Monday, June 26, 2017

नदी

खळखळणारं झऱ्यासारखं धावणं कधीच थांबलं
'नदी' व्हायची वाट बघणारं 'ओढापणच' उरलं

वाटलं जावं खोल..व्हावं नदीसारखं रुंद
एक फाटा गेलाही काळ्या कातळाला खणत
मग खाली जाता जाता पुढे जाणं थांबलं
'सरोवर' व्हायची वाट बघणारं 'डबकेपणच' उरलं...

वाटलं फुलवावे आपणही 'मळे' मग काय...
गेले धावत...उजाड माळरानातून
मळ्यांमधून धावताना 'नदी' होणं राहिलं
फळाफुलात गुरफटलेलं 'कालवापणच' राहिलं...

वाटायचं कधीतरी आपणही 'नदी' व्हावं
आकाशाचं निळेपण खोल डोहात साठवावं
काठावरच्या रानाशी गुजगोष्टी  कराव्यात
भिरभिरणाऱ्या वाऱ्याबरोबर तरंग होऊन थरथरावं...

वाटायचं कधीतरी आपणही 'नदी' व्हावं
पूर्वेकडच्या तीरामागून सूर्यानं डोकवावं
तारकांनी चमचमणारं आकाशाचं वस्त्र ल्यावं
कोणीतरी आपल्यालाही गंगेसारखं नाव द्यावं...

येणाऱ्या जाणाऱ्याचं सगळं काही ऐकावं
त्यांची जळजळ, मळमळ सारं काही पचवावं
डोहात सोडलेल्या पायांना लाटांनी कुरवाळावं
सागराला मिळण्याआधी आपणच 'सिंधु' व्हावं...

खळखळणाऱ्या झऱ्यासारखं धावणं कधीच थांबलं
बांधाच्या धाकाने वहाणंही विसरलं
मैला जमा होणारं 'नालेपणच' उरलं
नदी व्हायचं स्वप्न मनामध्येच विरलं...

                                            --सुकृता

No comments:

Post a Comment