काल अचानक College मधल्या झाडावर कुसुमाग्रज अन् विंदा दिसले. 'मराठी दिन' होता म्हणून टांगलेल्या तक्त्यांतून ते चक्क हसले. "मागे वळून बघू नको ", असं म्हणत त्यानी मलाच हटकलं. 'तुम्हाला मराठीची काळजी का वाटते?' असं काहीसं त्यांना विचारायचं असावं. पण मी त्यांना फारसं बोलूच नाही दिलं. Whatsapp वरून मिळवलेलं सगळं ज्ञान पाजळून मराठीची मलाच किती काळजी ते त्यांना सांगितलं.
त्या दोघांना तसेच विचाराधीन सोडून, "Auto"ला बोलावून Station कडे निघाले. जाताजाता Whatsapp च्या वेगवेगळ्या Groups वर मराठीची महती सांगणारे वेगवेगळे messages forward केले. मग Facebook वर पण थोडें मराठीचे गोडवे गायले. मनातले अपराधी भाव मनामध्ये लपवून माझ्या खांद्यावरची सामाजिक जबाबदारी उतरवून धन्य धन्य झाले.
तरी समाधान होईना. मग Train मध्ये बसल्या बसल्या Google वरती विंदांच्या दोन ओळी शोधून, माझं Whatsapp चे Status अगदी मराठीमय केलं.
त्यादिवशी घरातसुद्धा मराठीचा फतवा काढून आमच्या Moms च्या group वर कौतूकाचे भरपूर Smileys मिळवले. 'You know' ने सुरूवात केली तरी कटाक्षाने मराठीतच बोलून English चे अज्ञानसुद्धा मराठीने झाकलं. मुलांना Blue, Pink ऐवजी निळा किंवा गुलाबी असे शब्द वापरायला लावले. किती हसली माझी मुलं... पण मी नाही हो मराठीची कास सोडली. English Medium मध्ये आहेत ना मुलं... म्हणून... बाकी काही नाही.
तरीसुद्धा झोपताना माझं 'उणेपण' मुखवट्याच्या पाठीमागून माझ्याशी हसलं. मराठी बाण्याचे उसन्या आवाचे फसवे चष्मे काढल्यावर सारं काही स्वच्छ दिसलं. 'वाचावे उदंड' विसरून गेले... न वाचण्यामुळे जमा झालेलं अज्ञान विनाकारण झाकत गेले. आता 'मी' वापरत नाही म्हणून नामशेष व्हायला मराठी काही इतकी लेचीपेची आहे का? काळाप्रमाणे ती बदलत जाईल. वेगवेगळ्या भाषांमुळे ती अधिकाधिक समृद्ध होत राहील. कारण संवाद साधण्याचे ते एक माध्यम आहे. विचारांच्या देवाणघेवाणीसाठी ती लागणारच. पण Forwards च्या भाऊगर्दीत संवाद, चर्चा ह्यांना आपणच कमी महत्व द्यायचं आणि मग मराठीची कणव आणून गळे काढायचे... कोणी सांगितलं असं करायला मला? Modern आहोत हे दाखवताना ओढूनताणून English वापरायची. आता English बोलले तरी विचार Modern असणार ह्याची शाश्वती आहे का?
डोळे उघडून आजुबाजुला पाहिले, वाचले कि कळते कित्येक वल्लींना भरपूर भाषा येतात. कित्येक जण छान छान लिहितात आणि कोणत्याच भाषेला कमी-जास्त न लेखता अनेकांशी संवाद साधतात. जमेल का आपल्याला तसं??
सुकृता
No comments:
Post a Comment