Tuesday, April 26, 2022

अहमदाबाद, बडोदा सहल

 Day 1: 

सकाळी पावणेआठ वाजता अहमदाबाद एअरपोर्टवर पोहोचलो. OASES for U तर्फे अमर पेठे नावाचा बोर्ड घेऊन Innova Driver उभाच होता. सर्व प्रथम मोढेराच्या सूर्य मंदिराकडे निघालो. जाता जाता *अडलजची स्टेप वेल* पाहिली. पंधराव्या शतकाच्या शेवटी शेवटी बांधलेली ही विहीर, स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना होता. ईशामुळे आम्हाला त्याची उजेड आणि पाण्याची वैशिष्ट्ये समजावून सांगत होती.

नंतर *मोढेराचे सूर्य मंदीर* पाहिलं. दोन मंदिरे आणि एक मोठी स्टेप वेल. हजार एक वर्षांपूर्वी माणसे इतकी प्रगत होती आणि इतके उत्कृष्ट डिझाईनचे बांधकाम करत होती यावर विश्वास ठेवणे केवळ अशक्य वाटते. तेथील परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये गुजराती थाळीचा आस्वाद घेतला.

जेवल्यावर पाटण येथील *राणी कि वाव* बघायला गेलो. अति प्रचंड गर्दी होती पण परिसर इतका मोठा होता की ती गर्दी सहज विरून जात होती. ही एक वर्ल्ड हेरिटेज मध्ये समाविष्ट केलेली सात मजली विहीर आहे. तिथे गाईड घेतला होता. त्याने अनेक शिल्प उलगडून सांगितली. फ्रॅक्टल पद्धतीने केलेल्या पायऱ्या इथेही होत्या. तिथे पटोला साड्यांचे दुकान होते. पण सकाळपासून प्रवासात असल्यामुळे दमलो होतो म्हणून साड्यांकडे वळलो नाही. 

दीडशे किलोमीटर कापत एकदाचे हॉटेलला येऊन पोहोचलो. OASES for U कडून बुक झालेलं हॉटेल फोर स्टार आहे, अहमदाबाद शहरांमध्येच आहे आणि wowww आहे!

रात्री ईशाच्या फर्माईशी नुसार फूड-ट्रक पार्क येथे रात्रीचे खायला गेलो. शोअर्मा, अमृत्सरी पराठा, तंदुरी चिकन आणि त्यावर जामुन आणि दादागिरी शॉट्स आहा! खूप मजा आली!


Day 2: 

सकाळी मनसोक्त नाश्ता करून मग swimming pool वर पोहण्याचा आनंद घेतला आणि सगळं आवरून अगदी आरामात, दुपारी १२ वाजता *साबरमती आश्रमाकडे* जायला निघालो.

साबरमती आश्रमात जाणार या कल्पनेनेच माझे मन थरारून गेले होते. सबरमती नदीच्या काठावर हा आश्रम आहे.

साधेपणाचे, सात्विकतेचे तत्वज्ञान स्वतः जगून, जगासमोर आदर्श ठेवणाऱ्या गांधीजींचा जिथे निवास होता, त्या ठिकाणी गर्दी मात्र अजिबात नव्हती. लोकं होती पण खूप नाहीत. शांत आणि प्रसन्न वातावरण होते. गेल्या गेल्या समोरच विनोबा कुटीर आणि मीरा कुटीर अशा दोन्ही नावांनी ओळखली जाणारी एक कुटीर आहे. कुटीर म्हणजे काय एक खोली. माणसाच्या  गरजा कमीत कमी म्हणजे किती कमी असू शकतात! बाजुलाच गांधीजींचं घर. खरंतर 'गरीब माणसांसारखं मातीचं घर हवं' असा त्यांचा आग्रह होता. बी. व्ही. दोशी या architect नी त्यांना पक्क्या घराची आवश्यकता पटवून दिली... "नदीच्या पुरात कधीच वाहून जाईल, तुम्ही भारतभर फिरणार, घर सांभाळण्यासाठी कोणी नसल्यास दुरावस्था होईल..". हो/नाही करत पक्कं घर बांधलं गेलं. तीन खोल्या... एक गांधीजींची, एक कस्तुरबांची, एक पाहुण्यांसाठी. एक साधं स्वयंपाक घर आणि एक मोठी पडवी... इथेच बसून त्यांनी चरख्याची चळवळ चालवली, जगभरातील मोठ्या मोठ्या व्यक्तींनी त्यांची इथेच येऊन भेट घेतली... 

हीच ती जागा जिथे १९१८ ते १९३० ही गांधी पर्वातील महत्त्वाची वर्षे गांधीजी आणि कस्तुरबा राहिले. गांधीजींच्या घराच्याच पुढे चार्ल्स कोरिया नावाच्या भारतीय स्थापत्यशास्त्रज्ञाने डिझाईन केलेले गांधीजींचे संग्रहालय आहे. तसेच एक पुस्तकांचे दुकान व खादी ग्रामोद्योगचे दुकान आहे. येथे माफक दरात पुस्तके, सोव्हेनरस् तसेच खादीचे कपडे घेऊ शकतो. त्यानंतर स्वाती स्नॅक्स मध्ये जाऊन पोटपूजा केली. पॅंकी चटनी, फाडानी खिचडी, धनशाक भात, डाल ढोकळी, दाबेली असा स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेऊन जुन्या अहमदाबादकडे वळलो. *सिद्दी सय्यद नी जाली* पाहिली (अर्थात इथे बायकांना आत प्रवेश नाही). जुन्या अहमदाबाद मध्येच *हठीभाई नी वाडी* ला गेलो. तिथे एक जैन मंदिर होतं. मंदिराच्या खांबांवर आधी पाहिलेल्या स्टेपवेल मध्ये होती तशी हिंदू देवदेवतांची, अप्सरांची शिल्पे होती. आता जैन मंदिरात अशी शिल्पे काय करत आहेत हे काही कळेना. पण मंदिर सुंदर आहे. तिथून गांधीनगरमधील *अक्षरधाम मंदिर* बघायला गेलो. सणाचा दिवस असल्याने जवळपास लाखभर लोक त्यावेळी तिथे होती व दिवसभरात कित्येक लाख भेट देऊन गेली असतील. नेहमीप्रमाणे डोळे दिपवणारे अक्षरधाम मंदीर संध्याकाळी दिपमाळा लावल्यावर किती सुंदर दिसते ते पाहण्यचं भाग्य आम्हाला लाभलं. आता मात्र थकलो. हॉटेलला परतलो आणि जेवून झोपलो.


Day: 3

आजचा दिवस फक्त प्रवासाचा होता. त्यामुळे गाडीत बसून आवडीची गाणी ऐकणे, झोपणे किंवा बाहेर बघणे हेच काम करत होते. 

त्यामुळे निरिक्षणाला scope च scope होता. परवा अहमदाबादला उतरल्यापासून बघतो आहोत, इथे सगळ्यांच्या पांढऱ्या कारस्! पहिल्यांदा वाटले की आजुबाजुला सगळी tourist vehicles असतील म्हणून असेल पण नंतर सुद्धा city traffic मध्ये जास्तीत जास्त गाड्या पांढऱ्या! आणखी विशेष म्हणजे बऱ्याच इमारती आणि घरेही पांढऱ्याच रंगाची!

मुंबई एवढी लोकसंख्या कुठेच नसल्याने सगळेच रस्ते मोकळे! अशी सवयच नाहीये आपल्याला. बरेच सारे हायवेज 3, 4 किंवा 5 पदरी... लांब आणि रुंद. डोंगराळ भाग नाही त्यामुळे सरळच सरळ आणि पाऊस अगदीच कमी त्यामुळे खड्डे बिलकुल नाहीत. यंदा इथे खूपच कमी पाऊस झाला असल्याने नद्यांमध्ये मात्र खडखडाट आहे. अहमदाबाद वरून बडोद्याकडे जाताना १०० किलोमीटरचा लांबलचक महात्मा गांधी Expressway पार केला. नंतर ९० किमी वडोदरा-भरूच highway पार करून Statue of Unity या आमच्या सहलीच्या मुख्य आकर्षण बिंदूपाशी पोहोचलो. Google Map वर हा बिंदू दिसतो पण बिंदू कसला हा चांगला विशाल प्रदेश आहे!

केवाडिया स्थानकापाशी आमची इन्होव्हा थांबवली आणि Statue of Unity च्या Bus Service ने मुख्य स्थळापाशी पोहोचलो. Buses AC आहेत. ही सेवा मोफत आहे. साधारण ७ ते ८ किलोमीटर अंतर बसने गेलो. आणि यापुढे प्रत्यक्ष प्रवेशासाठी पुन्हा एकदा भली मोठी रांग. तरी रांग भराभर सरकत होती. आतमध्ये ५ Moving Walkway (सरकते मार्ग) आहेत. पुढे Viewing Gallery तिकीट असल्याने वर वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याच्या आत हृदयापाशी असलेल्या गॅलरीत जाऊन बाहेरील सरदार सरोवर आणि धरणाचे विहंगम दर्शन घेतले. खाली येऊन सरकते जिन्यांनी पुतळ्याच्या पावलांजवळ जाऊन परत एकदा त्या वास्तूची अवाढव्यता पाहून चकीत झालो. Statue च्या आवारात, आतमध्ये गेल्यावर व्यवस्था उत्तम होती. भरपूर टॉयलेटस् होती. Facility Attendances आहेत, Guides आहेत. खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, बसायला मुबलक जागा आहेत. त्यामुळे आत अत्यंत सुसह्य होते. 

प्रवेशद्वाराच्या जवळच असलेली Wall of Unity पुतळा बघून बाहेर येताना दिसली. १,६९,००० गावांमधून माती आणून ती भिंत बांधली आहे. मस्त वाटलं वाचून.

या सगळ्याची संकल्पना अतिशय सुंदर आहे. "देऊळ" चित्रपटासारखी Economy सुधारायला नक्कीच मदत होईल. 


Day: 4

आजचा दिवस तसा दगदगीचा नव्हता. सकाळी आवरून बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड यांचा लक्ष्मीविलास महाल पहायला गेलो. Bukingham Palace पेक्षा चारपटीने हा मोठा आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही शैलींचे मिश्रण असणारा हा महाल सयाजीराव गायकवाड ३ यांनी  Major Charles Mont या स्थापत्यकाराकडून तो बांधून घेतला. अजूनही पहिल्या मजल्यावर राजघराण्यातील वंशज निवास करतात. तिकीटे काढून बघायचा असल्याने इथेही फारशी गर्दी नव्हती. आलेले बहुतांश पर्यटक हे मराठी होते. गेल्या गेल्या प्रत्येकाच्या हातात एक पेनड्राईव सारखा Audiiplayee आणि Ear phone ची जोडी देतात. महालाच्या ११ भागांची माहिती त्यात recorded स्वरूपात ऐकता येते. माहिती ऐकत ऐकत आम्ही सगळा महाल फिरून पाहिला. हेवा वाटावा अशी श्रींमती आणि‌ डोळे दिपून जावे कसे वैभव! येथील माहितीपूर्ण संचयीत केलेले शस्त्रागार आणि दरबार हॉल या दोन जागा मला विशेष आवडल्या! यातील प्रत्येक शस्त्र कुठल्या ना कुठल्या युद्धात वापरले गेले होते.

तिथे निवास करणाऱ्यांचा खाजगीपणा जपला जावा यासाठी महालाच्या फोटोग्राफीला मनाई आहे.

त्याच परीसरातील फत्तेसिंह गायकवाडराजे यांनी तयार केलेले फत्तेसिंह म्युझियम पाहिले. राजा रविवर्मा यांनी काढलेली त्यांच्या घराण्यातील व्यक्तींची तैलचित्रे, देशोदेशीच्या मौल्यवान भेटवस्तू अन् कायकाय! 

त्यानंतर तांबेकर वाडा पाहिला. १८४९ ते १८५४ या कालावधीत बडोदा संस्थानचे दिवाण म्हणून काम पाहिलेल्या विठ्ठल खंडेराव तांबेकर यांचा हा वाडा पूर्ण पडझड झालेला आहे. हा वाडा पुरातत्व विभागाच्या ताब्यात गेला आहे. विटांचे बांधकाम असलेला हा वाडा टिपिकल मराठी पद्धतीचा आहे. आम्हाला उघडून दाखवलेली खोली कामकाजासाठी वापरली जात असावी त्याच्या सर्व भिंतींवर पुराण कथा चित्रित केल्या होत्या. 

बाकी फक्त पडझड झालेली ती वास्तू बघताना ईशाच्या सांगण्यावरून मन भूतकाळात जाऊन हा राहता असताना कसा कसेल हा विचार करू लागले आणि खूप मौज वाटली.

त्यानंतर उदरभरण करण्यासाठी Gujarati authentic थाळी खाण्यासाठी *मंडप* नावाच्या रेस्टॉरंट मध्ये गेलो. भरगच्च ताट पाहनच मन तृप्त झाले! जेवण चविष्ट आहे! 

ईशाची शाळामैत्रीण इथेच उतरली होती. त्यांच्याशी गप्पा मारताना आणखी एक ठिकाण कळले. 

The Indian Army Corps of Electronics and Mechanical Engineers (EME) यांनी बांधलेले दक्षिणामूर्ती मंदिर हे शिवमंदिर. हिंदू मंदिर असले तरीही हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारशी धर्मातील प्रतिकांचा वापर करून बांधलेले हे मंदिर भारतातील सर्वधर्मसमभाव अधोरेखित करणारे आहे. आर्मीचे असल्याने इथेही फोटोग्राफीला परवानगी नाही. मंदिर आणि परिसर  एकदम शांत, निवांत आणि प्रसन्न आहे.

रात्री तिथेच जवळपास २० वर्षांपासून रहाणऱ्या अमरच्या शाळामित्राने आवर्जून जेवायला बोलावले. सुंदर Duplex Bunglow घर आहे. तिथली खास गाठीया उसळ डीश, आयस्क्रीम आणि खूप साऱ्या गप्पा असा फक्कड बेत झाला. मुंबईच्या तुलनेत अशा बंगल्यांच्या जागा खूपच मोठ्या व शांत असल्याने वेगळेच वाटले. दुसऱ्यदिवशी पहाटेच्या विमानाने मुंबईला परतलो. चार दिवसाची अहमदाबाद बरोडा सहल मरगळलेल्या मनाला ताजेतवाने करून गेली.


सुकृता पेठे

कंगोरे

थोड्या टोकदार वाटत होत्या कडा आणि वेडेवाकड्या सुद्धा... पण कंगोरे एकमेकांमध्ये बसून गेले...गंवंड्याने तुटलेल्या फरशीला साधारण तसाच दिसणारा तुकडा जोडून दिला आणि 'जिगसॉ पझल' सुटावे असा आनंद झाला!

किती कठीण आहे कंगोरे असे एकमेकांमध्ये चपखल बसणे! मग ते कंगोरे कुठलेही असोत...‌ नात्यांचे, मैत्रीचे, शेजाऱ्यांबरोबरचे, सहकाऱ्यांबरोबरचे किंवा रस्त्यावर, बाजारात समोर येणाऱ्या अनोळखी व्यक्तीबरोबरचे असोत... 

कधी आपल्याला आपली धार बोथट करावी लागते तर कधी समोरची व्यक्ती अगदी सहजपणे वाकायला तयार होते आणि कंगोरे जुळत रहातात... आणि चित्र हळूहळू आकार घेत रहातं...

नाहीतर 'जिगसॉ पझल'च्या सुट्या  तुकड्यासारखा प्रत्येकजण कसा 'वेडावाकडा' आणि 'अर्धवट' दिसतो.... कोणाच्या 'इच्छा अपूर्ण'... कोणाची 'स्वप्न अधुरी'... कोणाचे 'भविष्य रखडलेले'... कोणाची 'नाती तुटलेली'... कोणाची 'दिशा भरकटलेली'... कोणाची 'साथ हरवलेली'... तर  कोणाचे 'छत्रच उडालेले'... कोणी 'अर्धे उमललेले', कोणी 'अर्धवट वयात' आलेले, कोणी वयाच्या 'अर्ध्या टप्प्याशी' घुटमळणारे, तर कोणी 'अर्ध्या श्वासावर'... शेवटचे श्वास मोजणारे...

कोणी कायम 'अतृप्त' तर कोणी नेहमीच 'अल्पसंतुष्ट'... कोणी 'फाटकी चिरगुटं' गुंडाळणारे तर कोणी 'तोकड्या कपड्यात' आनंद ढुंढाळणारे... कोणी भावनांना वाहू न देता कायमच  'थोपवणारे', तर कोणी संयम तोडणारे... कोणी घेतलेलं 'काम मध्येच सोडणारे' तर कोणी एखाद्या ध्यासापायी 'जगणं विसरलेले'...

सगळं जणू 'भंगलेल्यांचं' जग! किती 'भकास' दिसायला हवं खरं तर... भंगाराकडे आलेल्या 'मोडक्या तोडक्या' वस्तुंसारखं... एका 'उजाड' माळरानासारखं, 'तुटकी-फुटकी' शिल्प असलेल्या पुरातन मंदिरांसारखं... पण नाही... ते चक्क सुंदर दिसतं!  

तुकड्या तुकड्यांनी भरला असला तरी हा 'आयुष्याचा कॅलिडोस्कोप' या तुकड्यांचे सुंदर सुंदर आकार तयार करतच रहातो... 

कित्येकदा या 'अपुऱ्या तुकड्यांचे' कंगोरे एकमेकांमध्ये अगदी तंतोतंत बसून पूर्णत्वाचा एक लोभस आभास तयार होतो... हे 'पूर्णत्व' आभासी असले तरी कंगोऱ्यांचं एकमेकांमध्ये बसून झालेला 'जोड' आभासी नसतो... म्हणूनच त्या 'आभासी' पूर्णत्वाचे 'समाधान मात्र पूर्ण' वाटते हेच खरं!


सुकृता

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

लहानपणी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यातला फरक कळत नव्हता पण दोन्ही दिवशी फार भारी वाटायचे. ते दोन दिवस संपूर्ण वर्षभर मनामध्ये  देशाविषयी अभिमान, देशप्रेम टिकवून ठेवायला नक्कीच मदत करायचे. कक्षा रुंदावत गेल्यावर दोन्ही दिवसांचे वेगवेगळे औचित्य लक्षात येऊ लागले. लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य अशी लोकशाहीची व्याख्या कळली. प्रजासत्ताकाचा अर्थ कळू लागला. आपण स्वीकारलेल्या राज्य- पद्धतीमुळे आपण अतिशय सुंदर अशी लोकशाही पाळू शकतो हे कळू लागले. 26 जानेवारीची दिल्ली येथील परेड TV वर बघायची आवड बाबांनी लावली. एकाही दिवशी ती बुडवली नाही. पुढे 11 वी, 12 वी मध्ये, Prajakta Pethe  NCC मध्ये गेली. तिच्याकडून NCC च्या गोष्टी ऐकून फार मजा वाटायची. दुर्दैवाने माझी प्रकृती फारच कमकुवत असल्याने मला NCC मध्ये भाग घेण्याची घरून काही उत्तेजन नव्हते. तसेच माझा एक पाय फ्लॅट आणि एक पाय कमान असलेला असल्याने माझी निवड होण्याचीही काहीच शक्यता नव्हती.

तरीही NCC परेड बघणे, आपल्या सैन्याची परेड बघणे हे नेत्रसुख मी कितीही वेळ भान विसरून घेऊ शकते.

आता महाविद्यालयात शिकवताना जेव्हा जेव्हा भारतीय  सैन्यात, स्पेशल फोर्स मध्ये काम करणारी, पोलिस दलात काम करणारे विद्यार्थी येतात तेव्हा वाटेल तेवढे out of way जाऊन त्यांना परत शिकवताना, प्रात्यक्षिक परिक्षचे वेळापत्रक त्यांच्यासाठी त्यांच्या रजेप्रमाणे वेगळे करताना, वरिष्ठांकडून त्यांच्यासाठी काही खास सवलती मागून घेताना मला धन्य वाटते.... अर्थात हे काही अजिबात विशेष नाही याची जाणीव आहे. NCC च्या मुलामुलींचेही मला विशेष कौतुक वाटते. 

अर्थात आपल्यापैकी अनेकांना असेच वाटत असणार हे माहिती आहे. पण आज महाविद्यालयातील परेड Online बघताना अगदी गहिवरून आले म्हणून सहज लिहिले. कारण या कोरोना पार्श्वभूमीवर गेले काही दिवस रोज त्यांना खूप खूप मेहनत करताना बघत होते. सातत्य आणि मेहनतीने काय साध्य होतं हे यावरून दिसून येते. Gaurang Vikas Rajwadkar  सर आणि Kasturi Medhekar मॅडम, तुम्ही आणि तुमच्या टीमचे खूप खूप अभिनंदन! किती कमी दिवसात हा चमत्कार तुम्ही घडवून आणता! We all are proud of you! 

एरवी मस्तीखोर वाटणारी, कधीकधी साधी वाटणारी मुलं-मुली NCC चा Uniform अंगावर घालतात तेव्हा एकदम रुबाबदार दिसतात. परेडसाठी दिवसभर मेहनत करतात तेव्हा बऱ्याचवेळा त्यांचे चेहेरे अतिशय दमलेले दिसतात. पण 26 जानेवारीची परेड करताना त्यांचा चेहरा फक्त आणि फक्त अभिमानाने फुलून आलेला असतो. आपण काहीतरी करून दाखवू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर असतो. आपल्याला बघणारे आपले कौतुक करो वा न करोत, आपले ठरलेले मार्गक्रमण ते निर्धाराने पूर्ण करतात! 

त्यांचे ते Harmony मध्ये चालणे किती विलोभनीय असते! एका नादात निघणारे त्यांचे बुटांचे आवाज जणू एखादे संगीतच असते! त्या दमदार, शिस्तबद्ध, खड्या आवाजातल्या कमांडस् कानात पुढे कित्येक दिवस घुमत रहातात आणि मनात देशाभिमानाचे स्फुल्लिंग पेटते ठेवतात हे मात्र खरे!

किरण आणि सुहास

 Varsha Bapat your challege accepted and the same story translated in Marathi. Names changed for convenience. 

किरण एक भारतीय शास्त्रज्ञ... लाॅकडाउनमुळे अमेरिकेत अडकून आता आठ महिने पूर्ण झाले होते. भारतीय शास्त्रज्ञांची एक तुकडी आज मायदेशी परतत होती. किरणने अतिशय भावुक होऊन घरी व्हिडिओ काॅल लावला. इतके दिवस काळजीयुक्त दिसणारा सुहासचा हसरा चेहरा बघून किरणला खूप आनंद झाला. मोबाईल स्क्रीनवर सुहासचे टपटप पडणारे अश्रू पाहून किरणलाही गहिवरून आले. किरणने हसून म्हटले,"सुहास... तुझा फोन वाॅटरप्रुफ नाही आहे हं... फायनली... मी परत येत आहे. कधी एकदा तुला आणि मुलांना भेटेन असे झाले आहे..."

"Same here dear....आम्ही पण तुला बघायला आतुर झालो आहोत. तुझ्या आवडीचा मेन्यू ठरवला आहे उद्या डिनरमध्ये...", सुहासने पलिकडून एका दमात सांगून टाकले. 

"Me too... घरच्या जेवणासाठी आम्ही इकडे तरसत होतो. खास करून तुझ्या हातचं वांग्याचं भरीत आणि गाजर हलवा खाण्यासाठी मन अधीर झालं आहे माझं..."

उत्तरादाखल सुहासकडून ठेवणीतले हास्य आणि एक flying kiss येतो. 

पण आजुबाजुला सहकारी असल्याने किरणने विषय बदलला...," you know..मी खूप काय काय interesting गोष्टी आणल्या आहेत. काव्यच्या आवडीनिवडी तुझ्यासारख्या आहेत म्हणून काव्यला fashionable items...Harsha  is like me...त्यामुळे खूप सारी पुस्तकं आणि gadgets..." मुलं ते ऐकून  आनंदाने उड्याच मारू लागतात 

"आणि मला?", सुहासने विचारले.

" तुला "मी स्वतः"... just kidding... I know your gardening hobby...मी खूप gardening tools घेतली आहेत... तुला खूप आवडतील. चल... आता फोन बंद करायला हवा. Bye..love you."

विमान आकाशात झेपावते...

किरणला आठ महिन्यांनंतर मिठी मारताना सुहास आणि मुलांचा आनंद शिखरावर पोहोचलेला असतो.


...आनंदाचे अश्रू आणि गहिवर ओसरल्यावर किरण आपली बॅग उघडते आणि मुलांना आणि नवऱ्याला  आणलेल्या वस्तू देते. सुहासने त्याचं कौशल्य वापरून बनवलेल्या खास पदार्थांची गर्दी असलेलं जेवण जेवत सगळे हास्यविनोदात बुडून जातात.  


गोष्टीचे नाव: चौकटीपलिकडला आनंद!

सुकृता पेठे

Kiran and Apurva

Young and proud Indian scientist... Kiran calls home. Apurva eagerly waiting for Kiran's call gets excited from the other end. Kiran who was stuck in US due to lockdown was returning home after 8 months. Apurva's tears rolled down on the phone screen... "hey... honey...your mobile is not waterproof...", Kiran tries to hide emotions being in the flight.

"Atlast... I am boarding honey! Very eager to see you and kids."

"Same here darling, we were counting days without you. Planning to cook your favourite dishes for tomorrow's dinner!"

"Oh... lovely... Apurva, I am dying to eat home cooked food... especially Baingan bharta and Gajar Halwa by you, dear..."

Apurva grins and simply throws a flying kiss at the video call screen for Kiran.

Because of colleagues on the adjacent seat, Kiran gets embarrassed and changes the subject.

"Listen, I have bought so many gifts for all of you there. Kavya's likings are just like you so lots of fashionable items for Kavya and Harsha is like me so lot many books and gadgets for Harsha..." Kids scream with joy and start jumping.

Apurva who never lets go any opportunity to tease Kiran asks," and for me?"

Kiran smartly answers, "ofcourse "myself" for you darling... now I am switching off my phone... see you all tomorrow... I know your gardening hobby... you will just love to see various tools I have brought for you..."

Flight takes off. 

The excitement for Apurva and kids reaches to it's top when they hug Kiran after 8 months of parting. 


......After all overwhelming moments Kiran opens her bags, distributes all the gifts and all four of them enjoy the dinner cooked by Apurva using his extraordinary skills of cooking!


Title: Happiness Beyond Gender Frame!


Sukruta

गोष्ट Empathy ची...

इथे प्रत्येक व्यक्तीला एक गोष्ट असते. त्या गोष्टीत ती व्यक्ती स्वतः नेहमीच नायक किंवा नायिका असते. इतर खलनायक असतात किंवा खलनायक नसले तरी ती व्यक्ती मात्र स्वतः बिचारी असते. 'माझी पण काही बाजू आहे...' हे कितीही ओरडून सांगितलं तरी एक सत्य असतं की आपल्यासाठी इतरांना कानच नसतात... म्हणून तर आपण कायम दुःखी असतो.

पण कधी कल्पनेने दुसऱ्याच्या अंतरंगात शिरून त्यांची भावना समजून घेतली तर आपल्याला दुसऱ्याचीही गोष्ट कळते. क्वचित उथळ असेल पण बहुतेकवेळा ही दुसरी गोष्ट आपल्या गोष्टीसारखी साधी, सरळ नसते; ती जास्त गहिरी असते. तळ ढवळून काढणाऱ्या उलथापालथी त्यात असतात. गुंतागुंत इतकी की कुठले टोक आणि कुठली गाठ... काही कळत नसतं. आपल्या गोष्टीतील नायिकेपेक्षा किंवा नायकापेक्षा त्या दुसऱ्या गोष्टीतील नायक-नायिका कितीतरी दाहक घाव सोसत असतात. त्यांच्या विदीर्ण झालेल्या स्वप्नांच्या चिंध्या अंगावर लेवून समोरच्याची फाटकी चिरगुटं आनंदाने शिवून देत असतात. खरंतर आपली पण एक गोष्ट आहे याची देखील त्यांना जाणीव नसते. कधी कधी तर आपल्याला कळतं की आपल्याच टाकून दिलेल्या जुन्या कुंपणाच्या तारेमुळे त्यांचं पांघरलेलं फाटलेलं असतं. 

आपण मात्र जुनं झालेलं तारेचं वेटोळं नवीन आणण्यासाठी जास्त पैसे गेले म्हणून आपली गोष्ट सांगत रडत असतो. हे कळल्यावर आपण ओशाळून हसतो... आणि आपलं ते हसणं कळून समोरचाही विरघळतो... 

एकंदर काय की आपलेही कान उघडे ठेवायला हवे... आपली सोडून दुसरी गोष्ट ऐकायला!


©️सुकृता पेठे

 

इथे प्रत्येक व्यक्तीला एक गोष्ट असते. त्या गोष्टीत ती व्यक्ती स्वतः नेहमीच नायक किंवा नायिका असते. इतर खलनायक असतात किंवा खलनायक नसले तरी ती व्यक्ती मात्र स्वतः बिचारी असते. 'माझी पण काही बाजू आहे...' हे कितीही ओरडून सांगितलं तरी एक सत्य असतं की आपल्यासाठी इतरांना कानच नसतात... म्हणून तर आपण कायम दुःखी असतो.

पण कधी कल्पनेने दुसऱ्याच्या अंतरंगात शिरून त्यांची भावना समजून घेतली तर आपल्याला दुसऱ्याचीही गोष्ट कळते. क्वचित उथळ असेल पण बहुतेकवेळा ही दुसरी गोष्ट आपल्या गोष्टीसारखी साधी, सरळ नसते; ती जास्त गहिरी असते. तळ ढवळून काढणाऱ्या उलथापालथी त्यात असतात. गुंतागुंत इतकी की कुठले टोक आणि कुठली गाठ... काही कळत नसतं. आपल्या गोष्टीतील नायिकेपेक्षा किंवा नायकापेक्षा त्या दुसऱ्या गोष्टीतील नायक-नायिका कितीतरी दाहक घाव सोसत असतात. त्यांच्या विदीर्ण झालेल्या स्वप्नांच्या चिंध्या अंगावर लेवून समोरच्याची फाटकी चिरगुटं आनंदाने शिवून देत असतात. खरंतर आपली पण एक गोष्ट आहे याची देखील त्यांना जाणीव नसते. कधी कधी तर आपल्याला कळतं की आपल्याच टाकून दिलेल्या जुन्या कुंपणाच्या तारेमुळे त्यांचं पांघरलेलं फाटलेलं असतं. 

आपण मात्र जुनं झालेलं तारेचं वेटोळं नवीन आणण्यासाठी जास्त पैसे गेले म्हणून आपली गोष्ट सांगत रडत असतो. हे कळल्यावर आपण ओशाळून हसतो... आणि आपलं ते हसणं कळून समोरचाही विरघळतो... 

एकंदर काय की आपलेही कान उघडे ठेवायला हवे... आपली सोडून दुसरी गोष्ट ऐकायला!


©️सुकृता पेठे

रानफुले

 मुंबईपासून जरा लांब गेलो की शहराचा झगमगाट संपतो. वेशीवेशीवर आढळणारा कचऱ्याचा विळखा सतत नजरेला सलत रहातो. अर्थात थोडी नजर सरकली आणि हिरवी झाडे दिसली की बरे वाटते. जंगलाच्या दिशेने जाऊ लागलो की इमारती दिसायच्या बंद होतात आणि छोट्या छोट्या घरांच्या वस्त्या सुरू होतात. त्यादिवशी आमची गाडी अशाच एका छोट्या गावातून जात होती... ते दृश्य विलोभनीय वाटत होते... सारवलेल्या जमिनी, चुडाच्या किंवा मातीच्या भिंती असलेली दाटीवाटीने जवळ जवळ बांधलेली घरे, आजुबाजुला कोंबड्या, शेळ्या, गुरे अशी पशुधनाची उधळण... उन्हात करपलेली, मळकटलेले कपडे चढवलेली, तळपत्या उन्हात सुरकुतलेल्या चेहेऱ्यावरचे डोळे किलकिले करून शहरातून आलेल्या मोटारीने 'कोण पाहुणे आले आहेत?' असे उत्सुकतेने पाहणारी माणसे... अहाहा... जाणवलेली बोचणारी विषमता थोडी लांब ठेवून या दृश्याकडे पाहताना मोठी मजा येत होती. 

कालच होळी जळली होती. अगदी तुरळक असे रंग चेहऱ्यांवर लागलेले होते किंबहुना बहुतेक नव्हतेच... पण मने मात्र रंगात न्हाली होती. गंमत अशी की या सगळ्या आनंदाच्या दृश्यावर चक्क 'टोल' आकारला जात होता. एका ठिकाणी पाच ते दहा, बारा वयोगटातील चिमुरडी मुले बांबू आडवा उचलून रस्ता अडवून उभी होती. पन्नासची एक नोट दिल्यावर त्या मुलांच्या चेहऱ्यावर असे काही हास्य उमटले की बास! धावत धावत आडवा धरलेला बांबू सरकवून त्यांनी रस्ता मोकळा केला आणि आम्ही पुढे निघालो. धुळवड खेळण्यासाठी वर्गणी जमवण्याच्या या खटाटोपाचे मनोमन कौतुक करत होतो आणि तेवढ्यात पुन्हा पुढचा टोल आला. विशेष म्हणजे हा टोल फक्त एकेकदाच वसूल केला. त्याच मार्गाने परत जाताना गाडी आधीच ओळखली जाऊन मार्ग मोकळा केला जात होता. किती ते समाधान! 

असे एकेक करत पंधरा ते सोळा टोलनाके आले. पर्समधल्या पन्नास, वीस, दहा अशा एकेक नोटा देऊन कोटी कोटी रूपयांचे हास्य बघायला मिळत होते आणि नंतर हात हलवून निरोप घेणारी ती मुले पाहून आम्ही विरघळून जात होतो. ते बघताना त्यांच्या त्या आनंदी चेहऱ्यांचा फोटो काढायचे पण लक्षातच येत नव्हते. पुढे गेलो की आठवायचे, 'अरे, फोटो राहिला...' शेवटी एकदा लक्षात ठेऊन फोटो काढायचे असे ठरवले. टोल देऊन झाल्यावर हात हलवत बाजूला जाणाऱ्या मुलांना हाक मारली... "थांबा, फोटो घेते.." असे सांगितले पण लाजाळूच्या झाडासारखी ही रानफुले लांब पळाली आणि पाठ फिरवून चेहरा झाकून उभी राहिली... अगदी झाडून सगळी... आणि लक्षात आले... यांचे असे हास्य पकडणे म्हणजे पाखरे पकडण्याहून कठीण आहे. तो निरागस टोल दिल्यावर मिळणाऱ्या पावतीची नक्कल हवी तरी कशाला? या टोलच्या पावतीची मूळ प्रतच सुंदर आणि मौल्यवान होती!