Tuesday, April 26, 2022

सुनिल काका एक उमदं व्यक्तिमत्त्व

हसरा, दिलदार माणूस. जितका सुंदर चेहरा तितकंच सुंदर मन लाभलेले. कधीही तोंडातून अपशब्द ऐकले नाहीत की रागारागाने बोलताना पाहिलं नाही. खरंतर आवाज चढवून बोलताना पण कधी ऐकलं नाही...

मी गोष्ट सांगते आहे १९७० ते १९९० च्या काळातील. आम्हा तिघांच्या बालपणाच्या काळातील. 

आमचे घरमालक दाते कुटुंबियांशी आमचं नातं जुळत गेलं. सख्खे काका भिवंडीला रहायचे त्यामुळे वारंवार भेटीगाठी होत नसत. शाळेत काका, मामा, आत्या अशी नाती सांगताना दाते कुटुंबातील व्यक्ती पण धरल्या जायच्या आणि गोंधळ व्हायचा. दाते आजी आणि आजोबा यांची 'आमची आई' जणू मुलगीच झाली होती. "आमच्या अंबरनाथला ना असं असायचं..." अशा दाते आजींच्या गोष्टी ऐकताना आम्ही मुलं रममाण व्हायचो. दाते आजोबांना तसे इतर लोक घाबरायचे पण आम्ही मात्र अगदी अंगा-खांद्यावर खेळायचो. आजोबा गेले आणि माझी प्रकृती ढासळली कारण ते मला माझेच आहेत असं वाटायचं इतका जिव्हाळा होता.

सहाजिकच त्यांची मुलं म्हणजे अनिल काका आणि सुनिल काका हे आम्हाला आपले काकाच वाटायचे. अनिल काका वरणगावला असायचे आणि सुनिल काका पुण्यात.

गरीब-श्रीमंत, मालक-भाडेकरू असे भेद मानणाऱ्या समाजात दाते कुटुंबियांशी जुळलेला स्नेह हा इतरांच्या नजरेत भरेल असा होता. आमचे तिघांचे लाड आमच्या आईबाबांव्यतिरिक्त कोणी केले असतील तर त्यांनीच. 

बाबांची सायकल होती. सुनिल काकांनी पहिली स्कूटर घेतली. तेव्हा फेऱ्या मारायला आम्हीच होतो. कधी कधी कुठे जाताना काका, "चल येतेस का, स्कूटरने जाऊन येऊ" असं म्हणून घेऊन जायचे तेव्हा कोण आनंद व्हायचा. पुढे आयुष्यभर स्कूटर हा आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे तरी पहिल्यांदा काकांच्या स्कूटरवर बसलेला आनंद अजूनही विसरता येत नाही. तीच गोष्ट कारची. इतरांच्या वाहनांनी न जाण्याचा स्वाभिमान आईने पुरेपूर दिला होता. पण काकांच्या कारमधून कधी बसस्टॉपपर्यंत लिफ्ट मिळाली की मजा वाटायची. अमेरीकेला, फ्रान्सला गेलेली आम्ही तिघांनी पाहिलेली पहिली व्यक्ती म्हणजे सुनिल काका आणि तिथून आमच्यासाठी प्रेमाने हेअर ड्रायर आणि मेकॅनो आणणारी पहिली आणि एकमेव व्यक्ती सुद्धा सुनिलकाकाच! आता आम्हीच आमच्यासाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, मित्रमैत्रिणींसाठी हवं ते आणू शकतो आणि आणतो सुद्धा. पण आजही काही जणं परदेशातून आल्यावर हातावर चार गोळ्या टेकवतात तिथे त्याकाळी काकांनी आणलेल्या त्या गोष्टी आम्हाला अमूल्य वाटणारच ना! काकांनी तिथून पाठवलेली ग्रिटींगस् आम्ही जपून ठेवलेल्या लहानपणीच्या खजिन्यात अजूनही आहेत. त्यांनी परदेशी वारीची निरिक्षण पूर्वक केलेली वर्णने ऐकायला आम्हाला मजा यायची.

आईच्या ऑनलाईन पंचाहत्तरीच्या वेळी काका-काकूंचे लग्न जमताना आमच्या आईने घेतलेल्या सहभागाची आठवण सांगताना सुनिल काका भावुक झाले आणि ऑनलाईन कार्यक्रमातसुद्धा ओलावा आला. सगळ्यांचेच डोळे पाणावले. त्यांनी आणि मंजूकाकूने मुक्त कंठाने केलेली प्रशंसा ऐकून सगळ्यांनीच आपापले बंद कप्पे उघडून मोकळेपणाने मनोगते व्यक्त केली आणि कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. 

काका मनाने निर्मळ होते. म्हणूनच मोकळेपणाने बोलत. आईला म्हणत "वहिनी, तुम्ही स्वभावाने फार चांगल्या आहात. फक्त थोड्या reserved व्हा... तुमचा त्रास कमी होईल.." किती छान शब्दात समजावून सांगायचे... कुणावर राग धरून ठेवत नसत. 

निवृत्तीनंतरही अनेक गोष्टींमध्ये रस घेणाऱ्या काकांचं आम्हाला फार कौतुक वाटतं. म्हणजे ते फक्त तरूण दिसायचे नाहीत तर मनाने पण तरूण होते! आयुष्याकडे कायम सकारात्मकपणे बघणारे! 

त्यांना मंजूकाकूसारख्या विद्वान स्त्रीची साथ मिळाली म्हणूनच मिनू, मधू सारख्या गुणी मुली त्यांना लाभल्या. दिवसातला अर्धा वेळ मिनू, मधू आमच्या घरी असायच्या आणि आम्ही भरपूर खेळायचो. 

पुढे अनिल काका, अंजूकाकू पुण्यात आले. आम्हाला आणखी एक काका-काकू मिळाले. अमोद-अनुजा सारखे सोबती मिळाले. अनूशिवाय तर आमचा दिवस सुरू व्हायचा नाही.

स्थित्यंतरे होत गेली. आता सगळेच वेगवेगळ्या आयुष्यात वेगळ्या वेगळ्या वाटांवर चालत आहोत. पण आमच्या बालपणीच्या ज्या काही आठवणी आहेत त्यातील जास्तीत जास्त आठवणी दाते कुटुंबियांशी निगडित आहेत. तसेच सगळ्या दहा दात्यांवर आमचा अगदी सारखाच लोभ असला तरी का माहिती नाही कदाचित या सर्वांपेक्षा सर्वात अधिक सहवास लाभल्यामुळे असेल पण सुनिल काकांबरोबरचं नातं अव्यक्त असलं तरी सगळ्यात जास्त घट्ट विणलं गेलं होतं हे मात्र खरं! 

कदाचित ते सांगायला शब्द मिळत नाही आहेत. पण परवा रात्री काका गेले ही बातमी कळली  आणि आपोआप डोळे वाहू लागले... एकोणीस वर्षांपूर्वी  बाबा गेले, २०२१ च्या जुलैमध्ये आई गेली आणि आमच्या बालपणी आमच्याशी माणसासारखे वागून आमचे लाड करणारे सुनिल काका पण गेले... आठवणींचा पिसारा खूप रम्य वाटतो. पण एकेक मोरपीसं जशी गळून पडत आहेत तसे हताश व्हायला होतं आहे... आज हे वाचून "Well written Suku" अशी FB वर दाद द्यायला ते नाहीत. वयाने मोठं झाल्यावर काय दुःख असते हे आता कळते आहे.


सुकृता पेठे

No comments:

Post a Comment