Tuesday, April 26, 2022

रानफुले

 मुंबईपासून जरा लांब गेलो की शहराचा झगमगाट संपतो. वेशीवेशीवर आढळणारा कचऱ्याचा विळखा सतत नजरेला सलत रहातो. अर्थात थोडी नजर सरकली आणि हिरवी झाडे दिसली की बरे वाटते. जंगलाच्या दिशेने जाऊ लागलो की इमारती दिसायच्या बंद होतात आणि छोट्या छोट्या घरांच्या वस्त्या सुरू होतात. त्यादिवशी आमची गाडी अशाच एका छोट्या गावातून जात होती... ते दृश्य विलोभनीय वाटत होते... सारवलेल्या जमिनी, चुडाच्या किंवा मातीच्या भिंती असलेली दाटीवाटीने जवळ जवळ बांधलेली घरे, आजुबाजुला कोंबड्या, शेळ्या, गुरे अशी पशुधनाची उधळण... उन्हात करपलेली, मळकटलेले कपडे चढवलेली, तळपत्या उन्हात सुरकुतलेल्या चेहेऱ्यावरचे डोळे किलकिले करून शहरातून आलेल्या मोटारीने 'कोण पाहुणे आले आहेत?' असे उत्सुकतेने पाहणारी माणसे... अहाहा... जाणवलेली बोचणारी विषमता थोडी लांब ठेवून या दृश्याकडे पाहताना मोठी मजा येत होती. 

कालच होळी जळली होती. अगदी तुरळक असे रंग चेहऱ्यांवर लागलेले होते किंबहुना बहुतेक नव्हतेच... पण मने मात्र रंगात न्हाली होती. गंमत अशी की या सगळ्या आनंदाच्या दृश्यावर चक्क 'टोल' आकारला जात होता. एका ठिकाणी पाच ते दहा, बारा वयोगटातील चिमुरडी मुले बांबू आडवा उचलून रस्ता अडवून उभी होती. पन्नासची एक नोट दिल्यावर त्या मुलांच्या चेहऱ्यावर असे काही हास्य उमटले की बास! धावत धावत आडवा धरलेला बांबू सरकवून त्यांनी रस्ता मोकळा केला आणि आम्ही पुढे निघालो. धुळवड खेळण्यासाठी वर्गणी जमवण्याच्या या खटाटोपाचे मनोमन कौतुक करत होतो आणि तेवढ्यात पुन्हा पुढचा टोल आला. विशेष म्हणजे हा टोल फक्त एकेकदाच वसूल केला. त्याच मार्गाने परत जाताना गाडी आधीच ओळखली जाऊन मार्ग मोकळा केला जात होता. किती ते समाधान! 

असे एकेक करत पंधरा ते सोळा टोलनाके आले. पर्समधल्या पन्नास, वीस, दहा अशा एकेक नोटा देऊन कोटी कोटी रूपयांचे हास्य बघायला मिळत होते आणि नंतर हात हलवून निरोप घेणारी ती मुले पाहून आम्ही विरघळून जात होतो. ते बघताना त्यांच्या त्या आनंदी चेहऱ्यांचा फोटो काढायचे पण लक्षातच येत नव्हते. पुढे गेलो की आठवायचे, 'अरे, फोटो राहिला...' शेवटी एकदा लक्षात ठेऊन फोटो काढायचे असे ठरवले. टोल देऊन झाल्यावर हात हलवत बाजूला जाणाऱ्या मुलांना हाक मारली... "थांबा, फोटो घेते.." असे सांगितले पण लाजाळूच्या झाडासारखी ही रानफुले लांब पळाली आणि पाठ फिरवून चेहरा झाकून उभी राहिली... अगदी झाडून सगळी... आणि लक्षात आले... यांचे असे हास्य पकडणे म्हणजे पाखरे पकडण्याहून कठीण आहे. तो निरागस टोल दिल्यावर मिळणाऱ्या पावतीची नक्कल हवी तरी कशाला? या टोलच्या पावतीची मूळ प्रतच सुंदर आणि मौल्यवान होती!

No comments:

Post a Comment