Tuesday, April 26, 2022

अहमदाबाद, बडोदा सहल

 Day 1: 

सकाळी पावणेआठ वाजता अहमदाबाद एअरपोर्टवर पोहोचलो. OASES for U तर्फे अमर पेठे नावाचा बोर्ड घेऊन Innova Driver उभाच होता. सर्व प्रथम मोढेराच्या सूर्य मंदिराकडे निघालो. जाता जाता *अडलजची स्टेप वेल* पाहिली. पंधराव्या शतकाच्या शेवटी शेवटी बांधलेली ही विहीर, स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना होता. ईशामुळे आम्हाला त्याची उजेड आणि पाण्याची वैशिष्ट्ये समजावून सांगत होती.

नंतर *मोढेराचे सूर्य मंदीर* पाहिलं. दोन मंदिरे आणि एक मोठी स्टेप वेल. हजार एक वर्षांपूर्वी माणसे इतकी प्रगत होती आणि इतके उत्कृष्ट डिझाईनचे बांधकाम करत होती यावर विश्वास ठेवणे केवळ अशक्य वाटते. तेथील परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये गुजराती थाळीचा आस्वाद घेतला.

जेवल्यावर पाटण येथील *राणी कि वाव* बघायला गेलो. अति प्रचंड गर्दी होती पण परिसर इतका मोठा होता की ती गर्दी सहज विरून जात होती. ही एक वर्ल्ड हेरिटेज मध्ये समाविष्ट केलेली सात मजली विहीर आहे. तिथे गाईड घेतला होता. त्याने अनेक शिल्प उलगडून सांगितली. फ्रॅक्टल पद्धतीने केलेल्या पायऱ्या इथेही होत्या. तिथे पटोला साड्यांचे दुकान होते. पण सकाळपासून प्रवासात असल्यामुळे दमलो होतो म्हणून साड्यांकडे वळलो नाही. 

दीडशे किलोमीटर कापत एकदाचे हॉटेलला येऊन पोहोचलो. OASES for U कडून बुक झालेलं हॉटेल फोर स्टार आहे, अहमदाबाद शहरांमध्येच आहे आणि wowww आहे!

रात्री ईशाच्या फर्माईशी नुसार फूड-ट्रक पार्क येथे रात्रीचे खायला गेलो. शोअर्मा, अमृत्सरी पराठा, तंदुरी चिकन आणि त्यावर जामुन आणि दादागिरी शॉट्स आहा! खूप मजा आली!


Day 2: 

सकाळी मनसोक्त नाश्ता करून मग swimming pool वर पोहण्याचा आनंद घेतला आणि सगळं आवरून अगदी आरामात, दुपारी १२ वाजता *साबरमती आश्रमाकडे* जायला निघालो.

साबरमती आश्रमात जाणार या कल्पनेनेच माझे मन थरारून गेले होते. सबरमती नदीच्या काठावर हा आश्रम आहे.

साधेपणाचे, सात्विकतेचे तत्वज्ञान स्वतः जगून, जगासमोर आदर्श ठेवणाऱ्या गांधीजींचा जिथे निवास होता, त्या ठिकाणी गर्दी मात्र अजिबात नव्हती. लोकं होती पण खूप नाहीत. शांत आणि प्रसन्न वातावरण होते. गेल्या गेल्या समोरच विनोबा कुटीर आणि मीरा कुटीर अशा दोन्ही नावांनी ओळखली जाणारी एक कुटीर आहे. कुटीर म्हणजे काय एक खोली. माणसाच्या  गरजा कमीत कमी म्हणजे किती कमी असू शकतात! बाजुलाच गांधीजींचं घर. खरंतर 'गरीब माणसांसारखं मातीचं घर हवं' असा त्यांचा आग्रह होता. बी. व्ही. दोशी या architect नी त्यांना पक्क्या घराची आवश्यकता पटवून दिली... "नदीच्या पुरात कधीच वाहून जाईल, तुम्ही भारतभर फिरणार, घर सांभाळण्यासाठी कोणी नसल्यास दुरावस्था होईल..". हो/नाही करत पक्कं घर बांधलं गेलं. तीन खोल्या... एक गांधीजींची, एक कस्तुरबांची, एक पाहुण्यांसाठी. एक साधं स्वयंपाक घर आणि एक मोठी पडवी... इथेच बसून त्यांनी चरख्याची चळवळ चालवली, जगभरातील मोठ्या मोठ्या व्यक्तींनी त्यांची इथेच येऊन भेट घेतली... 

हीच ती जागा जिथे १९१८ ते १९३० ही गांधी पर्वातील महत्त्वाची वर्षे गांधीजी आणि कस्तुरबा राहिले. गांधीजींच्या घराच्याच पुढे चार्ल्स कोरिया नावाच्या भारतीय स्थापत्यशास्त्रज्ञाने डिझाईन केलेले गांधीजींचे संग्रहालय आहे. तसेच एक पुस्तकांचे दुकान व खादी ग्रामोद्योगचे दुकान आहे. येथे माफक दरात पुस्तके, सोव्हेनरस् तसेच खादीचे कपडे घेऊ शकतो. त्यानंतर स्वाती स्नॅक्स मध्ये जाऊन पोटपूजा केली. पॅंकी चटनी, फाडानी खिचडी, धनशाक भात, डाल ढोकळी, दाबेली असा स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेऊन जुन्या अहमदाबादकडे वळलो. *सिद्दी सय्यद नी जाली* पाहिली (अर्थात इथे बायकांना आत प्रवेश नाही). जुन्या अहमदाबाद मध्येच *हठीभाई नी वाडी* ला गेलो. तिथे एक जैन मंदिर होतं. मंदिराच्या खांबांवर आधी पाहिलेल्या स्टेपवेल मध्ये होती तशी हिंदू देवदेवतांची, अप्सरांची शिल्पे होती. आता जैन मंदिरात अशी शिल्पे काय करत आहेत हे काही कळेना. पण मंदिर सुंदर आहे. तिथून गांधीनगरमधील *अक्षरधाम मंदिर* बघायला गेलो. सणाचा दिवस असल्याने जवळपास लाखभर लोक त्यावेळी तिथे होती व दिवसभरात कित्येक लाख भेट देऊन गेली असतील. नेहमीप्रमाणे डोळे दिपवणारे अक्षरधाम मंदीर संध्याकाळी दिपमाळा लावल्यावर किती सुंदर दिसते ते पाहण्यचं भाग्य आम्हाला लाभलं. आता मात्र थकलो. हॉटेलला परतलो आणि जेवून झोपलो.


Day: 3

आजचा दिवस फक्त प्रवासाचा होता. त्यामुळे गाडीत बसून आवडीची गाणी ऐकणे, झोपणे किंवा बाहेर बघणे हेच काम करत होते. 

त्यामुळे निरिक्षणाला scope च scope होता. परवा अहमदाबादला उतरल्यापासून बघतो आहोत, इथे सगळ्यांच्या पांढऱ्या कारस्! पहिल्यांदा वाटले की आजुबाजुला सगळी tourist vehicles असतील म्हणून असेल पण नंतर सुद्धा city traffic मध्ये जास्तीत जास्त गाड्या पांढऱ्या! आणखी विशेष म्हणजे बऱ्याच इमारती आणि घरेही पांढऱ्याच रंगाची!

मुंबई एवढी लोकसंख्या कुठेच नसल्याने सगळेच रस्ते मोकळे! अशी सवयच नाहीये आपल्याला. बरेच सारे हायवेज 3, 4 किंवा 5 पदरी... लांब आणि रुंद. डोंगराळ भाग नाही त्यामुळे सरळच सरळ आणि पाऊस अगदीच कमी त्यामुळे खड्डे बिलकुल नाहीत. यंदा इथे खूपच कमी पाऊस झाला असल्याने नद्यांमध्ये मात्र खडखडाट आहे. अहमदाबाद वरून बडोद्याकडे जाताना १०० किलोमीटरचा लांबलचक महात्मा गांधी Expressway पार केला. नंतर ९० किमी वडोदरा-भरूच highway पार करून Statue of Unity या आमच्या सहलीच्या मुख्य आकर्षण बिंदूपाशी पोहोचलो. Google Map वर हा बिंदू दिसतो पण बिंदू कसला हा चांगला विशाल प्रदेश आहे!

केवाडिया स्थानकापाशी आमची इन्होव्हा थांबवली आणि Statue of Unity च्या Bus Service ने मुख्य स्थळापाशी पोहोचलो. Buses AC आहेत. ही सेवा मोफत आहे. साधारण ७ ते ८ किलोमीटर अंतर बसने गेलो. आणि यापुढे प्रत्यक्ष प्रवेशासाठी पुन्हा एकदा भली मोठी रांग. तरी रांग भराभर सरकत होती. आतमध्ये ५ Moving Walkway (सरकते मार्ग) आहेत. पुढे Viewing Gallery तिकीट असल्याने वर वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याच्या आत हृदयापाशी असलेल्या गॅलरीत जाऊन बाहेरील सरदार सरोवर आणि धरणाचे विहंगम दर्शन घेतले. खाली येऊन सरकते जिन्यांनी पुतळ्याच्या पावलांजवळ जाऊन परत एकदा त्या वास्तूची अवाढव्यता पाहून चकीत झालो. Statue च्या आवारात, आतमध्ये गेल्यावर व्यवस्था उत्तम होती. भरपूर टॉयलेटस् होती. Facility Attendances आहेत, Guides आहेत. खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, बसायला मुबलक जागा आहेत. त्यामुळे आत अत्यंत सुसह्य होते. 

प्रवेशद्वाराच्या जवळच असलेली Wall of Unity पुतळा बघून बाहेर येताना दिसली. १,६९,००० गावांमधून माती आणून ती भिंत बांधली आहे. मस्त वाटलं वाचून.

या सगळ्याची संकल्पना अतिशय सुंदर आहे. "देऊळ" चित्रपटासारखी Economy सुधारायला नक्कीच मदत होईल. 


Day: 4

आजचा दिवस तसा दगदगीचा नव्हता. सकाळी आवरून बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड यांचा लक्ष्मीविलास महाल पहायला गेलो. Bukingham Palace पेक्षा चारपटीने हा मोठा आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही शैलींचे मिश्रण असणारा हा महाल सयाजीराव गायकवाड ३ यांनी  Major Charles Mont या स्थापत्यकाराकडून तो बांधून घेतला. अजूनही पहिल्या मजल्यावर राजघराण्यातील वंशज निवास करतात. तिकीटे काढून बघायचा असल्याने इथेही फारशी गर्दी नव्हती. आलेले बहुतांश पर्यटक हे मराठी होते. गेल्या गेल्या प्रत्येकाच्या हातात एक पेनड्राईव सारखा Audiiplayee आणि Ear phone ची जोडी देतात. महालाच्या ११ भागांची माहिती त्यात recorded स्वरूपात ऐकता येते. माहिती ऐकत ऐकत आम्ही सगळा महाल फिरून पाहिला. हेवा वाटावा अशी श्रींमती आणि‌ डोळे दिपून जावे कसे वैभव! येथील माहितीपूर्ण संचयीत केलेले शस्त्रागार आणि दरबार हॉल या दोन जागा मला विशेष आवडल्या! यातील प्रत्येक शस्त्र कुठल्या ना कुठल्या युद्धात वापरले गेले होते.

तिथे निवास करणाऱ्यांचा खाजगीपणा जपला जावा यासाठी महालाच्या फोटोग्राफीला मनाई आहे.

त्याच परीसरातील फत्तेसिंह गायकवाडराजे यांनी तयार केलेले फत्तेसिंह म्युझियम पाहिले. राजा रविवर्मा यांनी काढलेली त्यांच्या घराण्यातील व्यक्तींची तैलचित्रे, देशोदेशीच्या मौल्यवान भेटवस्तू अन् कायकाय! 

त्यानंतर तांबेकर वाडा पाहिला. १८४९ ते १८५४ या कालावधीत बडोदा संस्थानचे दिवाण म्हणून काम पाहिलेल्या विठ्ठल खंडेराव तांबेकर यांचा हा वाडा पूर्ण पडझड झालेला आहे. हा वाडा पुरातत्व विभागाच्या ताब्यात गेला आहे. विटांचे बांधकाम असलेला हा वाडा टिपिकल मराठी पद्धतीचा आहे. आम्हाला उघडून दाखवलेली खोली कामकाजासाठी वापरली जात असावी त्याच्या सर्व भिंतींवर पुराण कथा चित्रित केल्या होत्या. 

बाकी फक्त पडझड झालेली ती वास्तू बघताना ईशाच्या सांगण्यावरून मन भूतकाळात जाऊन हा राहता असताना कसा कसेल हा विचार करू लागले आणि खूप मौज वाटली.

त्यानंतर उदरभरण करण्यासाठी Gujarati authentic थाळी खाण्यासाठी *मंडप* नावाच्या रेस्टॉरंट मध्ये गेलो. भरगच्च ताट पाहनच मन तृप्त झाले! जेवण चविष्ट आहे! 

ईशाची शाळामैत्रीण इथेच उतरली होती. त्यांच्याशी गप्पा मारताना आणखी एक ठिकाण कळले. 

The Indian Army Corps of Electronics and Mechanical Engineers (EME) यांनी बांधलेले दक्षिणामूर्ती मंदिर हे शिवमंदिर. हिंदू मंदिर असले तरीही हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारशी धर्मातील प्रतिकांचा वापर करून बांधलेले हे मंदिर भारतातील सर्वधर्मसमभाव अधोरेखित करणारे आहे. आर्मीचे असल्याने इथेही फोटोग्राफीला परवानगी नाही. मंदिर आणि परिसर  एकदम शांत, निवांत आणि प्रसन्न आहे.

रात्री तिथेच जवळपास २० वर्षांपासून रहाणऱ्या अमरच्या शाळामित्राने आवर्जून जेवायला बोलावले. सुंदर Duplex Bunglow घर आहे. तिथली खास गाठीया उसळ डीश, आयस्क्रीम आणि खूप साऱ्या गप्पा असा फक्कड बेत झाला. मुंबईच्या तुलनेत अशा बंगल्यांच्या जागा खूपच मोठ्या व शांत असल्याने वेगळेच वाटले. दुसऱ्यदिवशी पहाटेच्या विमानाने मुंबईला परतलो. चार दिवसाची अहमदाबाद बरोडा सहल मरगळलेल्या मनाला ताजेतवाने करून गेली.


सुकृता पेठे

No comments:

Post a Comment