Tuesday, April 26, 2022

कंगोरे

थोड्या टोकदार वाटत होत्या कडा आणि वेडेवाकड्या सुद्धा... पण कंगोरे एकमेकांमध्ये बसून गेले...गंवंड्याने तुटलेल्या फरशीला साधारण तसाच दिसणारा तुकडा जोडून दिला आणि 'जिगसॉ पझल' सुटावे असा आनंद झाला!

किती कठीण आहे कंगोरे असे एकमेकांमध्ये चपखल बसणे! मग ते कंगोरे कुठलेही असोत...‌ नात्यांचे, मैत्रीचे, शेजाऱ्यांबरोबरचे, सहकाऱ्यांबरोबरचे किंवा रस्त्यावर, बाजारात समोर येणाऱ्या अनोळखी व्यक्तीबरोबरचे असोत... 

कधी आपल्याला आपली धार बोथट करावी लागते तर कधी समोरची व्यक्ती अगदी सहजपणे वाकायला तयार होते आणि कंगोरे जुळत रहातात... आणि चित्र हळूहळू आकार घेत रहातं...

नाहीतर 'जिगसॉ पझल'च्या सुट्या  तुकड्यासारखा प्रत्येकजण कसा 'वेडावाकडा' आणि 'अर्धवट' दिसतो.... कोणाच्या 'इच्छा अपूर्ण'... कोणाची 'स्वप्न अधुरी'... कोणाचे 'भविष्य रखडलेले'... कोणाची 'नाती तुटलेली'... कोणाची 'दिशा भरकटलेली'... कोणाची 'साथ हरवलेली'... तर  कोणाचे 'छत्रच उडालेले'... कोणी 'अर्धे उमललेले', कोणी 'अर्धवट वयात' आलेले, कोणी वयाच्या 'अर्ध्या टप्प्याशी' घुटमळणारे, तर कोणी 'अर्ध्या श्वासावर'... शेवटचे श्वास मोजणारे...

कोणी कायम 'अतृप्त' तर कोणी नेहमीच 'अल्पसंतुष्ट'... कोणी 'फाटकी चिरगुटं' गुंडाळणारे तर कोणी 'तोकड्या कपड्यात' आनंद ढुंढाळणारे... कोणी भावनांना वाहू न देता कायमच  'थोपवणारे', तर कोणी संयम तोडणारे... कोणी घेतलेलं 'काम मध्येच सोडणारे' तर कोणी एखाद्या ध्यासापायी 'जगणं विसरलेले'...

सगळं जणू 'भंगलेल्यांचं' जग! किती 'भकास' दिसायला हवं खरं तर... भंगाराकडे आलेल्या 'मोडक्या तोडक्या' वस्तुंसारखं... एका 'उजाड' माळरानासारखं, 'तुटकी-फुटकी' शिल्प असलेल्या पुरातन मंदिरांसारखं... पण नाही... ते चक्क सुंदर दिसतं!  

तुकड्या तुकड्यांनी भरला असला तरी हा 'आयुष्याचा कॅलिडोस्कोप' या तुकड्यांचे सुंदर सुंदर आकार तयार करतच रहातो... 

कित्येकदा या 'अपुऱ्या तुकड्यांचे' कंगोरे एकमेकांमध्ये अगदी तंतोतंत बसून पूर्णत्वाचा एक लोभस आभास तयार होतो... हे 'पूर्णत्व' आभासी असले तरी कंगोऱ्यांचं एकमेकांमध्ये बसून झालेला 'जोड' आभासी नसतो... म्हणूनच त्या 'आभासी' पूर्णत्वाचे 'समाधान मात्र पूर्ण' वाटते हेच खरं!


सुकृता

No comments:

Post a Comment