थोड्या reserved व्हा... तुमचा त्रास कमी होईल.." किती छान शब्दात समजावून सांगायचे... कुणावर राग धरून ठेवत नसत. 

निवृत्तीनंतरही अनेक गोष्टींमध्ये रस घेणाऱ्या काकांचं आम्हाला फार कौतुक वाटतं. म्हणजे ते फक्त तरूण दिसायचे नाहीत तर मनाने पण तरूण होते! आयुष्याकडे कायम सकारात्मकपणे बघणारे! 

त्यांना मंजूकाकूसारख्या विद्वान स्त्रीची साथ मिळाली म्हणूनच मिनू, मधू सारख्या गुणी मुली त्यांना लाभल्या. दिवसातला अर्धा वेळ मिनू, मधू आमच्या घरी असायच्या आणि आम्ही भरपूर खेळायचो. 

पुढे अनिल काका, अंजूकाकू पुण्यात आले. आम्हाला आणखी एक काका-काकू मिळाले. अमोद-अनुजा सारखे सोबती मिळाले. अनूशिवाय तर आमचा दिवस सुरू व्हायचा नाही.

स्थित्यंतरे होत गेली. आता सगळेच वेगवेगळ्या आयुष्यात वेगळ्या वेगळ्या वाटांवर चालत आहोत. पण आमच्या बालपणीच्या ज्या काही आठवणी आहेत त्यातील जास्तीत जास्त आठवणी दाते कुटुंबियांशी निगडित आहेत. तसेच सगळ्या दहा दात्यांवर आमचा अगदी सारखाच लोभ असला तरी का माहिती नाही कदाचित या सर्वांपेक्षा सर्वात अधिक सहवास लाभल्यामुळे असेल पण सुनिल काकांबरोबरचं नातं अव्यक्त असलं तरी सगळ्यात जास्त घट्ट विणलं गेलं होतं हे मात्र खरं! 

कदाचित ते सांगायला शब्द मिळत नाही आहेत. पण परवा रात्री काका गेले ही बातमी कळली  आणि आपोआप डोळे वाहू लागले... एकोणीस वर्षांपूर्वी  बाबा गेले, २०२१ च्या जुलैमध्ये आई गेली आणि आमच्या बालपणी आमच्याशी माणसासारखे वागून आमचे लाड करणारे सुनिल काका पण गेले... आठवणींचा पिसारा खूप रम्य वाटतो. पण एकेक मोरपीसं जशी गळून पडत आहेत तसे हताश व्हायला होतं आहे... आज हे वाचून "Well written Suku" अशी FB वर दाद द्यायला ते नाहीत. वयाने मोठं झाल्यावर काय दुःख असते हे आता कळते आहे.


सुकृता पेठे

अहमदाबाद, बडोदा सहल

 Day 1: 

सकाळी पावणेआठ वाजता अहमदाबाद एअरपोर्टवर पोहोचलो. OASES for U तर्फे अमर पेठे नावाचा बोर्ड घेऊन Innova Driver उभाच होता. सर्व प्रथम मोढेराच्या सूर्य मंदिराकडे निघालो. जाता जाता *अडलजची स्टेप वेल* पाहिली. पंधराव्या शतकाच्या शेवटी शेवटी बांधलेली ही विहीर, स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना होता. ईशामुळे आम्हाला त्याची उजेड आणि पाण्याची वैशिष्ट्ये समजावून सांगत होती.

नंतर *मोढेराचे सूर्य मंदीर* पाहिलं. दोन मंदिरे आणि एक मोठी स्टेप वेल. हजार एक वर्षांपूर्वी माणसे इतकी प्रगत होती आणि इतके उत्कृष्ट डिझाईनचे बांधकाम करत होती यावर विश्वास ठेवणे केवळ अशक्य वाटते. तेथील परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये गुजराती थाळीचा आस्वाद घेतला.

जेवल्यावर पाटण येथील *राणी कि वाव* बघायला गेलो. अति प्रचंड गर्दी होती पण परिसर इतका मोठा होता की ती गर्दी सहज विरून जात होती. ही एक वर्ल्ड हेरिटेज मध्ये समाविष्ट केलेली सात मजली विहीर आहे. तिथे गाईड घेतला होता. त्याने अनेक शिल्प उलगडून सांगितली. फ्रॅक्टल पद्धतीने केलेल्या पायऱ्या इथेही होत्या. तिथे पटोला साड्यांचे दुकान होते. पण सकाळपासून प्रवासात असल्यामुळे दमलो होतो म्हणून साड्यांकडे वळलो नाही. 

दीडशे किलोमीटर कापत एकदाचे हॉटेलला येऊन पोहोचलो. OASES for U कडून बुक झालेलं हॉटेल फोर स्टार आहे, अहमदाबाद शहरांमध्येच आहे आणि wowww आहे!

रात्री ईशाच्या फर्माईशी नुसार फूड-ट्रक पार्क येथे रात्रीचे खायला गेलो. शोअर्मा, अमृत्सरी पराठा, तंदुरी चिकन आणि त्यावर जामुन आणि दादागिरी शॉट्स आहा! खूप मजा आली!


Day 2: 

सकाळी मनसोक्त नाश्ता करून मग swimming pool वर पोहण्याचा आनंद घेतला आणि सगळं आवरून अगदी आरामात, दुपारी १२ वाजता *साबरमती आश्रमाकडे* जायला निघालो.

साबरमती आश्रमात जाणार या कल्पनेनेच माझे मन थरारून गेले होते. सबरमती नदीच्या काठावर हा आश्रम आहे.

साधेपणाचे, सात्विकतेचे तत्वज्ञान स्वतः जगून, जगासमोर आदर्श ठेवणाऱ्या गांधीजींचा जिथे निवास होता, त्या ठिकाणी गर्दी मात्र अजिबात नव्हती. लोकं होती पण खूप नाहीत. शांत आणि प्रसन्न वातावरण होते. गेल्या गेल्या समोरच विनोबा कुटीर आणि मीरा कुटीर अशा दोन्ही नावांनी ओळखली जाणारी एक कुटीर आहे. कुटीर म्हणजे काय एक खोली. माणसाच्या  गरजा कमीत कमी म्हणजे किती कमी असू शकतात! बाजुलाच गांधीजींचं घर. खरंतर 'गरीब माणसांसारखं मातीचं घर हवं' असा त्यांचा आग्रह होता. बी. व्ही. दोशी या architect नी त्यांना पक्क्या घराची आवश्यकता पटवून दिली... "नदीच्या पुरात कधीच वाहून जाईल, तुम्ही भारतभर फिरणार, घर सांभाळण्यासाठी कोणी नसल्यास दुरावस्था होईल..". हो/नाही करत पक्कं घर बांधलं गेलं. तीन खोल्या... एक गांधीजींची, एक कस्तुरबांची, एक पाहुण्यांसाठी. एक साधं स्वयंपाक घर आणि एक मोठी पडवी... इथेच बसून त्यांनी चरख्याची चळवळ चालवली, जगभरातील मोठ्या मोठ्या व्यक्तींनी त्यांची इथेच येऊन भेट घेतली... 

हीच ती जागा जिथे १९१८ ते १९३० ही गांधी पर्वातील महत्त्वाची वर्षे गांधीजी आणि कस्तुरबा राहिले. गांधीजींच्या घराच्याच पुढे चार्ल्स कोरिया नावाच्या भारतीय स्थापत्यशास्त्रज्ञाने डिझाईन केलेले गांधीजींचे संग्रहालय आहे. तसेच एक पुस्तकांचे दुकान व खादी ग्रामोद्योगचे दुकान आहे. येथे माफक दरात पुस्तके, सोव्हेनरस् तसेच खादीचे कपडे घेऊ शकतो. त्यानंतर स्वाती स्नॅक्स मध्ये जाऊन पोटपूजा केली. पॅंकी चटनी, फाडानी खिचडी, धनशाक भात, डाल ढोकळी, दाबेली असा स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेऊन जुन्या अहमदाबादकडे वळलो. *सिद्दी सय्यद नी जाली* पाहिली (अर्थात इथे बायकांना आत प्रवेश नाही). जुन्या अहमदाबाद मध्येच *हठीभाई नी वाडी* ला गेलो. तिथे एक जैन मंदिर होतं. मंदिराच्या खांबांवर आधी पाहिलेल्या स्टेपवेल मध्ये होती तशी हिंदू देवदेवतांची, अप्सरांची शिल्पे होती. आता जैन मंदिरात अशी शिल्पे काय करत आहेत हे काही कळेना. पण मंदिर सुंदर आहे. तिथून गांधीनगरमधील *अक्षरधाम मंदिर* बघायला गेलो. सणाचा दिवस असल्याने जवळपास लाखभर लोक त्यावेळी तिथे होती व दिवसभरात कित्येक लाख भेट देऊन गेली असतील. नेहमीप्रमाणे डोळे दिपवणारे अक्षरधाम मंदीर संध्याकाळी दिपमाळा लावल्यावर किती सुंदर दिसते ते पाहण्यचं भाग्य आम्हाला लाभलं. आता मात्र थकलो. हॉटेलला परतलो आणि जेवून झोपलो.


Day: 3

आजचा दिवस फक्त प्रवासाचा होता. त्यामुळे गाडीत बसून आवडीची गाणी ऐकणे, झोपणे किंवा बाहेर बघणे हेच काम करत होते. 

त्यामुळे निरिक्षणाला scope च scope होता. परवा अहमदाबादला उतरल्यापासून बघतो आहोत, इथे सगळ्यांच्या पांढऱ्या कारस्! पहिल्यांदा वाटले की आजुबाजुला सगळी tourist vehicles असतील म्हणून असेल पण नंतर सुद्धा city traffic मध्ये जास्तीत जास्त गाड्या पांढऱ्या! आणखी विशेष म्हणजे बऱ्याच इमारती आणि घरेही पांढऱ्याच रंगाची!

मुंबई एवढी लोकसंख्या कुठेच नसल्याने सगळेच रस्ते मोकळे! अशी सवयच नाहीये आपल्याला. बरेच सारे हायवेज 3, 4 किंवा 5 पदरी... लांब आणि रुंद. डोंगराळ भाग नाही त्यामुळे सरळच सरळ आणि पाऊस अगदीच कमी त्यामुळे खड्डे बिलकुल नाहीत. यंदा इथे खूपच कमी पाऊस झाला असल्याने नद्यांमध्ये मात्र खडखडाट आहे. अहमदाबाद वरून बडोद्याकडे जाताना १०० किलोमीटरचा लांबलचक महात्मा गांधी Expressway पार केला. नंतर ९० किमी वडोदरा-भरूच highway पार करून Statue of Unity या आमच्या सहलीच्या मुख्य आकर्षण बिंदूपाशी पोहोचलो. Google Map वर हा बिंदू दिसतो पण बिंदू कसला हा चांगला विशाल प्रदेश आहे!

केवाडिया स्थानकापाशी आमची इन्होव्हा थांबवली आणि Statue of Unity च्या Bus Service ने मुख्य स्थळापाशी पोहोचलो. Buses AC आहेत. ही सेवा मोफत आहे. साधारण ७ ते ८ किलोमीटर अंतर बसने गेलो. आणि यापुढे प्रत्यक्ष प्रवेशासाठी पुन्हा एकदा भली मोठी रांग. तरी रांग भराभर सरकत होती. आतमध्ये ५ Moving Walkway (सरकते मार्ग) आहेत. पुढे Viewing Gallery तिकीट असल्याने वर वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याच्या आत हृदयापाशी असलेल्या गॅलरीत जाऊन बाहेरील सरदार सरोवर आणि धरणाचे विहंगम दर्शन घेतले. खाली येऊन सरकते जिन्यांनी पुतळ्याच्या पावलांजवळ जाऊन परत एकदा त्या वास्तूची अवाढव्यता पाहून चकीत झालो. Statue च्या आवारात, आतमध्ये गेल्यावर व्यवस्था उत्तम होती. भरपूर टॉयलेटस् होती. Facility Attendances आहेत, Guides आहेत. खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, बसायला मुबलक जागा आहेत. त्यामुळे आत अत्यंत सुसह्य होते. 

प्रवेशद्वाराच्या जवळच असलेली Wall of Unity पुतळा बघून बाहेर येताना दिसली. १,६९,००० गावांमधून माती आणून ती भिंत बांधली आहे. मस्त वाटलं वाचून.

या सगळ्याची संकल्पना अतिशय सुंदर आहे. "देऊळ" चित्रपटासारखी Economy सुधारायला नक्कीच मदत होईल. 


Day: 4

आजचा दिवस तसा दगदगीचा नव्हता. सकाळी आवरून बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड यांचा लक्ष्मीविलास महाल पहायला गेलो. Bukingham Palace पेक्षा चारपटीने हा मोठा आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही शैलींचे मिश्रण असणारा हा महाल सयाजीराव गायकवाड ३ यांनी  Major Charles Mont या स्थापत्यकाराकडून तो बांधून घेतला. अजूनही पहिल्या मजल्यावर राजघराण्यातील वंशज निवास करतात. तिकीटे काढून बघायचा असल्याने इथेही फारशी गर्दी नव्हती. आलेले बहुतांश पर्यटक हे मराठी होते. गेल्या गेल्या प्रत्येकाच्या हातात एक पेनड्राईव सारखा Audiiplayee आणि Ear phone ची जोडी देतात. महालाच्या ११ भागांची माहिती त्यात recorded स्वरूपात ऐकता येते. माहिती ऐकत ऐकत आम्ही सगळा महाल फिरून पाहिला. हेवा वाटावा अशी श्रींमती आणि‌ डोळे दिपून जावे कसे वैभव! येथील माहितीपूर्ण संचयीत केलेले शस्त्रागार आणि दरबार हॉल या दोन जागा मला विशेष आवडल्या! यातील प्रत्येक शस्त्र कुठल्या ना कुठल्या युद्धात वापरले गेले होते.

तिथे निवास करणाऱ्यांचा खाजगीपणा जपला जावा यासाठी महालाच्या फोटोग्राफीला मनाई आहे.

त्याच परीसरातील फत्तेसिंह गायकवाडराजे यांनी तयार केलेले फत्तेसिंह म्युझियम पाहिले. राजा रविवर्मा यांनी काढलेली त्यांच्या घराण्यातील व्यक्तींची तैलचित्रे, देशोदेशीच्या मौल्यवान भेटवस्तू अन् कायकाय! 

त्यानंतर तांबेकर वाडा पाहिला. १८४९ ते १८५४ या कालावधीत बडोदा संस्थानचे दिवाण म्हणून काम पाहिलेल्या विठ्ठल खंडेराव तांबेकर यांचा हा वाडा पूर्ण पडझड झालेला आहे. हा वाडा पुरातत्व विभागाच्या ताब्यात गेला आहे. विटांचे बांधकाम असलेला हा वाडा टिपिकल मराठी पद्धतीचा आहे. आम्हाला उघडून दाखवलेली खोली कामकाजासाठी वापरली जात असावी त्याच्या सर्व भिंतींवर पुराण कथा चित्रित केल्या होत्या. 

बाकी फक्त पडझड झालेली ती वास्तू बघताना ईशाच्या सांगण्यावरून मन भूतकाळात जाऊन हा राहता असताना कसा कसेल हा विचार करू लागले आणि खूप मौज वाटली.

त्यानंतर उदरभरण करण्यासाठी Gujarati authentic थाळी खाण्यासाठी *मंडप* नावाच्या रेस्टॉरंट मध्ये गेलो. भरगच्च ताट पाहनच मन तृप्त झाले! जेवण चविष्ट आहे! 

ईशाची शाळामैत्रीण इथेच उतरली होती. त्यांच्याशी गप्पा मारताना आणखी एक ठिकाण कळले. 

The Indian Army Corps of Electronics and Mechanical Engineers (EME) यांनी बांधलेले दक्षिणामूर्ती मंदिर हे शिवमंदिर. हिंदू मंदिर असले तरीही हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारशी धर्मातील प्रतिकांचा वापर करून बांधलेले हे मंदिर भारतातील सर्वधर्मसमभाव अधोरेखित करणारे आहे. आर्मीचे असल्याने इथेही फोटोग्राफीला परवानगी नाही. मंदिर आणि परिसर  एकदम शांत, निवांत आणि प्रसन्न आहे.

रात्री तिथेच जवळपास २० वर्षांपासून रहाणऱ्या अमरच्या शाळामित्राने आवर्जून जेवायला बोलावले. सुंदर Duplex Bunglow घर आहे. तिथली खास गाठीया उसळ डीश, आयस्क्रीम आणि खूप साऱ्या गप्पा असा फक्कड बेत झाला. मुंबईच्या तुलनेत अशा बंगल्यांच्या जागा खूपच मोठ्या व शांत असल्याने वेगळेच वाटले. दुसऱ्यदिवशी पहाटेच्या विमानाने मुंबईला परतलो. चार दिवसाची अहमदाबाद बरोडा सहल मरगळलेल्या मनाला ताजेतवाने करून गेली.


सुकृता पेठे

कंगोरे

थोड्या टोकदार वाटत होत्या कडा आणि वेडेवाकड्या सुद्धा... पण कंगोरे एकमेकांमध्ये बसून गेले...गंवंड्याने तुटलेल्या फरशीला साधारण तसाच दिसणारा तुकडा जोडून दिला आणि 'जिगसॉ पझल' सुटावे असा आनंद झाला!

किती कठीण आहे कंगोरे असे एकमेकांमध्ये चपखल बसणे! मग ते कंगोरे कुठलेही असोत...‌ नात्यांचे, मैत्रीचे, शेजाऱ्यांबरोबरचे, सहकाऱ्यांबरोबरचे किंवा रस्त्यावर, बाजारात समोर येणाऱ्या अनोळखी व्यक्तीबरोबरचे असोत... 

कधी आपल्याला आपली धार बोथट करावी लागते तर कधी समोरची व्यक्ती अगदी सहजपणे वाकायला तयार होते आणि कंगोरे जुळत रहातात... आणि चित्र हळूहळू आकार घेत रहातं...

नाहीतर 'जिगसॉ पझल'च्या सुट्या  तुकड्यासारखा प्रत्येकजण कसा 'वेडावाकडा' आणि 'अर्धवट' दिसतो.... कोणाच्या 'इच्छा अपूर्ण'... कोणाची 'स्वप्न अधुरी'... कोणाचे 'भविष्य रखडलेले'... कोणाची 'नाती तुटलेली'... कोणाची 'दिशा भरकटलेली'... कोणाची 'साथ हरवलेली'... तर  कोणाचे 'छत्रच उडालेले'... कोणी 'अर्धे उमललेले', कोणी 'अर्धवट वयात' आलेले, कोणी वयाच्या 'अर्ध्या टप्प्याशी' घुटमळणारे, तर कोणी 'अर्ध्या श्वासावर'... शेवटचे श्वास मोजणारे...

कोणी कायम 'अतृप्त' तर कोणी नेहमीच 'अल्पसंतुष्ट'... कोणी 'फाटकी चिरगुटं' गुंडाळणारे तर कोणी 'तोकड्या कपड्यात' आनंद ढुंढाळणारे... कोणी भावनांना वाहू न देता कायमच  'थोपवणारे', तर कोणी संयम तोडणारे... कोणी घेतलेलं 'काम मध्येच सोडणारे' तर कोणी एखाद्या ध्यासापायी 'जगणं विसरलेले'...

सगळं जणू 'भंगलेल्यांचं' जग! किती 'भकास' दिसायला हवं खरं तर... भंगाराकडे आलेल्या 'मोडक्या तोडक्या' वस्तुंसारखं... एका 'उजाड' माळरानासारखं, 'तुटकी-फुटकी' शिल्प असलेल्या पुरातन मंदिरांसारखं... पण नाही... ते चक्क सुंदर दिसतं!  

तुकड्या तुकड्यांनी भरला असला तरी हा 'आयुष्याचा कॅलिडोस्कोप' या तुकड्यांचे सुंदर सुंदर आकार तयार करतच रहातो... 

कित्येकदा या 'अपुऱ्या तुकड्यांचे' कंगोरे एकमेकांमध्ये अगदी तंतोतंत बसून पूर्णत्वाचा एक लोभस आभास तयार होतो... हे 'पूर्णत्व' आभासी असले तरी कंगोऱ्यांचं एकमेकांमध्ये बसून झालेला 'जोड' आभासी नसतो... म्हणूनच त्या 'आभासी' पूर्णत्वाचे 'समाधान मात्र पूर्ण' वाटते हेच खरं!


सुकृता

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

लहानपणी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यातला फरक कळत नव्हता पण दोन्ही दिवशी फार भारी वाटायचे. ते दोन दिवस संपूर्ण वर्षभर मनामध्ये  देशाविषयी अभिमान, देशप्रेम टिकवून ठेवायला नक्कीच मदत करायचे. कक्षा रुंदावत गेल्यावर दोन्ही दिवसांचे वेगवेगळे औचित्य लक्षात येऊ लागले. लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य अशी लोकशाहीची व्याख्या कळली. प्रजासत्ताकाचा अर्थ कळू लागला. आपण स्वीकारलेल्या राज्य- पद्धतीमुळे आपण अतिशय सुंदर अशी लोकशाही पाळू शकतो हे कळू लागले. 26 जानेवारीची दिल्ली येथील परेड TV वर बघायची आवड बाबांनी लावली. एकाही दिवशी ती बुडवली नाही. पुढे 11 वी, 12 वी मध्ये, Prajakta Pethe  NCC मध्ये गेली. तिच्याकडून NCC च्या गोष्टी ऐकून फार मजा वाटायची. दुर्दैवाने माझी प्रकृती फारच कमकुवत असल्याने मला NCC मध्ये भाग घेण्याची घरून काही उत्तेजन नव्हते. तसेच माझा एक पाय फ्लॅट आणि एक पाय कमान असलेला असल्याने माझी निवड होण्याचीही काहीच शक्यता नव्हती.

तरीही NCC परेड बघणे, आपल्या सैन्याची परेड बघणे हे नेत्रसुख मी कितीही वेळ भान विसरून घेऊ शकते.

आता महाविद्यालयात शिकवताना जेव्हा जेव्हा भारतीय  सैन्यात, स्पेशल फोर्स मध्ये काम करणारी, पोलिस दलात काम करणारे विद्यार्थी येतात तेव्हा वाटेल तेवढे out of way जाऊन त्यांना परत शिकवताना, प्रात्यक्षिक परिक्षचे वेळापत्रक त्यांच्यासाठी त्यांच्या रजेप्रमाणे वेगळे करताना, वरिष्ठांकडून त्यांच्यासाठी काही खास सवलती मागून घेताना मला धन्य वाटते.... अर्थात हे काही अजिबात विशेष नाही याची जाणीव आहे. NCC च्या मुलामुलींचेही मला विशेष कौतुक वाटते. 

अर्थात आपल्यापैकी अनेकांना असेच वाटत असणार हे माहिती आहे. पण आज महाविद्यालयातील परेड Online बघताना अगदी गहिवरून आले म्हणून सहज लिहिले. कारण या कोरोना पार्श्वभूमीवर गेले काही दिवस रोज त्यांना खूप खूप मेहनत करताना बघत होते. सातत्य आणि मेहनतीने काय साध्य होतं हे यावरून दिसून येते. Gaurang Vikas Rajwadkar  सर आणि Kasturi Medhekar मॅडम, तुम्ही आणि तुमच्या टीमचे खूप खूप अभिनंदन! किती कमी दिवसात हा चमत्कार तुम्ही घडवून आणता! We all are proud of you! 

एरवी मस्तीखोर वाटणारी, कधीकधी साधी वाटणारी मुलं-मुली NCC चा Uniform अंगावर घालतात तेव्हा एकदम रुबाबदार दिसतात. परेडसाठी दिवसभर मेहनत करतात तेव्हा बऱ्याचवेळा त्यांचे चेहेरे अतिशय दमलेले दिसतात. पण 26 जानेवारीची परेड करताना त्यांचा चेहरा फक्त आणि फक्त अभिमानाने फुलून आलेला असतो. आपण काहीतरी करून दाखवू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर असतो. आपल्याला बघणारे आपले कौतुक करो वा न करोत, आपले ठरलेले मार्गक्रमण ते निर्धाराने पूर्ण करतात! 

त्यांचे ते Harmony मध्ये चालणे किती विलोभनीय असते! एका नादात निघणारे त्यांचे बुटांचे आवाज जणू एखादे संगीतच असते! त्या दमदार, शिस्तबद्ध, खड्या आवाजातल्या कमांडस् कानात पुढे कित्येक दिवस घुमत रहातात आणि मनात देशाभिमानाचे स्फुल्लिंग पेटते ठेवतात हे मात्र खरे!

किरण आणि सुहास

 Varsha Bapat your challege accepted and the same story translated in Marathi. Names changed for convenience. 

किरण एक भारतीय शास्त्रज्ञ... लाॅकडाउनमुळे अमेरिकेत अडकून आता आठ महिने पूर्ण झाले होते. भारतीय शास्त्रज्ञांची एक तुकडी आज मायदेशी परतत होती. किरणने अतिशय भावुक होऊन घरी व्हिडिओ काॅल लावला. इतके दिवस काळजीयुक्त दिसणारा सुहासचा हसरा चेहरा बघून किरणला खूप आनंद झाला. मोबाईल स्क्रीनवर सुहासचे टपटप पडणारे अश्रू पाहून किरणलाही गहिवरून आले. किरणने हसून म्हटले,"सुहास... तुझा फोन वाॅटरप्रुफ नाही आहे हं... फायनली... मी परत येत आहे. कधी एकदा तुला आणि मुलांना भेटेन असे झाले आहे..."

"Same here dear....आम्ही पण तुला बघायला आतुर झालो आहोत. तुझ्या आवडीचा मेन्यू ठरवला आहे उद्या डिनरमध्ये...", सुहासने पलिकडून एका दमात सांगून टाकले. 

"Me too... घरच्या जेवणासाठी आम्ही इकडे तरसत होतो. खास करून तुझ्या हातचं वांग्याचं भरीत आणि गाजर हलवा खाण्यासाठी मन अधीर झालं आहे माझं..."

उत्तरादाखल सुहासकडून ठेवणीतले हास्य आणि एक flying kiss येतो. 

पण आजुबाजुला सहकारी असल्याने किरणने विषय बदलला...," you know..मी खूप काय काय interesting गोष्टी आणल्या आहेत. काव्यच्या आवडीनिवडी तुझ्यासारख्या आहेत म्हणून काव्यला fashionable items...Harsha  is like me...त्यामुळे खूप सारी पुस्तकं आणि gadgets..." मुलं ते ऐकून  आनंदाने उड्याच मारू लागतात 

"आणि मला?", सुहासने विचारले.

" तुला "मी स्वतः"... just kidding... I know your gardening hobby...मी खूप gardening tools घेतली आहेत... तुला खूप आवडतील. चल... आता फोन बंद करायला हवा. Bye..love you."

विमान आकाशात झेपावते...

किरणला आठ महिन्यांनंतर मिठी मारताना सुहास आणि मुलांचा आनंद शिखरावर पोहोचलेला असतो.


...आनंदाचे अश्रू आणि गहिवर ओसरल्यावर किरण आपली बॅग उघडते आणि मुलांना आणि नवऱ्याला  आणलेल्या वस्तू देते. सुहासने त्याचं कौशल्य वापरून बनवलेल्या खास पदार्थांची गर्दी असलेलं जेवण जेवत सगळे हास्यविनोदात बुडून जातात.  


गोष्टीचे नाव: चौकटीपलिकडला आनंद!

सुकृता पेठे

Kiran and Apurva

Young and proud Indian scientist... Kiran calls home. Apurva eagerly waiting for Kiran's call gets excited from the other end. Kiran who was stuck in US due to lockdown was returning home after 8 months. Apurva's tears rolled down on the phone screen... "hey... honey...your mobile is not waterproof...", Kiran tries to hide emotions being in the flight.

"Atlast... I am boarding honey! Very eager to see you and kids."

"Same here darling, we were counting days without you. Planning to cook your favourite dishes for tomorrow's dinner!"

"Oh... lovely... Apurva, I am dying to eat home cooked food... especially Baingan bharta and Gajar Halwa by you, dear..."

Apurva grins and simply throws a flying kiss at the video call screen for Kiran.

Because of colleagues on the adjacent seat, Kiran gets embarrassed and changes the subject.

"Listen, I have bought so many gifts for all of you there. Kavya's likings are just like you so lots of fashionable items for Kavya and Harsha is like me so lot many books and gadgets for Harsha..." Kids scream with joy and start jumping.

Apurva who never lets go any opportunity to tease Kiran asks," and for me?"

Kiran smartly answers, "ofcourse "myself" for you darling... now I am switching off my phone... see you all tomorrow... I know your gardening hobby... you will just love to see various tools I have brought for you..."

Flight takes off. 

The excitement for Apurva and kids reaches to it's top when they hug Kiran after 8 months of parting. 


......After all overwhelming moments Kiran opens her bags, distributes all the gifts and all four of them enjoy the dinner cooked by Apurva using his extraordinary skills of cooking!


Title: Happiness Beyond Gender Frame!


Sukruta